animal-care-center-akola-kajal-raut: प्राणीप्रेमी काजलने उभारले अकोल्यातील पहिले अँनिमल केअर सेंटर; मोकाट, जखमी, आजारी प्राण्याचा करते मोफत उपचार !

                      काजल राऊत 



अकोला,(विदर्भ) : राष्ट्रिय बॉक्सर, अवॉर्ड विनर नाट्यअभिनेत्री अशी स्वतःची ओळख निर्माण केलेल्या अकोल्यातील उच्चशिक्षित तरुणीने मानवता जपत मुक्या प्राण्यांशी मैत्री केली आहे. त्यांच्या संगोपनाची जवाबदारीही तिने उचललेली आहे. कोरोना लॉकडाऊन काळात माणसांचेच हाल होत असताना मुक्या प्राण्यांना कोण जवळ करणार होते, अश्या कठीण परिस्थितीत या तरुणीने मोकाट, जखमी, आजारी असलेले कुत्रे, मांजर, गाय, बैल, गाढव, पक्षी यांना आधार देत माणुसकीचा धर्म निभावला. आज या तरुणी सोबत समविचारी तरुण तरुणी जोडल्या गेले आहेत. यातूनच अकोल्यातील पहिले एनिमल केअर सेंटर उभे राहीले आहे. या तरुणीचे नाव आहे काजल राऊत.




लहानपणापासून काजल हिला प्राण्यांबद्दल  खूप प्रेम होतं. तिच्या आई बाबांना किंवा तिला रस्त्यावर कधी जखमी अवस्थेत कुत्रे, मांजर किंवा पक्षी दिसला तर त्याला घरी आणून त्याचा उपचार करून, त्याला कायम घरी ठेवायचे,असे काजलने सांगितले.




लॉकडाऊन सुरू झाल्यावर काजलला लक्षात आले की, माणसांची मदत करण्यासाठी अनेक संस्था, लोक पुढे येतात. मात्र, प्राण्यांची मदत करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाहीत. लॉकडाऊन मुळे प्राण्यांचे खाण्यापिण्याचे सगळे स्त्रोत बंद झाले होते. लॉकडाऊन काळात रस्त्यावरील कुत्रे आणि गायी यांना काजल नियमित जेवण देवू लागली. सोबतच जखमी अवस्थेत कुठला प्राणी दिसला की त्याचा उपचार करू लागली. अश्या वेळी काजलच्या  लक्षात आलं की, या मुक्या जनावरांना आपल्या मदतीची गरज आहे. हे लक्षात घेता काजलने एक ॲनिमल रेस्क्यू टीम सुरू केली. ज्याचे नाव 'आधार फॉर ॲनिमल्स' असे ठेवले. आता काजलची १५ ते २९ जणांची रेस्क्यू टीम तयार झाली आहे. या टीम मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरी करणारे युवक युवती असल्याचे काजलने सांगितले.


आधार फॉर एनिमल्स अंतर्गत काजल आणि तिच्या सहकाऱ्यांनी जवळपास ३० ते ४० पॅरालाईज डॉग्स ज्यांना चालता पण नव्हता येत अशा कुत्र्यांचा उपचार करून परत त्यांना आपल्या पायावर चालते केले. या कामाची दखल सोशल मीडियाद्वारे संपूर्ण भारतात घेतली गेली. आज देशातील विविध राज्यांमधून पॅरालाईज डॉगची ट्रीटमेंट करण्यासाठी काजलच्या टीमला लोकांनी आवाहन केले आहे. आता आम्हाला अकोल्यामध्ये पॅरालाईज डॉग सेंटर सुरू करण्याची इच्छा आहे. ज्यासाठी आम्हाला जनतेच्या मदतीची गरज असल्याची काजल म्हणाली.



आतापर्यंत काजल आणि तिच्या टीम मेंबरने हजाराच्या वर प्राण्यांचे प्राण वाचवले आहेत. यात प्रामुख्याने कुत्रे, मांजर, गाय आणि बैल यांचा समावेश आहे. या प्राण्यांच्या उपचाराचा आणि खाण्यापिण्याचा खर्च काजल आणि तिचे सहकारी स्वतः करतात, हे येथे विशेष उल्लेखनीय आहे. 


जखमी आणि आजारी प्राण्यांची मदत करावी, त्यांना खायला घालावे, त्यांच्याशी क्रूरतने वागू  नये. कोणी जर प्राण्यांसोबत क्रूरता करीत असेल तर त्याला तेंव्हाच रोखावे,असे काजल म्हणाली. प्राणी प्रेमींना या कार्यात सामील व्हायचं असेल किंवा कोणत्या प्रकारे मदत करायची असेल तर अश्या नागरिकांनी आधार ॲनिमल सेंटर, पटोकार हॉस्पिटल समोर, सिव्हिल लाइन रोड येथे संपर्क साधावा,असे आवाहन काजलने केले.



टिप्पण्या