Vishal-Kaple-murder-case- Akola: विशाल कपले हत्याकांड : युवासेनेच्या माजी उप जिल्हाप्रमुखासह आणखी चार संशयितांना अटक, पाचही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी



ठळक मुद्दा 
तब्बल 23 दिवसांनी  पोलिसांनी युवासेनेच्या माजी उप जिल्हा प्रमुखासह आणखी चार संशयितांना अटक केली.



भारतीय अलंकार 24

अकोला : शहरातील जठारपेठ भागात असलेल्या गणेश स्वीट मार्ट परिसरात शिवसेना (ठाकरे) गटाचे उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर ३१ ऑक्टोंबर रोजी दोन युवकांनी चाकू हल्ला केला होता. उपचार दरम्यान विशाल कपले यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर दोन आरोपींना कारंजा येथुन ताब्यात घेण्यात आले. आता तब्बल 23 दिवसांनी  पोलिसांनी युवासेनेच्या माजी उप जिल्हा प्रमुखासह आणखी चार संशयितांना अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालया समोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


जठारपेठ भागात घडलेल्या विशाल कपले हत्याकांडातील मुख्य आरोपी शिवानंद मनोहर दोरवेकर आणि विनोद कांबळे या दोघांना वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथुन अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान आता युवासेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखासह चार जणांना पोलिसांनी अटक केली असुन, विशाल कपले हत्याकांडात आतापर्यंत सात आरोपी गजाआड झाले आहेत. सीडीआर आणि एडीआर तपासल्यानंतर अटक केलेल्या पाच जणांनी हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. आरोपींना अटक करण्याची कारवाई रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके, पीएसआय संजीवनी पुंडगे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. 



 


घटनेचा व्हिडीओ व्हायरल 


31 ऑक्टोबर रोजी जठारपेठ चौकात दोघांनी विशाल कपले यांची चाक़ू भोसकून हत्या केली होती. विशाल कपलेंना ठार मारतानाचा थरारक व्हिडीओही समोर आला होता. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उपशहरप्रमुख विशाल कपले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद मनोहर दोरवेकर आणि विनोद कांबळे हे याआधीच पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून साक्षीदारांचे जबाब आणि सीडीआर-एसडीआर अँनलिसिस केले. यामध्ये विशाल कपले यांच्या हत्येचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कलम १२० (ब) भादंवि वाढविण्यात येवून पाच आरोपींना अटक केली आहे. 



 या आरोपींचा कटात सहभाग!


संशयित आरोपींमध्ये ज्ञानेश्वर पांडुरंग वानखडे (वय ४४), अभिषेक तानाजी जगताप (वय ३४), रोहन गजानन इंगळे (वय २५), अश्विन उर्फ छोटू बळीराम कपले (वय ३३), गोवर्धन जनार्धन कपले (वय ४४) यांचा समावेश आहे.  सर्व मोठी उमरी परिसरातील रहिवासी आहेत. बुधवारी रात्री पोलीसांनी या पाचही आरोपींना अटक केली आहे. यातील अश्विन कपले हा आरोपी युवासेनेचा माजी उपजिल्हाप्रमुख असून ते शिवसेनेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.




 

अवैध धंदेचा विरोध बेतला जीवावर  


उमरी परिसरात सामाजिक कार्यात विशाल कपले हा अग्रेसर होता. उमरी, गुडधी परिसरात चालणाऱ्या ढाब्यावरील अवैध दारू विक्री, वरली मटका याविषयी विशाल कपलेने अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. तसेच या अवैध धंद्यांचा विरोध सुद्धा केला होता, यासर्व पार्श्वभूमीवर विशाल कपलेची हत्या झाली असल्याचा संशय उमरी परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. विशाल कपलेची सुपारी देवून हत्या करण्यात आली का? यामागे खरंच अवैध धंदे कारणीभूत आहेत की, राजकीय पूर्व वैमनस्यातून हत्याकांड घडले की, कौटुंबिक वाद यास कारणीभूत आहेत,हे सर्व कंगोरे पोलीस तपासत असून, लवकरच हत्याकांड मागील कारण समोर येईल. यामध्ये आणखी आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या