old pension scheme govt mh: जुनी पेन्शन योजना: राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा निर्णय कायम ; अकोल्यात 75 संघटनांचा सहभाग






ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

भारतीय अलंकार 24

अकोला: जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तवेतन (पेन्शन) योजनेच्या मागणीसाठी उद्यापासून संप पुकारला आहे. या संपात अकोला जिल्ह्यातून सुमारे 75  कर्मचारी संघटना सहभागी होवून बेमुदत संपावर जाणार असल्याचे राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती अकोला जिल्हा अध्यक्ष तथा निमंत्रक राजेंद्र नेरकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद विश्राम गृह येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र नेरकर यांनी बेमुदत संप विषयी सविस्तर माहिती दिली.





अन्य राज्यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना स्वीकारली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही ती योजना स्वीकारण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे.  या मागणीसोबतच सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करा, सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा, कंत्राटी कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करावी, निवृत्तीचे वय ६० करावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची सध्या रोखलेली पदोन्नती तत्काळ सुरू करावी, उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतन वाढीसाठी येण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ववत सुरू करावे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करावे, अशा विविध मागण्या संपकऱ्यांच्या आहेत. आयुष्यभर सरकारची सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर वृद्धापकाळातील सामाजिक सुरक्षिततेसाठी आवश्यक जुनी पेन्शन योजनेबाबत आम्ही आग्रही आहोत, असे देखील नेरकर यांनी सांगितले.




सनदशीर मार्गाने केलेल्या संघटनात्मक प्रयत्नांकडे शासन सतत दुर्लक्षच करते याविषयीचा क्षोभ सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी-शिक्षक यांचे मनात धगधगतो आहे. अन्यायग्रस्त कर्मचारी-शिक्षक नाईलाजाने शासनाविरुद्ध तीव्र संघर्ष उभा करून त्यांच्या व्यथा संघटनात्मक कृतीच्या माध्यमातून व्यक्त करण्याच्या मनस्थितीत असल्याचे नेरकर यांनी सांगितले.





राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र सन 1977 पासून, सरकारी- निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा,नगरपंचायती कर्मचारी समन्वय समितीचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे कर्मचारी  शिक्षकांच्या सेवाविषयक सहवेदना जाणून निराकरणास मदत करणे हे मध्यवर्ती संघटनेचे कर्तव्य आहे. त्यानुसार 9 फेब्रुवारी 2023  रोजी मुंबईत समन्वय समितीची बैठक तर  12 फेब्रुवारी 2023 रोजी नासिक येथे मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सभा पार पडली. या सभांमध्ये राज्यातील कर्मचारी- शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या चार वर्षातील सरकारच्या नकारात्मक धोरणाचा विचार करून प्रलंबित मागण्यांबाबत होत असलेल्या अन्यायाविरुध्द “राज्यव्यापी बेमुदत संप" आंदोलन करण्याचा निर्णय या सभांमध्ये घेण्यात आला.





दिर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या  मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवार 14 मार्च 2023 पासून राज्यातील सरकारी निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. उद्या सकाळी 11 वाजता पासून अकोला जिल्हयातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देवून रोष व्यक्त करणार आहेत, अशी माहिती देत सांप्रत संवेदनशील राज्य शासनाने इच्छाशक्ती दर्शविल्यास सर्व प्रलंबित मागण्यांबावत सकारात्मक निर्णय होऊ शकतात, अशी अपेक्षा नेरकर यांनी व्यक्त केली.




पत्रकार परिषदेला समन्वय समितीचे पदाधिकारी अशोक वानखडे, रवि काटे, उल्हास मोकलकर, संतोष कुटे, अशोक सरप, सुभाष काशीद, सुनील जानोरकर, गिरीश मोगरे, जव्वाद हुसेन आदी उपस्थित होते.





