kuran- forest- area- wild -life : वन क्षेत्रातील 'कुरणाचे कुंपण' करणार 'शेताची राखण'






डॉ. मिलिंद दुसाने

अकोला दि.29: ‘कुंपणानेच शेत खाल्ले' ही एक प्रचलित म्हण...आणि वन्यजीवांकडून होणारे पिकांचे नुकसान ही शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फिरवणारी बाब. वारंवार उद्भवणाऱ्या या संघर्षावर उपाय म्हणून वन हद्दीतच 'कुरण विकास कार्यक्रम'  वन विभाग राबवित आहे. आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून हे वनांतील 'कुरणांचे कुंपण शेताची राखण' करणार आहे.


वन्यजीव शेतात शिरुन पिके खातात वा रानडुकरांसारखे प्राणी नासाडीही करतात. शेतकऱ्यांसाठी हा मोठा संघर्षाचा प्रसंग असतो. याच मुद्यावरुन



वन विभागालाही शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. रहदारीचे नियम वा प्रवेश बंदी या सारख्या उपाययोजना वन्य प्राण्यांवर कशा लादायच्या? त्या तशा अशक्यच. पण ज्या अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शेतीकडे वळतात ते अन्न म्हणजेच 'गवत' त्यांना वन हद्दीतच उपलब्ध व्हावे,यासाठी वन विभागाने कुरण विकास कार्यक्रम राबविला आहे. अकोला जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात  90 हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यात 85 हेक्टर वनक्षेत्रावर वन्य प्राण्यांचे खाद्य असणारे गवत लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. सन 2022- 23 मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला असून व आता सन 2023-24 मध्ये दुसरा टप्पा सुरु झाला आहे.


दोन टप्प्यात कुरण विकास 



पहिल्या टप्प्यात सन 2022-23 मध्ये बोरगाव (20 हेक्टर), बाभुळगाव (25 हेक्टर), सोनखास (30 हेक्टर) या प्रमाणे व  याशिवाय बाभुळगाव मध्येच अतिरिक्त 15 हेक्टर क्षेत्रात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतूनही  कुरण विकास करण्यात आले असून एकूण 90 हेक्टर क्षेत्रावर कुरणांचा विकास करण्यात आला आहे.  या कुरण विकास कार्यक्रमाला 1 कोटी 20 लक्ष रुपये इतका खर्च आला आहे.


दुसऱ्या टप्प्यात पातुर (20 हेक्टर), सोनखास (30 हेक्टर), परांडा (35 हेक्टर) अशी 85 हेक्टरवर कुरण विकास कार्यक्रम राबविला जात आहे.


असा होतो 'कुरण विकास'


कुरण विकासात गवताचे बी पेरले जाते. त्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील मोकळ्या जमिनींची नांगरणी करुन त्यावर सरी पद्धतीने गवत बी पेरले जाते. साधारण एक मिटर अंतरावर ह्या सरी पाडल्या जातात. काही वेळा गवताचे रोप तयार करुनही लागवड केली जाते. पाऊस पडण्याच्या आधीच हे काम केले जाते. पाऊस आल्यावर गवत अंकुरते. या कालावधीत तेथे प्राण्यांचा वावर होऊ दिला जात नाही. गवत मोठे झाल्यावर त्याचे बी पुन्हा जमिनीत पडते. पुढल्या पावसात हेच बी पुन्हा अंकुरते आणि गवताची घनता वाढते. साहजिकच हे गवत वन्य प्राण्यांचा अन्नाचा शोध सुरु होतो तेव्हा त्यांना खाता येते. या जादाच्या वेळात तिकडे शेतांमधील पिके शेतकऱ्यांच्या हाती आलेली असतात आणि नुकसान टळलेले असते.


विविध गवतांची लागवड


कुरण विकास करतांना वन्य प्राण्यांना (तृणभक्षी) आवडते असे गवत लागवड केले जाते. त्यात  मारवेल, मोती तुरा, पौन्या, काळी मुसळी, जंगली हरळी, गोंडे गवत, राई गवत, सोंद्री गवत, लहान गवत, गोंधळ, तिखाडी, वैद्य गवत या लागवड करता येणाऱ्या गवताच्या जाती आहेत. याशिवाय रान तूर, रान मुग, रान सोयाबीन, रान शेवरी या जंगली जातीही उगवत असतात. ही सर्व गवते वन्य प्राणी आवडीने खातात.


पाळीव जनावरांसाठीही चारा उपलब्धता 



केवळ वन विभागातील जनावरे शेतात जाऊन पिके खातात असे नव्हे तर गावातील पाळीव जनावरे (गाय, बैल, म्हैस इ.) सुद्धा वन हद्दीत चरावयास जातात. त्यांच्या तेथील कुरणात वावरण्याने त्यांच्या खुरांखाली गवत दाबले जाते. जमिन कडक होऊन उगवण कमी होणे, अशा समस्या निर्माण होतात. त्यासाठी वन विभाग  लिलाव पद्धतीने लगतच्या ग्रामस्थांना 'कापा आणि घेऊन जा', या तत्त्वावर गवत नेण्यास परवानगी देतात. त्यामुळे गावातील पाळीव जनावरांनाही चारा उपलब्ध होऊन गावातील लोकांना रोजगारही मिळतो, असे सहा. वनसंरक्षक  सुरेश वडोदे यांनी सांगितले.


वन्य प्राण्यांना अन्न उपलब्धता हाच उद्देश 



मुळात वन्य प्राणी हे जंगलात खाद्याचे दुर्भिक्ष्य झाले की, मगच मानवी वस्त्यांकडे म्हणजेच शेतांकडे जातात. त्यासाठी त्यांना दुर्भिक्ष्य कालावधीत पुरेसे खाद्यान्न उपलब्ध करणे हाच या कुरण विकासाचा उद्देश आहे. जेणे करुन ते शेतांकडे जाणार नाही. जंगलांची घनता कमी होणे, जैविक ताणात वाढ, तापमानात होत असलेले बदल  यासर्व पर्यावरणीय कारणांमुळे खाद्य गवत कमी होते. त्यासाठी कुरण विकास कार्यक्रम राबवून गवत  लागवड व संवर्धन केले जात आहे, असे उपवनसंरक्षक अर्जूना के. आर. यांनी सांगितले.


      

टिप्पण्या