akola crime: अवैध दारु विक्रेत्याची पोलिसात तक्रार करणे बेतले जीवावर! शिवसेना पदाधिकारी विशाल कपलेची हत्या, दोन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात




भारतीय अलंकार 24

अकोला : शहरातील वर्दळीचा आणि नेहमीच गजबजलेला जठारपेठ चौक परिसरात रविवारी भर सायंकाळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अकोला उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. या संपुर्ण घटनेमुळे अकोला शहर हादरून गेले आहे. दरम्यान प्रकरणातील दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.



प्राप्त माहितीनुसार विशाल रमेश कपले (वय अंदाजे 33 वर्ष) हे रविवारी सायंकाळी मोठी उमरी भागातून दुचाकीने शहरातील जठारपेठ चौक परिसरातील कोरडे हॉस्पिटल गल्लीत गणेश स्वीट मार्ट जवळ कामानिमित्त आले होते. दरम्यान उमरी मधील महाकाली मंदिरापासून दोन ते तीन युवक त्यांचा पाठलाग करीत होते. कोरडे हॉस्पिटल गल्लीत कपले गाडी वळवित असताना अज्ञात मारेकऱ्यांनी हाच डाव साधत त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. प्रथम पाठीमागून येत पाठीत चाकू खुपसला आणि नंतर छातीत चाकूने वार केले. पाठीवर आणि छातीवर सपासप वार झाल्याने कपले जागीच कोसळले. यानंतर  काही नागरिकांनी त्यांना उचलून उपचारासाठी शहरातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


अवैध दारु विक्रीची तक्रार कारणीभूत?



अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमरी परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांची कपले यांनी एका व्यक्तीच्या मार्फत पोलिसात तक्रार दिली होती. ज्या व्यक्तीने कपलेच्या वतीने तक्रार केली होती, त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र पोलिसांना दिले होते. या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने अखेर प्रकरणाचा शेवट हत्येने झाला. दरम्यान अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन संशयित हल्लेखोराला पोलीसांनी चौकशी कामी रात्री ताब्यात घेतले होते.



पोलिसांना आव्हान!


एकीकडे दिवसरात्र पोलीसांची शहरात गस्त सुरू असताना वर्दळीच्या रस्त्यावर भर सायंकाळी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखांच्या हत्येने गुन्हेगारांनी पोलिसांना जणू आव्हानच दिले आहे. यापूर्वी ऑगस्ट मध्ये न्यू तापडिया नगरात विनोद टोबरे हत्याकांड सायंकाळी घडले होते. नुकतेच बार संचालक नितीन शहाकर यांच्यावर बार मध्येच सर्वांदेखत गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी प्राण घातकहल्ला केल्याची घटना घडली. सामान्य नागरिकाना रस्त्यावर फिरत असताना उघड्या डोळ्यांनी प्राणघातक हल्ला, हत्याकांड असे गंभीर प्रकार पाहावे लागत आहेत. शहरात वारंवार अश्या घटना घडत असल्याने सामान्य नागरीक पुरते हादरले आहेत. एकंदरीतच अकोल्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केवळ गस्त वाढवून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर अंकुश बसणार नाही तर पोलीस विभागाने गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर करडी नजर ठेवणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.



अतिरक्तस्त्रावाने कपले यांचा मृत्यू !


घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने विशाल कपले यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान डॉक्टरांनी विशाल कपले यांना मृत घोषित केले.




राजकीय वर्तुळात चर्चा 

विशाल कपलेवर झालेला हा हल्ला प्राथमिक दृष्ट्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. अनेक दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये आणि विशाल कपलेंमध्ये वाद सुरु होते. त्यावरून हा हल्ला झाला असण्याची शक्यता आहे. अलीकडे विशाल कपले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून भावनिक पोस्ट शेअर केल्या होत्या. दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी हॉस्पिटलसमोर गर्दी केली होती.



आरोपींना अटक 


या प्रकरणातील आरोपी 23 वर्षीय शिवानंद मनोहर दोरवेकर व 22 वर्षीय विनोद रमेश कांबळे (दोघेही राहणार महाकाली मंदिर मोठी उमरी) यांना पोलीसांनी कारंजा येथून ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या नेतृत्वात अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर,पोलीस कर्मचारी संदीप ताराळे, छोटू पवार, प्रशांत इंगळे यांनी केली. 


 





 



टिप्पण्या