Marathi Actress Premakiran: Akola: जेष्ठ अभिनेत्री प्रेमाकिरण काळाच्या पडद्याआड: प्रेमाकिरण यांचे भन्नाट नृत्य आणि संवाद आजही अकोलेकरांच्या स्मृतीत…

Veteran Marathi Actress Premakiran Behind the Scenes of Time




ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. 61 वर्षांच्या प्रेमा किरण यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. दे दणादण, धूमधडाका, सरपंच यासारख्या मराठी सुपरहिट चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.  मराठीच नाही तर हिंदी, गुजराती, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्येही त्यांनी दर्जेदार भूमिका वठविल्या होत्या. चाळीत राहणारी सामान्य मुलगी ते चित्रपट अभिनेत्री- निर्माता असा त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. 


 

अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर असे अनेक हिट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. 80, 90 च्या दशक प्रेमा किरण यांनी गाजविला.  दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली होती.


मध्यंतरी प्रेमाकिरण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे म्हंटले होते. मात्र, फार काळ त्या राजकारणात राहिल्या नाहीत.


अभिनेत्रीसोबतच त्या निर्माता सुद्धा होत्या. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उतावळा नवरा' या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. यानंतर त्या सामाजिक कार्यात रमल्या होत्या. 


अकोल्यात आगमन 


अलीकडेच प्रेमा किरण एका सामाजिक कार्यक्रमा निम्मित अकोल्यात आल्या होत्या. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला मेळाव्यात 'बेटी बचाव बेटी पढाव' अभियानांतर्गत महिलांना मार्गदर्शन करणासाठी प्रेमाकिरण सन फेब्रुवारी 2020 मधे अकोल्यात आल्या होत्या. प्रमिलाताई ओक सभागृह येथे हा कार्यक्रम झाला होता.  



राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महिला मेळावा प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या प्रेमा किरण यांनी कार्यक्रमाचे आयोजक गजानन भटकर यांच्या सह एका चित्रपटात डायलॉग आणि नृत्य सादर केले होते. अभिनेत्री प्रेमा किरण यांनी 'येऊ कशी कशी मी नांदायला ' या गाण्यावर नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. 


मराठी चित्रपटसृष्टी एकेकाळी गाजविणाऱ्या प्रेमा किरण यांना प्रत्यक्ष रंगमंचावर नृत्य करताना पाहून रसिकांच्या डोळ्याची पारणे फिटली होती.अकोलेकरांच्या स्मृतीत आजही तो प्रसंग उभा राहतो.आज प्रेमा किरण यांच्या निधनाचे वृत्त कळताच प्रेमाकिरण यांनी सादर केलेले नृत्य, चित्रपट संवाद आणि प्रेक्षकांसोबत मनमोकळा साधलेला संवाद अश्या सर्व आठवणी परत ताज्या झाल्या.




व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा:प्रेमाकिरण यांचे भन्नाट नृत्य आणि संवाद आजही अकोलेकरांच्या स्मृतीत… 



(फोटो सौजन्य: गजानन भटकर अकोला)





टिप्पण्या