MLA Cup State Level Open Kabaddi Competition: आमदार चषक राज्यस्तरीय खुली कबड्डी स्पर्धा: गोल्डन रेडवर रणवीर संघ उपउपांत्यपूर्व फेरीत, पुरुष गटाच्या बाद फेरीत सडोलीच्या बलाढ्य शाहू संघावर ३१-३० ने मात




भारतीय अलंकार 24 

पुणे : शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अतिशय थरारक सामन्यात सडोलीच्या (जिल्हा कोल्हापूर) बलाढ्य शाहू संघाचे आव्हान गोल्डन रेडवर परतवून लावत अहमदनगर जिल्हयातील भेंडा येथील रणवीर संघाने मंगळवारी दिमाखात उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. गोल्डन रेड टाकणारा शंकर गदई रणवीर संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.


आमदार सुनील कांबळे आणि महारुद्र सामाजिक संघटना यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा भवानी पेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये 'क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे क्रीडानगरी'त सुरू आहे. रणवीर संघाने अतिशय अटीतटीच्या लढतीत शाहू संघावर ३१-३० अशी एका गुणांच्या फरकाने सरशी साधली. हाफ टाईममध्ये विजयी संघ १०-९ असा आघाडीवर होता.




सामन्याला प्रारंभ झाल्यापासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी प्रत्येक गुणासाठी सर्वस्व पणाला लावले होते. शाहू संघातर्फे महेश मगदूम याने खोलवर चढाया करीत रणवीर संघावर दबाव निर्माण केला होता. शरद पवार याने उत्कृष्ट पकडी घेत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेले होते. मात्र रणवीर संघाच्या खेळाडूंनी त्यांच्यापेक्षा सरस खेळ करीत बाजी मारली. शंकरसह राहुल धनवडे याने चौफेर चढाया करीत शाहू संघाला स्पर्धेबाहेर करण्यात मोलाचे योगदान दिले. देविदास जगताप याने शानदार पकडी करीत या दोघांना तोलामोलाची साथ दिली.


पुरुष गटात निर्णायक क्षणी नियोजनबद्ध खेळ करीत पुण्याच्या साई स्पोर्ट्स संघाचा कडवा प्रतिकार ठाण्याच्या शिवशंकर संघाने ३९-३८ असा अवघ्या एका गुणाच्या फरकाने मोडून काढला. या थरारक विजयासह शिवशंकर संघाने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. हाफ टाईममध्ये १९-१५ अशी ४ गुणांची आघाडी घेणाऱ्या शिवशंकर संघाला नंतर मात्र साई स्पोर्ट्सच्या कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. अखेर निसटत्या फरकाने हा संघ विजयी ठरला. निलेश साळुंखे आणि दीपक गुप्ता यांच्या अप्रतिम चढाया या विजयात मोलाच्या ठरल्या. रमेश राठोड आणि नागेश सोनवणे यांनी अचूक पकडी घेत त्यांना तोलामोलाची साथ दिली. साई स्पोर्ट्स संघातर्फे अजित चौहान, आतिष पाटील (चढाई) तसेच सुरज चौधरी आणि गोपाळ चौधरी (पकड) यांनी दिलेली जोरदार झुंज संघाला विजय मिळवून देण्यात अपुरी ठरली.




पुरुष गटातील बाद फेरीच्या चुरशीच्या सामन्यात नंदुरबारच्या एनटीपीएस संघाने पुण्याच्या चेतक स्पोर्ट्स क्लबचे आव्हान ३३-२९ने संपवले. ऋषिकेश बनकर (चढाई) आणि सिद्धार्थ मुरूमकर (पकड) यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

सतीश ठोकळ आणि बालाजी जाधव यांना इतर खेळाडूंकडून अपेक्षित साथ न लाभल्याने हा संघ पराभूत झाला.  



महिला गटात मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात पुण्याच्या एमएच स्पोर्ट्स क्लबला ४८-२६ ने पराभूत करून बाद फेरी गाठली. हाफ टाईममध्ये महात्मा गांधी संघ २४-१२ ने आघाडीवर होता. रुपाली जाधव आणि स्नेहल चिंदरकर यांनी केलेल्या चौफेर चढाया तसेच करुणा रासने आणि साक्षी गावडे यांनी केलेल्या प्रभावी पकडी विजयात महत्वपूर्ण ठरल्या. साखळी फेरीतील याआधीच्या दोन्ही लढती जिंकल्या असल्याने एमएच स्पोर्ट्स क्लब संघदेखील बाद फेरीसाठी पात्र ठरला.

 

निकिता पडवळ (चढाई) आणि तृप्ती दुर्गे (पकड) यांनी केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर पुण्याच्या शिवओम संघाने नाशिकच्या रचना स्पोर्ट्स क्लबला ४३-२८ने सहजपणे नमवून बाद फेरी गाठली. रचना संघातर्फे कांचन खोडे आणि फरजीन सय्यद यांनी उल्लेखनीय खेळ केला. 



    


संक्षिप्त निकाल : 


पुरुष गट : बाद फेरी :

रणवीर संघ, भेंडा (जिल्हा - अहमदनगर) विवि शाहू संघ, सडोली (जिल्हा - कोल्हापूर) : ३१-३०.

शिवशंकर संघ, ठाणे विवि साई स्पोर्ट्स, पुणे : ३९-२८.

एनटीपीएस, नंदुरबार विवि चेतक स्पोर्ट्स क्लब, पुणे : ३३-२९.


महिला गट : साखळी फेरी :

 विवि शिव ओम संघ, पुणे विवि रचना रचना स्पोर्ट्स, नाशिक : ४३-२८. 

महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर विवि एम. एच. स्पोर्ट्स क्लब, पुणे : ४८-२६.


टिप्पण्या