varhad sahitya sammelan akola city: लोककला हे लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे अविभाज्य अंग - गणेश चंदनशिवे

तिसरे वऱ्हाड साहित्य संमेलन: लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख  


       

भारतीय अलंकार 24

अकोला: प्रयोगात्मता हा लोककलांचा मूळ प्रकृतीधर्म आहे. लोककला हे लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. समूहमन आविष्कृत होते ते लोककला, लोककथा, लोकगीतांमधून. लोककला कालसंवादी, सहजस्फूर्त आणि उस्फूर्त असतात. महाराष्ट्राने ही संस्कृती परंपरा जोपासली आहे. आणि हा वारसा पुढल्या पिढीकडे सोपविणे हे आपले कर्तव्य आहे,असे विचार लेखक, कवी, गीतकार, गायक तथा लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केले.


अकोला येथे बुधवारी आयोजित तिसरे वऱ्हाड लोककला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून डॉ. चंदनशिवे बोलत होते.


डॉ.चंदनशिवे पुढे म्हणाले की, शाहिरी काव्यामध्ये महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास मांडला आहे. एकनाथांनी भारुडामधून मनोरंजन सोबतच समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले आहे. 


' दिवानी मस्तानी' ची भुरळ 


डॉ. चंदनशिवे यांनी यावेळी आपल्या भारदस्त आवाजात  हिंदी चित्रपट बाजीराव मस्तानी मधील 'दिवानी मस्तानी' गाणे गावूंन चाहत्यांना भुरळ घातली. यावेळी हा क्षण चाहत्यानी कॅमेराबद्ध केला. हजारों हात हा प्रसंग टिपण्यासाठी उंचावले होते. दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग, संजय लीला भन्साळी यांच्या सोबतच्या भेटीची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.



लोककला जपली पाहिजे. 



ग्रामीण संस्कृतीची खरी ओळख म्हणजे लोककला. ती लोककला टिकली पाहिजे, ती लोककला जपली पाहिजे. या उद्देशाने वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था लोणी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व श्री शिवाजी कला महाविद्याया तर्फे अकोला येथे एक दिवसीय तिसरे वऱ्हाड लोककला साहित्य संमेलन अतिशय थाटात संपन्न झाले.




प्राचीन लोकसाहित्य

     

'हल्या हाल्या दुदू दे' या कादंबरीचे लेखक ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. शेतकऱ्यांचा मुख्य सण पोळ्याला महादेवाच्या गाण्यातून, उताऱ्यातून शेतकरी कसे शेतीचे दुःख मांडतो, तसेच पंचमीच्या सणाला ठाव मांडून बाऱ्या मध्ये म्हटली जाणारी गाणी कशी मनाचा ठाव घेत होती हे सांगितले. भुलाबाईची गाणी, फुगडीगीते, लग्नगीते, पाळणागीते, हे खरे प्राचीन लोकसाहित्य असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. 



संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शिवाजी महावि्यालयाचे प्राचार्य अंबादास कुलट हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे व डॉ केशव देशमुख हे होते. 

          


लोककलाचे सादरीकरण 


संमेलनाच्या विचारपिठावर जय भवानी मंडळ अकोला यांनी देवीचा गोंधळ सादर केला. या गोंधळाला रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दिव्यांग सोशल फाऊडेशन अकोला तर्फे वैभवी गवई यांनी अतिशय सुंदर लावणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. गुरुदेव भजन मंडळ राहित व मोरगाव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने सादर केली. मथुरा लभाण लोकनृत्य मंडळ पाळोदी यांनी लोकनृत्य सादर केले. तसेच भारुड सुद्धा झाले.

       



भाषा समिती विषयक ठराव


समारोपीय सत्रामध्ये भाषा समिती विषयक ठराव पारित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गणेश चंदनशिवे, प्रा डॉ हेमंत खडके, संमेलनाचे आयोजक डॉ रावसाहेब काळे डॉ अंबादास कुलट हे विचार पिठावर उपस्थित होते. डॉ गजानन नारे, प्रा सदाशिव शेळके, डॉ मधु जाधव, आबासाहेब कडू, प्रा महादेव लुले, प्रा संजय कावरे, सीमा शेठे, मधुराणी बनसोड, विद्या बनफर, संदीप देशमुख, विठ्ठल कुलट, हिंमत ढाले, तुळशीराम बोबडे, सुहास उगले, डॉ . विनय दांदडे ,प्रा. निलेश कवडे , आबासाहेब कडू, प्रा. किशोर देशमुख आदी उपस्थित होते.




वऱ्हाडी स्वागत गीत 



संमेलनात डॉ. आनंदा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली NCC पायलेटींग व प्रा. भुतेकरांच्या मार्गदर्शनात NSS चे ढोल पथकास पाहुण्यांचे थाटात आगमन झाले.पाहुण्यांचे स्वागत ख्यातनाम विठ्ठल वाघांनी लिहिलेत्या वऱ्हाडी स्वागत गीताने करण्यात आले. प्रा. मानकर व त्यांच्या चमूने गीत गायिले. रागिनी खोडवे श्रुती बुडखले वैष्णवी लोंढे ऋतुजा ठाकरे या विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता.वाद्य साथसंगत तबला प्रवीण वंडाळे यांनी दिली.




टिप्पण्या