children day 2022: 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान जागतिक बालहक्क सुरक्षा सप्ताह!

.  File photo 


ठळक मुद्दे 

जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, महिला व बालविकास विभाग तथा तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आयोजन



भारतीय अलंकार 24

अकोला :  बालदिनाचे औचित्य साधून  सोमवार 14 नोव्हेंबर ते रविवार 20 नोव्हेंबर दरम्यान महानगरात जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, महिला व बालविकास विभाग आणि तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अंतर्गत चाईल्ड लाईन  व रेल्वे चाईल्ड लाईन 1098, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बालहक्क सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.



या उपक्रमांतर्गत सोमवार 14 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बाल हक्क सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन, बाल हक्क सुरक्षा प्रचार रथाचे उद्घाटन, पथनाट्य सादरीकरण, अलाईड, सिस्टीम चाईल्ड लाईनसे दोस्ती बॅन्ड बांधणी व बॅच लावणे, स्वाक्षरी अभियान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर सम्यक संबोधी वाचनालय हॉल येथे बालकांचे अधिकार विषयक चित्रकला पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. 



मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी समाज कल्याण मुलींचे वसतीगृह येथे बालविवाह  मुक्त भारत व पोक्सो कायदा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम, बुधवार 16 नोव्हेंबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात एएनएम, जीएनएम नर्सेस यांना पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन, गुरुवार 17 नोव्हेंबर रोजी अकोला लॉ कॉलेज येथे बालकांचा कायदा आणि वकिलांची भूमिका या विषयावर कुशल जैन यांचे मार्गदर्शन, शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वे स्थानक  येथे मानवी तस्करी विरोधी जनजागृती कार्यक्रम, तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी कार्यालयात 5 ते 12 आणि 13 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘माझा हक्क माझी सुरक्षा’ या विषयावर मुलांची मते समाज माध्यमावर मागविण्यात येणार आहेत. 


शनिवार 19 नोव्हेंबर रोजी कृषी नगर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेत  बालकांचे कायदे व हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रविवार 20 नोव्हेंबर रोजी सिव्हिल लाईन बालस्नेही पोलिस केंद्र येथून रन फॉर चाईल्ड ही वॉकथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. 


.  File photo 


बालक दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमांमध्ये अकोला महानगरातील सर्व स्तरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध  स्वयंसेवी संस्था व संघटना यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या