आढावा बैठक 


तत्पूर्वी झालेल्या आढावा बैठकीला अध्यक्ष  तथा निमंत्रक समन्वय समिती अकोला राजेंद्र नेरकर, माजी अध्यक्ष सुभाष काशीद, कोषागार संघटना अध्यक्ष अशोक सराफ, सरचिटणीस म क र समिती नितीन निंबुळकर ,राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सुनील जानोरकर, महसूल कर्मचारी संघटना कार्याध्यक्ष मंगेश पेशवे, कोषाध्यक्ष सुभाष सिरसोई, ग्रामसेवक संघटना अकोला जिल्हा रवी काटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अकोला राजेश देशमुख, जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना अकोला गजानन उघडे, जिल्हाध्यक्ष वाहन चालक संघटना विलास वडतकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन संघटना गिरीश मोगरे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष उल्हास मोकळकर, विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन अकोला शेख चांद कुरेशी, सफाई कर्मचारी संघटना पंचायत समिती अकोला विलास चावरे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 अकोला एस. ओ. डाबेराव, एस. एस. बाठे सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.डी .चव्हाण, प्रकल्प कार्यालय अकोला जी आर मोरे, पी.एम. बनसोड, एम व्ही बोपटे, ए .एम. कोरपे, अध्यक्ष  कर्मचारी महासंघ अकोला वाशिम, प्रसिद्धी प्रमुख आरोग्य कर्मचारी महासंघ अकोला वाशिम एस आर चंदन, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना कोषाध्यक्ष एस. एम. देशमुख, संतोष पाटील, आर डी काटे, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जी. डी. उघडे, जिल्हा परिषद अभियंता संघटना एम. एच. पुनसे, ए. बी. गुडधे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा, राज्य प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मारुती वरोकार, राज्य प्रवक्ता उर्दू शिक्षक संघटना जव्वाद हुसेन, संस्थापक सदस्य महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना रामदास वाघ आदी उपस्थित होते.





बेमुदत संपाचा निर्णय कायम


सोलापूर: आज 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निजीकक्षात शासकीय व निमशासकिय शिक्षक, शिक्षकेतर समन्वय सुकाणू समितीची बैठक संपन्ना झाली. या बैठकीत सुकाणु समितीचे सदस्य विश्वासराव काटकर अध्यक्ष अशोक दगडे, युनियनचे अध्यक्ष  बलराज मगर,  उमेशचंद्र चिलबुले, श्री अविनाश दोंड,  शिवाजी खांडेकर व इतर 11 सुकाणु समिती सदस्य सोबत चर्चा संपन्न झाली. त्यामध्ये समितीच्या वतीने केवळ जुनी पेन्शन योजना बाबत अग्रही चर्चा करण्यात आली. त्याशिवाय इतर चर्चा झाली नाही. याबाबतचे सविस्तर इतिवृतांत मुख्य सचिव  मनुकुमार श्रीवास्तव यांनी मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री यांना अवगत केले. त्यानुसार विधानभवन येथे 12.30 वाजता मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री विधानसभा व  विधानपरिषद विरोधी पक्ष नेते यांच्या सोबत दिड तास चर्चा झाली. यामध्ये कर्मचारी यांच्या सुरक्षतेची जबाबदारी तत्वतः मान्य करुन 2005 नंतर मयत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियाना पुर्वलक्षी प्रभावाने कुटूंब निवृत्ती वेतन शासनाकडून देण्यात येईल असे स्पष्टता केले आहे. परंतु जुनी पेन्शन देण्यासाठी अभ्यास गट समिती पुढील नियोजनासाठी नेमण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री  व  उपमुख्यमंत्री यांनी केले आहे.  चर्चेस गेलेल्या सुकाणू समितीने स्पष्ट नकार दिले आहे. समिती आपल्या निर्णयास ठाम राहील्याने आजच्या चर्चामध्ये अपेक्षीत निर्णय न मिळाल्याने समितीने आपला बेमुदत संप कायम ठेवला आहे त्यामुळे उद्या  14 मार्च 2023 पासून सर्व जिल्हा परिषद (मुख्यालय) व सर्व पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी यांनी संपात सहभागी होऊन संप यशस्वी करण्यात यावे,असे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, सलग्न व मित्र संघटना विवेक लिंगराज सरचिटणीस रामचंद्र मडके संपर्क सचिव बाबुराव पुजरवाड कार्याध्यक्ष बजरंग संकपाळ राज्य संपर्क प्रमुख बलराज मगर अध्यक्ष विजय कुमार हळदे कोषाध्यक्ष यांनी केले आहे.





टिप्पण्या