Ashadhi wari 2022: shegaon palkhi: संत श्री गजानन महाराज पालखी सोहळा यंदा होणार; अकोल्यात 8 व 9 जून रोजी पालखीचा असणार मुक्काम





नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : संत श्री गजानन महाराजांच्या पंढरपूर (आषाढी वारी) पालखी सोहळ्याची 52 वर्षांची परंपरा कोरोना महामारी संकट निर्बंधमुळे खंडित झाली होती. कोरोनाच्या आपत्तीमुळे ‘श्रीं’चा पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगावच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र आता कोरोना महामारीचे संकट निवळत असताना यंदा हा सोहळा पूर्ववत होणार असून, श्रींची पालखी  6 जून रोजी शेगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपुर पायदळ वारी करिता सकाळी 7 वाजता श्री मंदिरातून प्रस्थान होणार आहे. पालखीचे हे 53 वे वर्ष असणार आहे. 



अकोल्यात 8 व 9 जुन रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे. पालखीचा प्रस्थान व परतीचा कार्यक्रम निश्चित झाला असून, विश्राम ठिकाणही दरवर्षी प्रमाणे ठरविण्यात आले आहे.




अकोलेकर श्री भक्तांना हा भक्ती सोहळा दोन दिवस अनुभवता येणार आहे. श्रींची पालखी 6 जून रोजी शेगाव येथून प्रस्थान करणार आहे. यादिवशी श्री क्षेत्र नागझरी मार्गे पारस येथे मुक्काम राहील. मंगळवार 7 जून रोजी गायगाव मार्ग भौरद येथे पालखीचा मुक्काम  असेल. बुधवार, 8 जून रोजी श्रींच्या पालखीचे अकोला शहरात आगमन होवून 9 जून रोजी सुध्दा अकोल्यात मुक्काम राहील. 10 जून रोजी भरतपुर वाडेगाव मार्गे श्रींची पालखी पंढरपुरकडे रवाना होईल.



श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा अकोलेकरांसाठी भक्ती पर्वणीच असते. परंपरेनुसार श्रींच्या पालखीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. तब्बल दोन वर्षाने पालखीचे अकोला आगमन होत असल्याने अकोलेकरांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.




10 जुन रोजी भरतपूर, वाडेगाव, 11 जुन पातूर येथे पालखीचा मुक्काम राहणार असून,12 जुन रोजी पालखी वाशिम कडे रवाना होईल.

 8 ते  12 जुलै पर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम राहील. 13 जुलै रोजी श्रींची पालखी परतीच्या मार्गावर लागेल.

2 ऑगस्ट (श्रावण शु.५ नागपंचमी) पालखी खामगाव येथे येवून शेगाव मार्गी निघणार

3 ऑगस्ट (श्रावण शु.६) पालखी शेगाव येथे पोहचणार आहे.





टिप्पण्या