World Environment Day:morna river: जागतिक पर्यावरण दिन :मोर्णा नदीकाठावर बांबु लागवड…






 



अकोला दि.5:  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज केले होते. या कार्यशाळेचा समारोप जिल्हाधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार व सरपंच यांनी मोर्णा नदीकाठावर बांबु लागवड करुन केला.




जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जि.प. लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश काळे, वनविभागाचे सहायक मुख्य वन अधिकारी सुरेश वडोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.




निसर्ग कट्टा एनजीओ व राजेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टीक वापरामुळे होणाऱ्या दुष्परीणामाबाबत जनजागृती केली. तसेच वन विभाग व डॉ.पंजाबराव देशमुख्य कृषि विद्यापिठच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीपर पथनाट्य कार्यक्रम सादर केले.



या कार्यशाळेत प्रशासनाच्यावतीने राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती तसेच अंमलबजावणीबाबतची सद्यस्थितीदर्शक माहितीचे व्हिडीओ दाखविण्यात आले. यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, मग्रारोहयोअंतर्गत प्रत्येक गावात स्मशानभुमी बांधकाम, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण मुक्त करुन सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर घनकचरा व्यवस्थापन, प्रत्येक शाळेत रोहयोमार्फत स्कूल मल्टी युनिट टायलेट बांधणी व नाला खोलीकरण इत्यादी कामाचे माहिती देण्यात आली. तसेच कार्यशाळेत सरपंचानी आपले मनोगत व्यक्त केले. तर वृक्ष दत्तक उपक्रमाअंतर्गत वृक्ष रोपांचे संगोपन व संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या पर्यावरण प्रेमीना जिल्हाधिकारी यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले.


            


कार्यशाळेत जिल्हाधिकारी अरोरा यांनी विविध विषयांचा आढावा घेवून, अपूर्ण राहिलेले कामे तातडीने मार्गी लावून शासनाव्दारे राबवित असलेले उपक्रमाचा सर्व ग्रामपंचायतीने लाभ घ्यावा, असे आवाहन  केले.





अरोरा म्हणाल्या की, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनातंर्गत धरण, तलाव व नाल्यांमधील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात येत आहे. या उपक्रमाचा सर्व ग्रामपंचायतीने लाभ घेऊन शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी व धरणाच्या साठवण क्षमता वाढविण्यासाठी सर्व सरपंचानी सहभागी व्हावे. प्रत्येक गावात स्मशाणभूमीचे बांधकाम रोहयोअंतर्गत 128 ठिकाणी करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभूमीची आवश्यकता आहे अशा ग्रामपंचायतांनी प्रस्ताव सादर करावा. तसेच शाळा, स्मशानभूमी व शासकीय जागेवर वृक्षारोपण करुन त्याचे संगोपण करावे. याकरीता रोहयोअंतर्गत आवश्यक ती सर्व मदत करु. ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. 


            


अकोट येथील जगन बगाडे यांनी शेतीच्या बांधावर कॅक्टसची लागवड करुन कुंपण तयार केले असून अत्यंत कमी खर्चात कुंपण तयार झाले आहे. यामुळे वन्य प्राण्यामुळे होणारे शेतीचे नुकसान कमी होण्यास मदत झाली आहे. या प्रयोगाचा प्रत्येक ग्रामपंचायतीनी स्विकार करावा, असेही आवाहन अरोरा यांनी केले.




            

प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात काही ग्रामपंचायत उत्स्फूर्तेने सहभाग घेत असून उर्वरित ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेऊन शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कटीयार यांनी केले.


            

कार्यक्रमाचे संचालन बाबासाहेब गाढवे यांनी केले. आभार  रो.ह.यो.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी मानले.





  

टिप्पण्या