OBC-political-reservation-bjp-Akola: ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली!अकोल्यात भाजप कार्यालयासमोर जल्लोष




अकोला, दि.२०: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून, या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. या निर्णयाचे अकोला भाजपाच्या वतीने स्वागत केले असून, शहरातील कार्यालयासमोर आतिषबाजी, मिठाई वाटप आणि वाद्यनाद करून जल्लोष करण्यात आला.


राज्यात रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्यासंदर्भात पावले उचलण्यासही न्यायलयाने सांगितले आहे. येत्या दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, असे आदेश देखील न्यायालयाने दिले असल्याने राजकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


दरम्यान भाजपा शिवसेना महायुतीने दिलेल्या शब्दानुसार ओबीसीचा राजकीय आरक्षण परत मिळून देण्यासाठी न्यायालयीन लढाईमध्ये विजय प्राप्त केला असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. भाजपा ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभार सांभाळल्यानंतर सर्वात आधी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्धार केला होता.  दिल्ली येथे जाऊन महाराष्ट्र शासनाचे वकिलांशी चर्चा करून ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्धता जाहीर केली होती. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. याबद्दल ओबीसी भाजपा आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन तसेच न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अकोल्यात भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. 



जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने यांच्या नेतृत्वात  भाजपा कार्यालय, जयप्रकाश नारायण चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह समोर    सायंकाळी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सरचिटणीस  संजय  जिरापुरे, गिरीश जोशी, आशिष पावित्रकर, सिद्धार्थ शर्मा, मनोज साहू, सतिश ढगे, अशोक ओळंबे, संजय झाडोकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 




…..


माहेश्वरी समाज ज्येष्ठ नागरिक कक्षाची सभा


अकोला, दि.२०: माहेश्वरी समाज ज्येष्ठ नागरिक कक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त यंदा विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

प्रारंभी मागील तीन महिन्यांत मृत पावलेल्या सेलच्या सदस्यांना दोन मिनीटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धा, भजन स्पर्धा, गुजरात यात्रा, वादविवाद स्पर्धा, होळी या विविध उपक्रमांची माहिती सभेत देण्यात आली. यावेळी सेल कार्यकारीणीचे कोषाध्यक्ष प्रविण मोहता यांनी २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा संपुर्ण आर्थिक अहवाल सभागृहासमोर मांडला. यावेळी सभागृहाने त्याला मंजुरी दिली. यानंतर पगडी रस्म उपक्रम नातेवाईकांपुरताच मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव सेल कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भगवानदास तोष्णीवाल यांनी सभागृहात संमतीसाठी मांडला. यावर सदस्य डॉ. चंद्रकांत पनपालिया, शंकरलाल बियाणी, चौथमल सारडा, मोहनलाल नाथानी, सुभाष लढ्ढा, रमणभाई लाहोटी व माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया यांनी पाठींबा दिला. हा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला. 

सभेच्या विशेष कामकाजात नेत्रतज्ञ डॉ. अनुप बागडी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. बागडी यांनी डोळ्यांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संस्थेचे मंत्री चंपालाल जाजू यांनी केले. संचालन राजीव मुंद्रा यांनी केले. देवकिसन भट्टड यांनी आभार मानले. 


……


शैक्षणिक उपक्रम: जिल्हयातील २६० शिक्षकांचा कार्यशाळेत सहभाग 


विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयांची गोडी लागण्यासाठी  'जॉली फोनिक्स' उपक्रम!



अकोला, दि.२० : विद्यार्थांना प्राथमिक इयत्तेपासून इंग्रजी यावे आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयांची गोडी लागावी, यासाठी 'जॉली फोनिक्स' हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अकोला तालुक्यात १८ आणि १९ जुलै रोजी जॉली फोनिक्स कार्यशाळा आली. 

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ. नागरे, डॉ. वैशाली ठग शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि डॉ.सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रेरणेने रतनसिंग पवार, श्याम राऊत, मोहन बेलसरे,  नंदा आंग्रे,  शशिकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जॉली फोनिक्स कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कार्यशाळेमध्ये पंचायत समिती अकोला अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता १ ते ५ ला अध्यापन करणाऱ्या ५०% शिक्षकांचे व इयत्ता ६ ते ८ ला इंग्रजी विषयाचे अध्यापन करणाऱ्या एका शिक्षकाचा समावेश आहे. दोन दिवसीय जॉली फोनिक्स कार्यशाळा एकूण सहा केंद्रांवर  घेण्यात आली. 

यामध्ये सुफ्फा इंग्लिश स्कूल अकोला , जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कृषी नगर, आनंदी किड्स स्कूल बाभूळगाव, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा घुसर, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळा शिवणी आणि डी. ए. व्ही. कॉन्व्हेंट अकोला या सहा केंद्रांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक निता नागरकर  यांच्या नेतृत्वात निकिता कश्यप, उत्पला चौधरी , आर. हेमलता , रुचिका चालना, शालिनी रामधन आणि हर्षला जाधव यांनी सहा केंद्रांवर कार्यशाळा घेतली.

जॉली फोनिक कार्यशाळा कृतीयुक्त असून

सुलभक अतिशय योग्य पद्धतीने जॉली फोनिक्स पद्धत व त्यामधील साउंड व उच्चार कृतिशील पद्धतीने समजावून सांगितले.  

सर्व शिक्षकांना कार्यशाळा व सुलभकांची शिकवण्याची पद्धत खूप छान आवडली  असल्याचे तालुक्यातील शिक्षकांनी मत व्यक्त केले आहे. 


पंचायत समिती अकोला मधील सहा केंद्रावर एकूण २६० शिक्षक कार्यशाळेमध्ये सहभागी झाले. पहिल्या दिवशी कार्यशाळेला , गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार (पंचायत समिती) , शिक्षण विस्तार अधिकारी द्वय विनोद मानकर (जिल्हा परीषद) , शाम राऊत (पंचायत समिती)  यांनी भेटी दिल्या. 

…..


संविधानाचे कट्टर पुरस्कर्ते झालो तरच 

राष्ट्र उद्धार- विजय आठवले यांचे मत 




अकोला, दि.२०:भारतात व्यक्ती पूजेचे स्तोम निर्माण केल्या जात असून,बेरोजगार तरुणांचा वापर केला जात आहे म्हणूनच कोणताही धर्म,जात,, संप्रदाय,राजकीय पक्ष,किंवा राजकीय नेत्याचे कट्टर समर्थक बनण्याऐवजी  आपण संविधानाचे कट्टर पुरस्कर्ते झालो तरच स्वतःचा आणि राष्ट्राचा उद्धार होईल असे प्रतिपादन सम्राट अशोक ब्रिगेडचे संस्थापक प्रा. विजय आठवले यांनी केले. 


शासकिय विश्रामगृह येथे सम्राट अशोक ब्रिगेड चे वतीने आयोजित चिंतन बैठकीत ते बोलत होते. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक ब्रिगेड अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश मोरे   होते. महासचिव निरंजन वाकोडे, भारत वानखडे, प्रभाकर कवडे, प्रा. शैलेश इंगळे, प्रा. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, गौतम वाघमारे,डी आर गवई ,उमेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रा. सुरेश मोरे यांनी सुद्धा संविधानाचे महत्व विषद करताना संविधान हेच भारताच्या विकासाचे माध्यम असल्याचे त्यांनी म्हटले.  संचालन ओमप्रकाश इंगळे यांनी तर आभार प्रा. बाळकृष्ण खंडारे यांनी मानले.



टिप्पण्या