pm narendra modi visit to nepal lumbini: नेपाळमध्ये लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राचा शिलान्यास





नवी दिल्ली, दि.16: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी आज नेपाळमधील लुंबिनी मठ येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध  संस्कृती आणि वारसा केंद्राच्या उभारणीचा शिलान्यास केला.



नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी)  यांना लुंबिनी येथे लुंबिनी विकास ट्रस्टने (एलडीटी) दिलेल्या भूखंडावर आयबीसीतर्फे हे केंद्र उभारले जाईल. आयबीसी आणि  एलडीटी यांच्यात मार्च 2022 मध्ये भूखंडाबाबत करार झाला होता.


तीन प्रमुख बौद्ध परंपरा म्हणजे थेरवाद, महायान आणि वज्रयान यांच्या भिख्खूंच्या हस्ते शिलान्यास कार्यक्रम झाल्यानंतर, उभय पंतप्रधानांनी केंद्राच्या प्रतिकृतीचे अनावरण केले.




एकदा हे केंद्र पूर्ण  झाल्यावर, जगभरातून बौद्ध धर्माच्या अध्यात्मिक पैलूंचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांचे स्वागत करणारे जागतिक दर्जाचे केंद्र असेल. ही आधुनिक इमारत असणार आहे आणि उर्जा, पाण्याचा वापर आणि कचरा हाताळणीच्या बाबतीत नेट झिरो निकषांनी युक्त असेल. या इमारतीत प्रार्थना सभागृह, उपासना केंद्र, ग्रंथालय, प्रदर्शन हॉल, कॅफेटेरिया, कार्यालये आणि इतर सुविधा असतील.



मायादेवी मंदिराला भेट 



नेपाळमधील लुंबिनीच्या एक दिवसाच्या दौऱ्यात  लुंबिनी येथील मायादेवी मंदिराला सर्वप्रथम  भेट दिली. पंतप्रधानांसोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नी डॉ.आरझू राणा देउबा उपस्थित होते.


मंदिराच्या आवारातील  मार्कर स्टोन येथे उभय नेत्यांनी आदरांजली वाहिली, हे  भगवान बुद्धांचे जन्मस्थान आहे. बौद्ध धार्मिक विधींनुसार संपन्न  पूजेला ते  उपस्थित होते.


दोन्ही पंतप्रधानांनी मंदिराशेजारी असलेल्या अशोक स्तंभाजवळ दीपप्रज्वलन केले.  इ.स.पूर्व 249 मध्ये सम्राट अशोक यांनी  उभारलेला हा स्तंभ लुंबिनी हे भगवान बुद्धांचे जन्मस्थान असल्याचा पहिला अभिलेखीय पुरावा मानला जातो.  त्यानंतर, दोन्ही पंतप्रधानांनी बोधी वृक्षाला  पाणी घातले. हे रोप बोध गया इथून आणण्यात आले होते आणि  पंतप्रधान  मोदी यांनी 2014 मध्ये भेट म्हणून ते  दिले होते. मंदिराच्या अभ्यागत पुस्तिकेत उभय नेत्यांनी स्वाक्षरीही केली.


 

लुंबिनी येथे स्वागत 



पंतप्रधानांचे लुंबिनी येथे आगमन झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, त्यांची पत्नी डॉ. आरजू राणा देउबा आणि नेपाळ सरकारमधील अनेक मंत्री यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान या नात्याने मोदी यांची नेपाळची ही पाचवी आणि लुंबिनीची पहिलीच भेट आहे.









टिप्पण्या