MLA Cup State Level Kabaddi Competition: आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बालवडकर, साई स्पोर्ट्स, एनटीपीसी संघांची विजयी सलामी



भारतीय अलंकार 24

पुणे : आमदार सुनील कांबळे आणि महारुद्र सामाजिक संघटना यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आयोजित आमदार चषक महाराष्ट्र राज्य खुल्या कबड्डी स्पर्धेत महिला गटातून पुण्याचा प्रकाशतात्या बालवडकर संघ तर पुरुष गटातून पुण्याचा साई स्पोर्ट्स आणि नंदुरबारच्या एनटीपीसी संघांनी रविवारी (दि. २९) विजयी सलामी दिली.


ही स्पर्धा भवानी पेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये 'क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे क्रीडानगरी'त रविवारपासून सुरू झाली. पुण्याच्या डॉ. पतंगराव कदम संघाला ४८-२० ने नमवून प्रकाशतात्या बालवडकर संघाने दणक्यात प्रारंभ केला. विजयी संघातर्फे आम्रपाली गलांडे, अंकिता पिसाळ, अंकिता चव्हाण यांनी दमदार खेळ करीत सलामीचा दिवस गाजविला. पराभूत संघातर्फे धनश्री जायगुडे, तनया भिलारे, आकांक्षा साबळे यांनी उल्लेखनीय खेळ केला. हाफ टाइममध्ये विजयी संघ ३३-५ ने आघाडीवर होता.


पुरुष गटात झालेल्या लढतीत साई स्पोर्ट्स संघाने ठाण्याच्या ओम कल्याण संघाचा ५२-२० अशा फरकाने धुव्वा उडविला. हृषीकेश बनकर (चढाई) आणि श्रेयस उंबरदंड (पकड) यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर एनटीपीसी पुण्याच्या उत्कर्ष क्रीडा मंडळ संघावर ५२-२२ अशी सहजपणे सरशी साधली.



 

स्पर्धेचे उद्धाटन माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. या वेळी अर्जुन पुरस्कार विजेते माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर आणि शांताराम जाधव तसेच महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्वीराज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मनपा आयुक्त विक्रमकुमार, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आर. आर. कामत, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सचिन मथुरावाला, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, महावितरण चे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे,  स्पर्धेचे आयोजक आमदार सुनील कांबळे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते श्रीपाद ढेकणे, शहर उपाध्यक्ष दिलीप काळोखे, भाजपाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महेश पुंडे, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या कार्याध्यक्षा वासंती सातव बोर्डे, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर (अर्जुन पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला खेळाडू) पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्यवाह राजेंद्र आंदेकर, कबड्डी स्पर्धेचे संयोजक सुनिल मोरे, महारुद्र सामाजिक संघटनेचे अध्यक्ष कल्याण शिंदे, शहर भाजपाचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरदेखील यावेळी उपस्थित होते.




"आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या खेळाडूंची, संघांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे कौतुक करून मनोबल वाढवतात. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या यशामध्ये वाढ झाली आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अस्सल देशी खेळ असलेल्या कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन आम्ही करीत आहोत," असे स्पर्धेचे आयोजक आमदार सुनील कांबळे यांनी प्रास्ताविकात नमूद केले. आयुक्त विक्रमकुमार यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतानाच स्पर्धेचे उत्कृष्ट रीतीने आयोजन करण्यात आल्याबद्दल आमदार सुनील कांबळे यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, "अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे पुण्याचे आरोग्य अधिक चांगले होण्यास सहाय्य होणार आहे."  भाजपाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महेश पुंडे यांनी स्वागत तर पुणे शहर भाजपा अध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 


या स्पर्धेत पुरुषांचे ३० तर महिलांचे १८ संघ सहभागी झाले आहेत. साखळी फेरी आणि नंतर बाद फेरी या पद्धतीने ही स्पर्धा होत आहे. २९ ते ३१ तारखांना साखळी लढती होतील. पुरुष आणि महिला विभागात प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. ३१ तारखेला बाद फेरीच्या लढतींना प्रारंभ होईल.







केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेच्या चषकाचे अनावरण


या स्पर्धेतील विजेत्या संघांना देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. 


या वेळी अर्जुन पुरस्कारविजेत्या माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, राज्याचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर भाजपा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



अनुराग ठाकूर यांनी विजेत्यांना १.५१ लाख रुपयांचे मोठे पारितोषिक देण्यात येणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "चषकाची भव्यता पाहून ही स्पर्धादेखील भव्य पद्धतीने पार पडेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. राज्य पातळीवरील या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पुरुष तसेच महिला संघांना प्रत्येकी १.५१ लाख रुपयांचे मोठे पारितोषिक देण्यात येणार आहे. 



याबाबत स्पर्धेचे आयोजक असलेले आमदार सुनील कांबळे यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांच्या पारितोषिक रकमेतील समानता विशेष कौतुकास्पद आहे. 


क्रीडा क्षेत्रात देशाला सुपर पॉवर बनवण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आपण सर्वांनी यथाशक्ती या कार्यात योगदान द्यायला हवे." तत्पूर्वी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शुक्रवारी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.




संक्षिप्त निकाल :



महिला गट : प्रकाशतात्या बालवडकर संघ, पुणे विवि डॉ. पतंगराव कदम संघ, पुणे : ४८-२०.



पुरुष गट : साई स्पोर्ट्स, पुणे विवि ओम कल्याण, ठाणे : ५२-२०.

एनटीपीसी नवापूर, नंदुरबार विवि उत्कर्ष क्रीडा मंडळ, पुणे : ५२-२२.




 







टिप्पण्या