- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
डाबकीरोडवासी व जय भवानी मित्र मंडळाची कावड राहणार आकर्षण
महिला मंडळाचे पहिले कावड गांधीग्राम साठी रवाना
उज्जैन ते अकोला पायदळ कावड यात्रा गांधी ग्राम मधून निघाली
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला, दि.२१: वाघोलीतील पूर्णा नदीचे पवित्र जल आणून आराध्य ग्रामदैवत श्री राजराजेश्वराला श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. याकरिता हजारों कावडधारी रविवारी दुपारपासून गांधीग्रामकडे रवाना झाले आहेत. उद्या सकाळी अकोला शहारात कावडधारी पोहचणार आहेत. यानिमित्त शिष्टबद्धरित्या हर बोला महादेवच्या गजरात शहरात कावड व पालखी मिरवणूक निघणार आहे.
यंदाच्या सोहळ्यात जवळ्पास ११० पालखी निघणार आहेत. तर १५ मोठ्या पालखी राहणार आहेत. अन्य शेकडो छोट्या मोठ्या पालखीचा सहभाग राहणार आहे. यामध्ये डाबकीरोडवासी मंडळाची भव्य अशी तीन हजार भरण्याची कावड राहणार आहे.तर जय भवानी मित्र मंडळाची २७०० भरण्याची कावड पालखी मिरवणूकचे आकर्षण राहणार आहे.
महिला कावडधारींचा सहभाग
अकोला शहरापासून पासून १७ किलोमीटर अंतरावरील गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी यंदा ५० ते ६० महिला शिवभक्त कावड घेवून रवाना झाल्या आहेत. यामध्ये ५२ भरण्याची कावड घेऊन महिला शिवभक्त गांधीग्रामसाठी निघाल्या. यावेळी महिला शक्ती मंडळ अकोला अध्यक्ष मोहिनी मांडलेकर व इतर महिला भगिनीचा सहभाग आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाला पायदळ वारी
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ वा अमृत महोत्सव निम्मित श्री मार्कंडेश्वर शिवभक्त मंडळने उज्जैन - ओंकारेश्वर ते राजेश्वर नगरी (अकोला) पायदळ कावड यात्रेचे आयोजन केले. हे मंडळ गांधीग्राम येथे रविवारी दुपारी पोहचले. पूर्णा नदीचे पवित्र जल घेवून कावडधारी अकोला शहराकडे रवाना झाले.
कावडधारींच्या सेवेसाठी रुग्णवाहिका
हजारों शिवभक्ताच्या सेवेसाठी नीलेश देव मित्र मंडळाच्या वतीने निशुल्क रुग्णवाहीका गांधी ग्राम ते अकोला या कावड यात्रा मार्गावर सज्ज केल्या आहेत.
बचाव पथक सज्ज
पूर्णा नदीला पुर असल्याने कावडधारी सोबत अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली असून, नदीकाठी व पुलावर गांधीग्राम येथील बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.तसेच पोलीस विभागाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, गृहरक्षक दलाचे सहकार्य करीत आहे.
जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाने साकारला संत गजानन महाराज पालखीचा देखावा
लोकप्रतिनिधींच्या हस्ते कावडचे पूजन;असंख्य शिवभक्त गांधीग्रामकडे रवाना
शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला उद्या श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी जलाभिषेक केला जाणार आहे. पालखी व कावड महोत्सवाच्या निमित्ताने यंदा जुने शहरातील जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचा देखावा साकारण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी लोकप्रतिनिधींच्या हस्ते कावडचे पूजन केल्यानंतर मंडळाचे शिवभक्त गांधीग्रामकडे रवाना झाले.
श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वराला गांधीग्राम येथून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पवित्र जलाने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. पालखी व कावड महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील असंख्य शिवभक्त खांद्यावर पालखी व कावड घेऊन गांधीग्रामला रवाना होतात. कावडमध्ये पूर्ण नदीचे पवित्र जलभरून ती कावड खांद्यावरून पायी चालत अकोल्यामध्ये सोमवारी दाखल होतात. कावडद्वारे आणलेल्या पाण्याने श्री राजेश्वराच्या पिंडीला जलाभिषेक केला जातो. या महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील व जिल्हाभरातील शिवभक्तांमध्ये उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान संपूर्ण जिल्हा वासियांसाठी विशेष आकर्षण असलेल्या असंख्य पालख्या व कावड शहरात सोमवारी सकाळी दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरवासी सज्ज झाले असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. मागील २३ वर्षांपासून जुने शहरातील जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने गांधीग्राम येथून पायी चालत खांद्यावरून कावड आणली जात आहे. ही धार्मिक परंपरा यंदाही कायम असून मंडळाच्यावतीने शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचा देखावा सादर केला जाणार आहे. यामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातील २०० पेक्षा अधिक वारकरी तसेच टाळकरी सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी रविवारी सायंकाळी सात वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धनजी शर्मा, आमदार वसंतजी खंडेलवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, माजी उपमहापौर वैशाली शेळके, माजी नगरसेवक विलास शेळके, सतीश ढगे,तुषार भिरड, मनोज गायकवाड यांच्या हस्ते कावडचे विधिवत पूजन करण्यात आले.
पालखीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचा समावेश
यंदा जय बाभळेश्वर मंडळाने साकारलेल्या पालखी सोहळ्यात संत गजानन महाराज यांच्या पादुका तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचा समावेश करण्यात आला आहे. पालखीच्या समोर टाळकरी, मृदुंग वादक तसेच गायनाचार्य सहभागी होतील.
विठ्ठलाची 15 फूट उंच मूर्ती ठरणार आकर्षण
मंडळाच्या वतीने १०१ भरण्याची कावड गांधीग्राम येथून आणली जाणार आहे. तसेच विठ्ठलाची १५ फूट उंच मूर्ती असलेली झाकी अकोलीकरांसाठी आकर्षण ठरणार आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचीही झाकी सादर केली जाणार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा