sant gajanan maharaj palkhi akola: 'जय गजानन श्री गजानन' जयघोषात निघाली पालखी पंढरीकडे…श्री संत गजानन महाराज पालखीचे अकोल्यात भव्य स्वागत


 


ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र शेगाव येथून, श्रीक्षेत्र पंढरपूर कडे निघालेली श्री गजानन महाराज यांची पालखी आज सकाळी अकोला शहरात पोहचली. जय गजानन श्री गजानन जयघोषात भाविकांनी ठीकठिकाणी पालखीचे स्वागत केले. श्रीक्षेत्र शेगाव पालखी सोहळ्याचे यंदा 53 वे वर्ष आहे. 6 जून रोजी शेगाव येथून निघालेलो ही पायदळ वारी 3 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे पोहोचेल.



चौकाचौकात माऊलींची मुर्ती सजावट 



श्रीक्षेत्र शेगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी हजारों अकोलेकर उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानिमित्त चौकाचौकात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची आणि श्रीसंत गजानन महाराज यांची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागत कमानी, फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आले होते. 





सुमधूर अभंगवाणी, भक्ती गीत संगीताने संपुर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. अशा उत्साहपूर्ण वातावरणात वारकरी व भाविकांनी ' जय गजाननश्रीगजानन' चा एकच जयघोष केला. अश्या भक्तिमय अभंगवाणी व टाळ मृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. 





कोविड साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे राजराजेश्वर नगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी यांच्यात उत्साह संचारला होता. ही पायदळ वारी भजनी दिंडी, अश्वासह सुमारे 700 वारकरी ध्वज घेवुन  आज बुधवार, 8 जुन रोजी सकाळी 7 वाजता अकोला नगरीत पोहचले. अकोला पालखी सत्कार समितीने व श्रींच्या भक्तांनी परंपरेनुसार ‘श्रीं’ च्या पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. भाविकांना श्रींचे दर्शन व्हावे, यांसाठी अकोला शहराच्या प्रमुख रस्त्याने श्रींच्या पालखीचे शोभायात्रा काढण्यात आली.संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज संस्थान प्रमुखांनी ठरवुन दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्यानेच शोभायात्रा निघाली.



श्री गजानन पालखीची शोभायात्रा भौरद येथून जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट येथे पोहचली. विश्रामा नंतर पालखी डाबकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदीरासमोरुन, डाबकी रोड पोलीस स्टेशन, श्रीवास्तव चौक, जयगुरुदेव पेट्रोल पंप, श्री विठ्ठल रुख्मीनी मंदिर, काळा मारोती मंदीर, सुशिल बेकरी समोरून, लोखंडी पुलावरुन सिटी कोतवाली चौककडे रवाना झाली. मुंगीलाल बाजोरीया विद्यालय प्रांगणात पालखीचा रात्री मुक्काम राहणार आहे. 




भाजपा तर्फे पालखी स्वागत 



अकोला विदर्भाची पंढरी संत गजानन महाराजांची पालखी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात आगमन होताच श्रीचे दर्शन व पूजन करून यंदा चांगला पाऊस येऊन शेतकरी बळीराजा सुखी व्हावा तसेच उद्योगधंद्यांना चांगले दिवस येऊन सर्वांचा कल्याण व्हावा, अशी कामना आमदार रणधीर सावरकर यांच्या वतीने सौभाग्यवती मंजुषा  सावरकर यांनी केली. 



अकोला शहराच्या परिसरात आषाढी एकादशी निमित्य संत गजानन महाराजांची पालखी पैदल  वारी पंढरपूर विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी जात असते. यानिमित्त पालखीचे भौरद येथे पालखीचे मुक्काम असते. सतत सात वर्षाच्या परंपरेनुसार आमदार रणधीर सावरकर पूजाअर्चन करतात. यंदा राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आमदार सावरकर मुंबई  येथे असल्याने त्यांच्या वतीने दरवर्षीच्या परंपरेनुसार मंजुषा सावरकर यांनी विशेष पूजा केली. संत गजानन महाराजांच्या कडे शेतकरी सुखी संपन्न व्हावा असे साकडे घातले. 


याप्रसंगी अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या वतीने अनुप धोत्रे यांनी विशेष पूजा-अर्चना करून श्री चे दर्शन घेतले. 


यावेळी एडवोकेट देवाशीष काकड, तुषार भिरड, रवी खेडकर, अंबादास उमाळे, शंकरराव वाकोडे, श्याम विंचनकर, विद्या भरणे, गजानन शेळके, रंजना विचनकर, शिवा हिंगणे, मोहन पारधी, राजेश लुंगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.




शिक्षण प्रसारक मंडळातर्फे स्वागत 



शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाच्या वतीने जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथून निघालेल्या, श्रीक्षेत्र पंढरपूर वारी 'श्री 'चा पालखी सोहळ्याचे 8 जून रोजी सकाळी 9: 15 वाजता स्वागत करण्यात आले. 


या वेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. तारा हातवळणे, सचिव गोपाल खंडेलवाल , उपाध्यक्ष प्रा. चौरे, कोषाध्यक्ष नानासाहेब कुलकर्णी यांनी स्वागत केले. मंडळाच्या अध्यक्ष तारा हातवळणे आणि कोषाध्यक्ष नानासाहेब कुलकर्णी यांनी संत श्री गजानन बाबांचे विधिवत पूजन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक  वृंद ,विद्यार्थी वर्ग आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





परिसरातील प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी मंडळांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात दर्शनाची सोय करून दिली.  शिस्तबद्ध रितीने भाविकांनी दर्शन घेतले.यावेळी चण्याची उसळचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. यावेळी श्रीगजानन माऊलीचा जयघोष करत भक्तिरसात भाविक दंग झाले होते.





डाबकी रोडवर गणेश नगर, इंदिरा कॉलोनी, ध्यानेश्वर नगर, जोगळेकर प्लॉट, श्रीवास्तव चौक,भीम नगर, शिवचरण पेठ,शिवाजी नगर, शिवनगर, रमेश नगर, गोंडपुरा परिसरातील नागरिक व व्यापारी यांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. गजानन महाराज मंदीर, ध्यानेश्र्वर मंदीर च्या वतीने विशेष स्वागत करण्यात आले. आतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले. ठीक ठिकाणीं थंड पेय वाटप करण्यात आले. संपूर्ण पालखी मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 


(छायाचित्र: ॲड. नीलिमा शिंगणे जगड)


व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा: श्री क्षेत्र शेगाव पालखी अकोला आगमन














टिप्पण्या