जळगाव जामोद (बुलडाणा): अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत आज जाहीर झाले. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची भविष्यवाणी 350 वर्षाहून अधिक काळ अखंडितपणे सुरू आहे.भेंडवळ घटमांडणी नुसार यंदा रोगराई कमी होण्याबरोबर पाऊसही चांगला होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे.
ही घट मांडणीतून समोर आलेले भाकीत ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात , मध्यप्रदेश , कर्नाटक,मराठवाडा, खान्देश आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने शेतकरी येतात. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे भाकित उलगडल्या जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी जवळपास 350 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही जोपासत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी यंदा भाकित व्यक्त केलं आहे. गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करून वर्षभराची भाकिते या घट मांडणीत केली जातात. शेतकऱ्यांचा या भाकितावर खूप विश्वास आहे.
यंदाच्या घट मांडणीनुसार जून, जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल. ऑगस्टमध्ये चांगला तर सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडेल. अवकाळी पाऊसही राहणार आहे. तूर हे सर्वात चांगले येणारे पीक. तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक असे सर्वसाधारण राहील. तर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ज्वारीचे पीक साधारण असून या पिकाची नासधूस होणार असल्याचेही भाकीत केल्या गेले.
याबरोबर मूग, उडीद हे पीक साधारण असून त्याचीही नासाडी होईल. तेलवर्गीय पीक असलेले तीळ पिकाचे भाव साधारण राहतील. तर भादली हे पीक रोगराईचे प्रतीक असून या वर्षात रोगराईचे प्रमाण कमी असल्याचे भाकीत केले आहे.
तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा, बाजरीचे पीक चांगले राहील मटकी पण साधारण राहील,असे सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा