kumar vishwas kavya kalash: अकोलेकरांना मिळणार डॉ.कुमार विश्वास यांच्या 'काव्य कलश' ची निःशुल्क मेजवानी; तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे आयोजन






ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

भारतीय अलंकार 24

अकोला: तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांचे शुक्रवार 24 फेब्रुवारी 2023 रोजी अकोला शहरात 'काव्य कलश ' कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. हे कवी संमेलन कवी रसिकांसाठी निःशुल्क असून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी माहिती तीक्ष्णगत सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुगत वाघमारे यांनी भारतीय अलंकार सोबत संवाद साधताना दिली.



20 वर्षापासून सामजिक कार्य 



तिक्षणगत संस्था मागील 20 वर्षांपासून अकोला जिल्ह्यात बालक, महिला आणि उद्योग या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करीत आहे. संस्थेच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच श्रृंखलेत येत्या शुक्रवारी 24 फेब्रुवारी रोजी प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या 'काव्य कलश'  या हिंदी मराठी कवी संमेलनाचा कार्यक्रम गोरक्षण रोडवरील गोरक्षण संस्थेच्या मागील मैदानात सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. बालकांच्या हक्कासाठी जनजागृतीपर या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 




कविता तिवारी, रमेश मुस्कान, सुदीप भोला आणि कुशल कुशवाहा यांचा समावेश 



या कवी संमेलनात कुमार विश्वास यांच्या सोबत काही प्रख्यात हिंदी आणि मराठी कवींही सहभागी होत आहेत. अकोलेकरांसाठी ही जणू एक पर्वणीच आहे. यावेळी कविता तिवारी, रमेश मुस्कान, सुदीप भोला आणि कुशल कुशवाहा हे नामवंत कवीही उपस्थित राहणार आहेत. अकोल्यातील काव्य रसिकांनी या कवी संमेलनास बहु संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी सुगत वाघमारे यांनी केले.



सुगत वाघमारे यांच्या 'सिरत' चे प्रकाशन 



या संमेलनात सुगत वाघमारे यांच्या हिंदी मराठी गझल-कविताचा संग्रहाचे कुमार विश्वास यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संग्रहाचे संपादन गझल नवाज भिमराव पांचाळे यांनी केले आहे.




दहा हजार नागरिकांची हजेरी! 




काव्य कलश कवी संमेलन हे सर्व कवी रसिकांसाठी खुले असून, प्रवेश निःशुल्क असणार आहे. दहा हजार नागरिक संमेलनला हजेरी लावतील असा अंदाज  वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी सात हजार खुर्च्या, सोफा अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व लोकांना हा कार्यक्रम बघता यावा यासाठी मोठया LED screen लावण्यात येत आहेत. महिला, मुली यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. वाहनतळ सुविधा देखील निःशुल्क राहणार आहे. रसिकांची गैरसोय टाळण्यासाठी इतर आवश्यक सुविधा व सेवा येथे उपलब्ध राहणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. 






मुख्य आयोजक उद्योजक सुगत वाघमारे यांच्या सह संस्था सचिव विष्णुदास मोंडोकार, श्रीकांत पिंजरकर, ॲड. नितीन धूत, विशाल शिंदे, अश्विन शिरसाट आदि कार्यक्रम यशस्वितेसाठी अहोरात्र झटत आहेत.





टिप्पण्या