msedcl electric power rainy season: पावसाळ्यात वीज अपघात टाळता येणे शक्य; अशी घ्या काळजी…




भारतीय अलंकार 24

अकोला दि.१०: पावसाळा सुरु होताच वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या तुटून वीज प्रवाह खंडित होणे किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उडणे असे प्रकार नेहमीच घडत असतात. सोबतच घरगुती वीज उपकरणे आणि वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी सावधगिरी बाळगली तर होणारे वीज अपघात टाळता येणे शक्य आहे.



लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध 


अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. वीज वाहिन्यांवर  झाडे पडल्याने कधीकधी वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.  असा  प्रकार निदर्शनास आल्यास वीज ग्राहकांनी जवळच्या महावितरण कार्यालया अवगत करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


टोल फ्री क्रमांक 

 

शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी 24 तास सुरु असणार्‍या कॉलसेंटर्सचे 1912, 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. 



महावितरणला सहकार्य करावे


वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. वीजग्राहकाने कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


घरात घ्यावयाची काळजी 


पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. 


घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. 


घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. 


घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. 


ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. 


विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. 


विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. 



विजेच्या खांबाचा दुरुपयोग करू नये 


विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत,  


विद्युत खांबांना दूचाकी टेकवून ठेऊ नयेत  


विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या