crimes filed under POCSO & IT Act: कोचिंग क्लासेसचा संचालक वसीम चौधरीला 26 मे पर्यंतची पोलीस कोठडी




नीलिमा शिंगणे जगड

अकोला : कोचिंग क्लास मधील अल्पवयीन विद्यार्थीनी सोबत मोबाईलवर अश्लील संवाद आणि प्रत्यक्ष अश्लील वर्तन करण्याचा गुन्हा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने सखोल चौकशी करून पुरावे गोळा करण्यास पोलिसांनी मागणी केलेली पोलीस कोठडी मंजूर करून, तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी.पतंगे यांनी वसीम चौधरी याला 26 मे पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. 



शिक्षण हब म्हणून अलीकडे ओळखल्या मिळविलेल्या अकोला शहरात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. कोचिंग क्लासेसच्या संचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी पाक्सो व आयटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करुन या संचलकाला बेड्या ठोकल्या होत्या. आज सोमवारी वसीमला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.  



विदर्भात नावाजलेले चौधरी कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम चौधरी याच्यावर एका 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो सह भारतीय दंड विधान, आय टी ॲक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार,  वसीम चौधरीने आधी मेसेज द्वारे  मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महत्वाचे काम आहे सांगत आपल्या घरी बोलावले. काही वेळ बोलल्यानंतर वसीम चौधरीने तिला मागील खोलीत नेले आणि गैरकृत्य करण्यास सुरुवात केली. मात्र मुलीने त्याला विरोध केला असता याची वाच्यता बाहेर कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी वासिमने दिली. 



यानंतर मुलीने आपबीती आपल्या आईला सांगितली व पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी वसीम चौधरी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, घटनेची गंभीरता लक्षात घेत कोचिंग क्लासवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच कोचीग क्लास सिल करण्यात आला आहे.


या प्रकरणी वसीम चौधरीला रविवारी सायंकाळी अटक केली असून,सिव्हिल लाइन्स पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भादंवि कलम 354 (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम 9 एफ, 10 अल्पवयिन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लिल चॅटिंग करने आदी गुन्हे दाखल केले आहे. सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी आरोपी वसीम चौधरीला अटक केली आहे. 




सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी याने अनेक युवतींची छेड काढली आहे. मात्र बदनामीची भिती, शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तरुणी तक्रारी देण्यास टाळले. आता मात्र वसीम चौधरी विरोधात गुन्हे दाखल झाल्याने चार ते पाच युवती व त्यांचे पालक तक्रार करण्यासाठी पुढे येत असल्याचे संकेत आहेत.




दरम्यान आज न्यायालयात सरकार पक्षाची बाजू ॲड. राजेश अकोटकर यांनी मांडली. तर ॲड.एस.एस.जोशी व ॲड. दिलदार खान यांनी आरोपी चौधरीच्या वतीने युक्तिवाद केला. तर प्रकरणाचा तपास आज स्थानिक गुन्हे शाखा कडे देण्यात आला असल्याचे कळते.


टिप्पण्या