artificial-reservoirs-thirst-of-wildlife: वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी टॅंकरद्वारे 60 कृत्रिम पाणवठ्यांमधून पाणीपुरवठा



अकोला दि.13: जिल्ह्यातील अकोला वनविभाग व अकोला वन्यजीव विभाग मिळून असलेल्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांना सध्याच्या कडक उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी सुमारे 60 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून, मनरेगा योजनेतून 30 वनतलाव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अर्जूना के.आर. यांनी दिली. 



याशिवाय वनविभागात नैसर्गिक जलस्त्रोतही आहेत, त्यातील पाणीही वन्यजीव हे उपलब्धतेनुसार आपली तहान भागविण्यासाठी वापरत असतात.





अकोला प्रादेशिक वनविभागात चार वनपरिक्षेत्र असून त्यात अकोला, पातूर, बार्शी टाकळी, आलेगाव या वनपरीक्षेत्रांचा समावेश आहे. त्यात 64 नियतक्षेत्र आहेत. यात दोन सहायक वनसंरक्षक, 20 वनपाल, 80 वनरक्षक  कार्यरत आहेत. तर अकोला वन्यजीव विभागात काटेपूर्णा अभयारण्याचा अकोला जिल्ह्यात असणारा कासमार व फेट्रा या दोन वन परिमंडळांचा समावेश होतो.  या शिवाय नरनाळा हा मेळघाटाचा भागही अकोला जिल्ह्याच्या हद्दीत येतो. एकंदर अकोला जिल्ह्यात 38 हजार हेक्टर क्षेत्रावर वने आहेत. ही वने  उष्णकटीबंधीय शुष्क पानझडी वने म्हणून ओळखली जातात.






सध्या उन्हाच्या तीव्र झळा समस्त निसर्गाला होरपळून काढत आहेत. अशा या स्थितीत वनक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 35 वनतळे असून 50 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.  तर अकोला वन्यजीव हद्दीत येणाऱ्या कासमार व फेट्रा मिळून 10 कृत्रिम पाणवठे असे 60 कृत्रिम पाणवठे आहेत. या पाणवठ्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करुन वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जाते.





या शिवाय सिमेंट नालाबांध, वनतलाव, मातीबांध, नैसर्गिक पाणवठे असे नैसर्गिक स्त्रोत आहेत. त्यात 20 सिमेंट नालाबांध, 35 वनतळे  तसेच वनांमधून जाणाऱ्या नद्या, धरणे आदी नैसर्गिक जलस्त्रोत असतात. तथापि, उन्हाळ्यात यातील बहुतांश स्त्रोत आटतात आणि मग वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागते. त्यासाठी ते  मानवी वस्त्यांमध्ये येतात, त्यातून वन्यजीव मानव संघर्ष उद्भवण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वनांमध्ये कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. त्यात पाणी साठवून ते वन्यप्राण्यांना पिण्यासाठी उपलब्ध करुन दिले जातात.




आगामी काळात टंचाई भासू नये यासाठी मनरेगाच्या माध्यमातून 30 नवे वनतलाव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या शिवाय नैसर्गिक स्त्रोत जे उन्हाळ्यात आटले आहेत. त्यांची डागडूजी करण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. त्यात गाळ काढणे, खोलीकरण करणे आदी कामे केली जातात. पाण्याची उपलब्धता नजिक असावी यासाठी भूजल पातळीचा अंदाज घेऊन बोअरिंग करुन पाणी उपलब्ध केले जाते.  पाणी उपसण्यासाठी सोलर पंपाचाही वापर केला जातो. काही ठिकाणी हातपंप बसवून लहान पाणवठे करण्यात आले आहेत. तसेच टॅंकरद्वारेही कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकले जाते. एका कृत्रिम पाणवठ्यात साधारण चार हजार लिटर पाणी साठवता येते.






प्राण्यांची अन्नासाठी भटकंती होऊ नये, म्हणून 90 हेक्टर क्षेत्रावर  कुरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात मिश्र रोपांची व गवताची लागवड केली जाते. वनालगत असणाऱ्या गावातील पाळीवपशू चरण्यासाठी जंगलात येतात हे टाळण्यासाठी  गवत कापून नेण्याची सुविधा दिली जाणार आहे,असेही अर्जूना यांनी सांगितले.  त्यामुळे पाळीव प्राणी जंगलात येणे टाळता येईल. तसेच जंगलातच पुरेसे खाद्य असल्यास वन्यप्राणीही शेतीत जाणार नाहीत.


टिप्पण्या