Ketaki chitale news-sharad pawar: केतकी चितळे विरूध्द अकोल्यातही गुन्हे दाखल; तर ठाणे न्यायालयाने सुनावली18 मे पर्यंत पोलिस कोठडी

                                           file photo



भारतीय अलंकार 24 

अकोला/ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्यावर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अकोला येथील खदान पोलिस ठाण्यात केतकी चितळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केतकी चितळेवर याच प्रकरणात राज्यात आतापर्यंत दहा ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, काल सायंकाळी ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आज रविवारी न्यायालयात हजर केले असता,18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


शरदचंद्र पवार यांच्या बाबत केतकी चितळेने दोन दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमधून दोन समाजात द्वेषाची भावना व वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अकोला जिल्हा अध्यक्ष कल्पना गवारगुरू यांनी खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. केतकी चितळे हिने सोशल मिडीयावर पोस्ट केलेला मजकूर हा अत्यंत आक्षेपार्ह असून त्यातून शरदचंद्र पवार यांचे विषयी द्वेष व बदनामी कारक मजकूराचा समावेश आहे. हा मजकूर तिसऱ्या वेगळ्या व्यक्तीने लिहला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कल्पना गवारगुरू यांच्या या तक्रारीवरून खदान पोलिसांनी केतकी चितळे विरुद्ध 153 अ, 500, 501,505 (2) या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील कारवाई खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस हे करीत आहेत. तक्रार देतेवेळी एनसीपीच्या सुरेखा सिरसाट, नेहा राऊत, राणी कंटाले, पुनम लांडे, संध्या आठवले उपस्थित होत्या.







केतकीने शरद पवारांवर केलेल्या टीकेचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात पडले आहेत. आतापर्यंत केतकीवर राज्यातील 10 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाले आहेत. शनिवारी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरगाव येथे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर आता मुंबईतील पवई पोलिस ठाणे आणि अमरावतीत गाडगे नगर पोलिस ठाणे, नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त लिखाण असलेली पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्यानंतर तिच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला ठाणे पोलिसांनी अटक केली असून ठाणे न्यायालयात आज हजर केले असता, न्यायालयाने केतकीला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात केतकीने स्वतःच युक्तिवाद करून,मला स्वतःची मते मांडण्याचा अधिकार नाही का,असे म्हंटले. दरम्यान, पोलीसांनी केतकीचा मोबाईल फोन तपास कामी ताब्यात घेतला आहे.


वकील नितीन भावे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर लिहिलेल्या वादग्रस्त कवितेतील ओळी केतकी चितळेने सोशल मीडियावरून शेअर केल्या होत्या. तिच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात केतकी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी केतकीला अटक केली होती.




दरम्यान, केतकीला अटक करताना राष्ट्रवादीचे संतप्त कार्यकर्त्यांनी कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर तिच्यावर अंडी आणि शाईफेक करुन तिच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. ही परिस्थिती बघता केतकीला आज न्यायालयात हजर करतेवेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर निदर्शने सुरूच ठेवली होती. केतकीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली..


टिप्पण्या