Brutal murder of a youth in Umri akl: उमेश अटाळकर हत्याकांडातील आरोपी नंदू बगाडे याला तीन दिवसाची पोलीस कोठडी



 


भारतीय अलंकार 24


अकोला : उमरी येथील पुलाजवळ घडलेल्या उमेश अटाळकर हत्याकांडातील आरोपी नंदू बगाडे याला आज अकोला जिल्हा व सत्र न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सिव्हिल लाईन पोलिस घेत आहे.



छोट्या उमरी निबंधे प्लॉट परिसरातील एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवार 29 मे रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली होती. सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन हद्दीत मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. उशीरा रात्री संशयित नंदू बगाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.



उमेश अंबादास अटाळकर, (वय 35 रा.लहान उमरी निबंधे प्लॉट) असे हत्या झालेल्या  युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे कर्मचारी पाहोचून तपास सुरु केला होता.


अकोला शहरातील छोट्या उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या उमेश अंबादास अटाळकर या युवकावर अज्ञात युवकांनी प्राणघातक हल्ला केला होता. या युवकांनी उमेशच्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. यानंतर  मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते. 



जखमी झालेल्या उमेशला तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिक्षातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


जुन्या वादातून, आर्थिक व्यवहारातून की प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली,या बाबत पोलीस तपास करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मारेकरी आणि मृतक उमेश हे सोबत होते. अचानक यांच्यात वाद झाला आणि वादाचे रूपांतर हत्येपर्यंत पोहचले. हा वाद सुरू असताना येथे उपस्थित असलेल्या एका युवकाने मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाताला यामध्ये दुखापत झाली. दरम्यान उशीरा रात्री पोलिसांनी नंदू बगाडे नामक संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आज आरोपी नंदू ला न्यायालय समक्ष हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास सिव्हिल लाइन्स पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या