dirt toilet water scarcity office akola: शौचालयात घाण! पाण्याचा तुटवडा !! महिला कर्मचारी म्हणतात ...आम्ही पाणीच पित नाही…जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार...






नीलिमा शिंगणे जगड

अकोला : महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली शासनाने कितीही गाजावाजा केला तरी  शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचारी भलत्याच समस्येने त्रस्त आहेत. महिला कर्मचाऱ्यांना शौचालयाची सुविधा नसल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असल्याचे दृश्य जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले.



मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या विविध कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना या समस्येला दररोज तोंड द्यावे लागत असल्यामुळे  तीव्र असंतोष पसरला आहे.



      

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेल्या प्रशासकीय इमारतीत जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नगर रचना विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, जात पडताळणी विभाग, जिल्हा कोषागार, उपविभागीय अधिकारी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह विविध कार्यालय आहेत. या सर्वच कार्यालयांमध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या इमारतीची दुर्दशा अत्यंत वाईट असून इमारतीच्या पायऱ्या चढतानाच दुर्गंधी सुरू होते. एवढेच नव्हे तर शौचालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण आणि पाण्याचा तुटवडा असल्यामुळे महिलांनी जायचे कुठे ?  असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.



शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक कार्यालयाला शौचालयाची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे,  मात्र या शौचालयाची स्थिती अत्यंत किळसवाणी आहे. येथे साफसफाई, पाण्याची सुविधा याबाबत कोणताही अधिकारी गंभीरतेने लक्ष देत नाही. बहुतांश कार्यालयाचे विभाग प्रमुख पुरुष असून ते अधून मधून बाहेर जातात,  मात्र महिला कर्मचाऱ्यांना बाहेर जाणे शक्य नसल्यामुळे हा त्रास  सहन करावा लागत आहे.




कार्यालयाच्या पायऱ्या चढतानाच दुर्गंधी यायला सुरुवात होते. शासनाच्या वर्ग-1 दर्जाच्या अधिकाऱ्या पासून कनिष्ठ कर्मचाऱ्या पर्यंतचे सर्वच कर्मचारी याच पायर्‍यांवरुन ये-जा करतात हे विशेष. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी लक्ष द्यावे अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांकडून समोर येत आहे.



...आम्ही पाणीच पित नाही…

येथे काम करणाऱ्या एका महिलेने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही महिला लघवीला जावे लागत असल्यामुळे आम्ही दिवसभर पाणीच पीत नाही.  फारच गळा सुकला तर एक एक घोट पाणी पितो आणि ऑफिसची वेळ संपण्याची आतुरतेने वाट बघतो. अशाकारणांमुळे महिला कर्मचारी  यांना भविष्यात किडनीचा आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. लघवी रोखणे हे आरोग्यासाठी विशेषतः किडणीसाठी अत्यंत घातक असते, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 



मोठ्या पदावर काम करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना  शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था असते,  मात्र त्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या महिलाचा फारच कोंडमारा होत आहे. नाईलाजास्तव त्यांना दुर्गंधीयुक्त शौचालयात जावे लागते, जिल्हा प्रशासनाने या इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयाचा आढावा घेऊन ही समस्या निकाली लावावी, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. 





टिप्पण्या