yuva sahitya sammelan akola 2022: युवकांनी साहित्यातून वास्तवाचं भान जपावं : अरविंद जगताप; राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन





भारतीय अलंकार 24

अकोला : युवकांनी डोळसपणे सभोवताल अनुभवयाला हवा. आज कुठल्याही विषयावर समाजमाध्यमांमध्ये चर्चांचा वादंग माजला असतो, मात्र त्यापलीकडे असलेल्या वास्तवाचे भान अंगी आणणे आवश्यक आहे. केवळ कपाळीवरील टिकलीवर वाद करत बसण्यापेक्षा शेतकरी भगीनींच्या कपाळावरलं कुुंकू पुसल्या जात आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच दाहक वास्तव अजून संपलं नाही. निव्वळ लिखाणापेक्षा साहित्यातून वास्तवाचं भान जपण्याची खरी गरज असल्याचे परखड मत राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी केले.



      

स्व. बाजीराव पाटील साहित्य नगरी प्रभात किड्स येथे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.  



संमेलनाच्या विचारपीठावर उद्घाटक युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर, प्रमुख अतिथी अमरावती विभागाचे आयुक्त आणि ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे, आ. रणधीर सावरकर, स्वागताध्यक्ष संग्राम गांवडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष  प्रदीप दाते व संमेलन आमंत्रक डॉ. रवींद्र शोभणे, मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, सरचिटणीस विलास मानेकर, समन्वयक सीमा शेटे-रोठे यांच्यासह विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोल्याचे पदाधिकारी साहित्यपीठावर उपस्थित होते.



  

साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जीवनस्पर्शी अनुभव  मिळत असून युवा लेखकांच्या संवेदनेला धुमाळे फुटण्यास साह्यभूत ठरेल, असा आशावाद संमेलनाचे उद्घाटक युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी केले.



    

वर्‍हाडाला साहित्याचं लेणं लाभलं आहे. युवा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवकांना नवीन व्यासपीठ उपलब्ध झालं असल्याचे प्रतिपादन अमरावती विभागाचे आयुक्त आणि ज्येष्ठ कमी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.  दगडामधला अनावश्यक भाग काढून टाकला की शिल्प  होतं अन् आयुष्यातील अनावश्यक भाग काढून टाकला की साहित्य होत असून ते जीवननिष्ठ असते. लिखानासाठी पोषक वातावरण धुंडाळण्यापेक्षा जगण्याच्या कोलाहलात साहित्याची निर्मिती व्हावी, असे  डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी नमूद केले.



   

साहित्य माणसाला संवेदनशील बनविते. साहित्य विचाराची दिशा बदलू शकते. राजकारणात दोन पावलं पुढ राहणाऱ्यांना कुठतरी मागं वळून बघायला शिकवण्याचं कार्य साहित्यातून घडत असल्याचे प्रतिपादन स्वागताध्यक्ष संग्राम गांवडे यांनी त्यांच्या मनोगतातून केले. वायुसारखा चपळ तो युवा असतो. पांढरपेश्या समाजात जन्मदात्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला जातो; मात्र शेतकर्‍यांचा जन्मदाता कधीच वृद्धाश्रमाची पायरी चढत नसल्याचे सांगून त्यांनी वृद्धाश्रम व्यवस्था समाजातून बंद व्हावी, असा आशावाद व्यक्त केला.  


   

तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन संमेलनाची रितसर सुरवात झाली. संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून संमेलनाच्या आयोजनाची रुपरेषा स्पष्ट केली. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. प्रदीप दाते व संमेलन आमंत्रक डॉ. रवींद्र शोभणे यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले तर समन्वयक सीमा शेटे-रोठे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. गिरीश गांधी यांच्या शुभेच्छा संदेशाचे अभिवाचन केले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे संचालन अ‍ॅड. वल्लभ नारे यांनी केले तर विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोल्याचे अध्यक्ष विजय कौसल यांनी आभार मानले.



   

उद्घाटन सत्राला डॉ. नानासाहेब चौधरी, प्रा. मधू जाधव, बाजी वझे, सचिन बुरघाटे, प्राचार्य रामेश्वर भिसे यांच्यासह ज्येष्ठांनी आणि युवकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.  




संमेलन गीताने बहारदार सुरवात 



कवी किशोर बळी लिखित व अभिजीत भोसले यांनी संगीतबद्ध केलेल्या भावस्पर्शी संमेलन गीतावर प्रज्योत देशमुख, विजय वाहोकार, अतुल डोंगरे, सीमा इंगळे व रश्मी देव यांनी स्वरसाज चढविला तर प्रभातच्या नृत्यशिक्षिका श्रुती गोरे यांनी या गीतावर नृत्य सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळविली.  



राष्ट्रगौरव दिंडीतून झाला लोकसाहित्याचा जागर 


  

राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन पूर्व कार्यक्रमात निघालेल्या राष्ट्रगौरव दिंडीत विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, लेझीम पथके सहभागी झालीत. राष्ट्रगौरव दिंडीत सहभागी मान्यवरांच्या हस्ते विविध दालनांचे उदघाटन झाले. यामध्ये वैदर्भी दालन, पुस्तक प्रकाशन दालन, कवीकट्टा, गझलकट्टा, वर्‍हाडीकट्टा इत्यादी दालनास साहित्य प्रेमींचा प्रथम दिवशीच भरघोस प्रतिसाद लाभला.


टिप्पण्या