Amrut Sarovar-Nitin Gadkari-Akola: अमृत सरोवरामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी कृषीसमृद्ध आणि अर्थसंपन्न होईल- ना. नितिन गडकरी; अ‍कोला येथे 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण




नीलिमा शिंगणे जगड

अकोला: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या अमृत सरोवरा मुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त भागामध्ये जलसमृद्धी निर्माण होऊन येथील शेतकरी कृषीसमृद्ध आणि अर्थसंपन्न होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज अकोला येथे व्यक्त केला . 



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ परिसरात 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण ना. गडकरी यांच्या हस्ते कृषी विद्यापीठाच्या परिसरातील के आर ठाकरे सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.



याप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, माफ़्सूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.






राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ  परिसरामध्ये 34 तलावांचे निर्माण होणार असून यातील 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण आज होत आहे. या शेततळ्यातील खोलीकरणातून आलेली माती तसेच  गाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ते बांधकामासाठी  वापरण्यात येणार असून या माध्यमातून तयार होणाऱ्या शेततळ्याला भर उन्हाळ्यात पाणी आहे . या उपक्रमामुळे आज या प्रक्षेत्राच्या  दहा ते बारा गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून तेथील शेतकती आता   लिंबाची शेती देखील करत आहे. या योजनांमुळे मोठमोठे तलाव-धरणे बांधण्याची गरज राहणार नाही. विदर्भ खऱ्या अर्थान सुजलाम् सुफलाम् होईल,असे गडकारी म्हणाले.




रस्तेबांधणीसाठी शेततळी खोलीकरणातून निघालेला गाळ आणि माती रस्त्याच्या बांधकामात वापरून शेतकऱ्यांना कुठलाही खर्च न उचलता शेततळी बांधण्याचा उपक्रम 2017 पासून महाराष्ट्र शासनाच्या एका आदेशान्वये सुरू करण्यात आला होता .त्याला बुलढाणा जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून त्या ‘बुलढाणा पॅटर्नमुळे’ बुलडाणा जिल्ह्यात 132 तलावाचे खोलीकरण झाल असून 22 हजार विहिरी पुनर्जीवित झाल्या तर 152 गावांना पाणी उपलब्ध झाले, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. 




महाराष्ट्र शासनाने पुढील तीन वर्षासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना  प्रत्येकी 50 कोटी असे एकूण 600 कोटी रुपये देण्याचे नियोजन केले असून या माध्यमातून संशोधनाला चालना मिळणार आहे. राज्याचा जमिनीचा पोत, पीक, वाण,  उत्पादकता, प्रक्रिया यांचा समावेश असलेला विभाग निहाय कृषी आराखडा  तयार करण्यात येत असल्याची माहिती यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली .


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले की अकोला जिल्ह्यातील वणी रंभापुर आणि बाभूळगाव प्रक्षेत्रावर 30 मोठे शेततळे तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून सुमारे 1,400 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे . याप्रसंगी त्यांनी कृषी विद्यापीठाच्या विविध उपलब्धतेविषयी उपस्थितांना माहिती दिली


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राजेश अग्रवाल यांनी केले. अकोला जिल्ह्यात 34 अमृत सरोवराचे निर्माण नियोजन असून त्यातील 20 अमृत सरोवराचे काम पूर्ण झाले असून या   या कामातून  12.50 लाखघनमीटर माती काढण्यात आली  आहे .  या 34  अमृत सरोवराच्या माध्यमातून या क्षेत्रातील 2,468 हेक्‍टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे तर  1,276 क्युबिक सेंटीमीटर पाणी साठाक्षमतेचे लक्ष आहे,अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.




अमृत सरोवर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात ‘ मधून मांडलेली संकल्पना  असून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी प्रत्येक जिल्ह्यात 75 असे   देशात एकूण 75 हजार अमृत सरोवर निर्माणाचे ध्येय आहे . या अंतर्गत  जलाशय, नाले, तळे आदींचा कायाकल्प करून, त्यांचे खोलीकरण तसेच संवर्धन करून या अमृत  सरोवराचे निर्माण करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे सरोवर निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बुलढाणा जिल्ह्यात केले होते. त्याला ‘बुलढाणा पॅटर्न’ म्हणून नावलौकिक मिळाला त्याचे कौतुक निती आयोगाने सुद्धा केले होते.अमृत सरोवरमधून शेतकऱ्यांमधून मत्स्यपालन करता येणार असून गावकऱ्यांना राजस्व सुद्धा मिळणार आहे. या सरोवराच्या परिसरामध्ये कडुलिंब, पिंपळाच्या वृक्षाची लागवड होऊन यामुळे भूजल पातळीचे पुनर्भरण आणि जलसंवर्धन सुद्धा होणार आहे.






याप्रसंगी शेततळ्याचे  रूपांतर अमृतसरोवरात झाले, अशा पीकेव्ही अकोला आणि माफसू नागपूर यांच्या मॉडेल प्लान वर आधारित  पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 



टिप्पण्या