wildlife-wild animals-alegaon crime: नैसर्गिक पाणवठ्यात युरिया टाकून 12 वन्य प्राण्यांची हत्या; आरोपींना तीन दिवसाची वन कोठडी




भारतीय अलंकार 24

अकोला: पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रात जंगलाच्या भागातील नैसर्गिक पाणवठ्यात शिकार करण्याच्या उद्देशाने युरिया टाकून 12 वन्य प्राण्यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आलेगाव वन विभागाने तीन आरोपींना अटक केली.आज तिन्ही आरोपींना पातूर न्यायालयात समक्ष हजर केले असता,तीन दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.




सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, या प्रकरणा मध्ये मृत प्राण्यांमध्ये १० माकडे, १ नीलगाय, १ काळवीट व काही पक्षांचा समावेश आहे. 





प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, आलेगाव वन परिक्षेत्रातील पिंपरडोळी भागात वन कर्मचारी गस्त घालतांना त्यांना काही वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आले. या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, एका नीलगायचे मास विक्रीच्या उद्देशाने नेल्याचे निष्पन्न झाले. यानंतर अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्रे फिरविली. मधुकर कचरू लठाळ यांच्या शेताची पाहणी केली असता, त्याच्या शेतात रक्ताने माखलेला सूरा, रक्ताने माखलेला दगड तसेच इतर साहित्य आढळले. तात्काळ आरोपीला अटक करून त्याची कसून चौकशी केली, चौकशी दरम्यान त्याने 2 सहकाऱ्यांसह हे कृत्य केल्याचे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली. 



या प्रकरणी आलेगाव वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांनी पातुर तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी गोविंदा ससाणे व संतोष ससाणे यांना अटक केली. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पातुर न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायाधीशांनी त्यांना तीन दिवसाची वन कोठडी सुनावली. या प्रकरणी आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत. 




ही कारवाई उपवनसंरक्षक के.आर.अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण, वनपाल दादाराव इंगळे, ढेंगे, भागवत, थोरात, राजेश बिरकड आदींनी केली.



टिप्पण्या