online shopping app - Lalit Gandhi: विदेशी ऑनलाईन शॉपिंग ॲपला टक्कर देण्यासाठी आत्मनिर्भर ॲप तयार - ललित गांधी यांची माहिती

ललित गांधी पत्रकार परिषदेला माहिती देताना 




भारतीय अलंकार 

अकोला : सातत्यानं प्रयत्नशील राहणे ही महाराष्ट्र चेंबरची विशेषता आहे. चेंबरच्या माध्यमातुन विदेशी ऑनलाईन शॉपिंग ॲप्लिकेशनला टक्कर देण्यासाठी संपुर्ण देशी बनावटीचे आत्मनिर्भर ऑनलाईन शॉपिंग ॲप्लिकेशन तयार करण्यात येत आहे. या माध्यमातुन स्थानिक उद्योग व्यवसायांना ई कॉमर्स जगतात पाया रोवता येणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी (मुंबई) यांनी सांगितले.



विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित एका कार्यक्रम निम्मित ललित गांधी रविवारी अकोल्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



विदर्भ चेंबरच्या माध्यमातून पुढील वर्षभरात अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम उद्योजकता वाढीसाठी करण्यात येणार आहेत. विदर्भ चेंबर नव्या जोमाने पुढच्या काळात व्यवसाय, उद्योग आणि शेतीच्या क्षेत्रात देश पातळीसह जागतिक पातळीवर चमकेल, अशी आशा गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. 


राजकारण विरहीत पाठबळ


विकासाला जोवर राजकारण विरहीत पाठबळ मिळत नाही, तोवर खऱ्या अर्थाने शहरांचा विकास होणे शक्य नसते. अकोला आणि संपूर्ण विदर्भाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास विकासाच्या अनेक शक्यता येथे सुप्तावस्थेत आहेत. यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. मात्र केवळ राजकीय पाठिंब्याच्या भरवश्यावर न राहता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स येत्या काळात छोट्या मोठ्या उद्योगांना एकत्रित आणण्याचे काम करणार आहे. तसेच शेती उद्योगावर विशेष भर देणार आहे. विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र चेंबरची भूमिका अत्यंत मूल्यवान ठरणार आहे, असे मत ललित गांधी यांनी व्यक्त केले.


माल वाहतूक विमानसेवा सुरू होणे आवश्यक


विदर्भ विभागातील शेतमालाला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे.अकोला शिवणी विमानतळाचे काम लवकर सुरु करावे, अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. कोणत्याही शहराचा व त्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा असे वाटत असेल, तर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य महत्वाचे ठरते. जोवर विकासाला उद्योग व्यवसायाची साथ लाभत नाही, तोवर विकासाच्या केवळ चर्चा होत राहतात. महाराष्ट्र चेंबरशी जोडल्या गेलेल्या व्यापारी, उद्योजक आणि शेतीमधील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष योगदान देण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि सातत्यानं आजवर केले असल्याचे गांधी म्हणाले.


कृषि आणि महिला क्लस्टर्स येत्या काही दिवसात सुरु


उद्योगाची कास धरुन आजवर शिल्लक असलेला अनुशेष भरुन काढण्याची वेळ आता अकोलावर आली आहे. येथे रस्ते, महामार्ग, रेल्वे सेवा उपलब्ध आहे. विमानसेवा सुरु झाल्यास देशपातळीवर स्थानिक उद्योग निश्चित पोहोचेलं. व्यवसाय, उद्योग आणि शेतीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षमता संपूर्ण विदर्भात आहेत. अनेक प्रकारचे क्लस्टर्स या संपूर्ण विभागात उभे राहू शकतात, कृषि आणि महिला क्लस्टर्स या भागात येत्या काही दिवसात सुरु करण्याचा मानस गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.


महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र क्लस्टर


नोकरीच्या मागे न लागता उद्योजकता वाढीस लागायला हवी, या दृष्टीने स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्याचे चेंबरने ठरविले आहे. महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र क्लस्टर उभारण्याचा ललित गांधी यांनी मनोदय व्यक्त केला. यात महिला बचत गटांना देखील सामावून घेतल्या जाणार आहे. हा उपक्रम महिला वर्गासाठी नवी आशा निर्माण करणारा आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन घेऊन स्वतंत्र फोरम निर्माण करण्याचा महाराष्ट्र चेंबरचा निश्चय  असल्याचे गांधी म्हणाले. 





पत्रकार परिषदेला विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अकोला अध्यक्ष निकेश गुप्ता, नीरव वोरा, रमण मालू, राजकुमार शर्मा आदी उपस्थित होते.



टिप्पण्या