Akola crime: murder - shivsena: शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्याची अकोल्यात गळा आवळून हत्या; वैद्यकिय अहवालात झाला उलगडा

                                             File pic 



भारतीय अलंकार 24

अकोला, दि.१:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना अकोल्यात गुरुवारी उघडकीस आली आहे.  भागवत अजाबराव देशमुख (वय २८, राहणार कौलखेड, अकोला.) असं मृतक युवकाचे नाव आहे. 


दरम्यान, हत्या करून भागवतचा मृतदेह तलावाच्या पाण्यात राहिल्याने त्याची ओळख पटू शकली नाही, त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. या प्रकरणी अकोल्यातीलच पातुर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


प्राप्त माहितीनुसार २७ ऑगस्टला पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र, वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत.


दरम्यान, तलावाच्या पाण्यात दोन दिवसापासून मृतदेह पडून असल्याने युवकाची ओळख पटवणे पोलिसांसाठी जिकरीचे झाले होते त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर २९ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार केले. दरम्यान ३० ऑगस्ट रोजी  पोलिसांनी परत घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरातील पाहणी केली. यावेळी अर्धा किलोमीटर अंतरावर एका रुमालात आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या. या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो युवक बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातीलच खदान पोलीस स्टेशन येथे दाखल होती. त्यामुळे भागवत अजाबराव देशमुख अशी या युवकाची ओळख पटली.


 

भागवत देशमुख गेल्या २५ ऑगस्ट पासून बेपत्ता होता, नातेवाईकांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र तो आढळून आला नव्हता.अखेर नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी नातेवाईकांना या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की भागवत याची हत्या झाली असून तेव्हा कुठलीही ओळख न पटल्याने पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. हे समजतात कुटुंबीयांना धक्का बसला.

 

पातुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत देशमुख याची अज्ञात व्यक्तींनी आधी गळा आवळून हत्या केली.  त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींच्या विरुद्ध हत्याचे गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, भागवतची हत्या २५ ऑगस्ट रोजी झाली असावी, असा पोलीसांनी अंदाज व्यक्त केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या