akola court: जबरदस्तीने विषारी औषध पाजुन जिवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीची 14 वर्षानंतर निर्दोष मुक्तता

आरोपीचे वकिल देवानंद डी. गवई




भारतीय अलंकार 24

अकोला: महिलेच्या घरात घुसून तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आरोपी रामेश्वर ज्ञानेश्वर गवई यांची न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे.



विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी पंतगे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. देवानंद डी. गवई यांनी मांडली. या प्रकरणातून आरोपीची  तब्बल 14 वर्षांनी निर्दोष मुक्तता झाली आहे.



आरोपी रामेश्वर ज्ञानेश्वर गवई रा. कवठा सोपीनाथ ता. मुर्तीजापुर जि. अकोला यांच्यावर असा आरोप होता की, त्याने फिर्यादी नामे वर्षा दिलीप धंदर रा. कवठा सोपीनाथ या महीलेच्या घरात दि. 31.10.2009 रोजी दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान बेकायदेशीररित्या प्रवेश करून तिला मारहाण केली आणि त्याने संडासच्या डब्यात विषारी औषध आणुन सदर विषारी औषध तिला बळजबरीने पाजले आणि तिच्या अंगावर बसुन तिला मारहाण केली त्यावेळी तिचा लहान मुलगा हा त्याठिकाणी आला आणि त्याने शेजारी पाजारी लोकांना आरडाओरड करून बोलावले असता आरोपी रामेश्वर गवई त्याठिकाणावरून पळुन गेला. त्यानंतर फिर्यादी महीलेला गंभीर अवस्थेत तिचे पती व सासु सासरे, सरपंच व इतर नातेवाईकांनी प्रथम मुर्तीजापुर उप जिल्हा रूग्णालय व त्यानंतर अकोला सर्वोपचार रूग्णालय तथा वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे उपचाराकरीता भरती केले होते. 




सदर रिर्पोट वरून पोलीस स्टेशन माना येथे आरोपी विरूध्द भादंविच्या कलम 452, 354, 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला अटक करून व तपास करून दोषारोप पत्र आरोपी विरूध्द जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. बी. पंतगे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते व न्यायालयाने सदर प्रकरणात एकुण 9 साक्षीदार तपासले. परंतु आरोपीचे वकील ॲड. देवानंद डी. गवई यांनी फिर्यादी व इतर सरकारी साक्षीदार यांची उलट तपासणी घेवुन व युक्तीवाद करून आरोपीवर असलेले आरोप खोडून काढले आणि आरोपीला कशाप्रकारे खोटया गुन्हयात अडकविण्यात आले हे सिध्द करून दाखविले. आरोपीचे वकील ॲड. देवानंद डी. गवई यांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी विरूध्दचा गुन्हा सिध्द न झाल्याने विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पंतगे यांच्या न्यायालयाने आरोपीची सदर प्रकरणातुन निर्दोष मुक्तता केली.


टिप्पण्या