Akola railway-railway gate-dabki: रेल्वेगेट उघडण्यास नकार दिल्याने युवकाची रेल्वे गेटमनला शिवीगाळ: दुचाकी व सोबती पोलीसांच्या ताब्यात!




अकोला: रेल्वे गेट का उघडत नाही,असे म्हणत एका युवकाने रेल्वे गेटमनला शिवीगाळ केली. डाबकी रोड रेल्वे गेटवरील ही संपूर्ण घटना  कॅमेराबद्ध झाली आहे. तर घटनेची माहिती गेटमन यांनी त्वरित रेल्वेविभागाला दिली. तूर्तास रेल्वे गेट जवळ राडा घालणाऱ्या युवकाच्या सोबतीस आणि त्याची दुचाकी डाबकी रोड पोलीसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती आहे.


घटनेची हकीकत अशी की, दिनांक ८ मे रोजी रात्री १० वाजता रेल्वे क्रॉसिंग करीता रेल्वे गेटमनने गेट बंद केले होते. गेट बंद झाल्यावर दोन युवक रेल्वे गेटमनला गेट उघडा म्हणून जबरदस्ती करायला लागले. रेल्वे गेटमनने रेल्वे क्रॉसिंग असल्याने आता रेल्वे गेट उघडता येणार नाही सांगितले. "माझा मित्र तिकडे मरत, लवकर गेट उघडा" असे युवक रेल्वे गेटमनला सांगत होता. तुम्हाला जर अर्जंट असेल तर डाबकी रेल्वे पूल खालून रस्ता आहे तिथून जा,असे गेटमनने युवकाला सांगितले. मात्र हा युवक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 


यानंतर युवकाने रेल्वे गेट खालून आपली दुचाकी गाडी काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दुचाकीमुळे रेल्वे गेट उचलले गेले व सायरन वाजायला सुरुवात झाली. रेल्वे गेटमनने युवकाला थांबण्याचा प्रयत्न केला असता युवकाने शिवीगाळ करून धमकावले.   उपस्थित लोकांनी युवकाला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र हा युवक कोणाचेही ऐकत नव्हता. याच दरम्यान येथून रेल्वे क्रॉस झाली. 

दरम्यान, इतका वेळ भांडत असलेला युवक  गेट उघडता वेळीच तिथून पसार झाला. या घटनेची माहिती रेल्वे गेटमनने त्वरित अकोला रेल्वे स्टेशनला दिली. 


अशा युवकांचा नियमित त्रास



रेल्वे गेट मॅन यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की दररोज कमीत कमी पाच ते दहा जण असे युवक आम्हाला इथे येऊन धमकावतात. गेट बंद केल्यानंतर रेल्वेला हिरवा सिग्नल होतो व रेल्वे आपल्या निर्धारित गतीने (speed) रेल्वे गेट पार करते.  हिरवा सिग्नल दिल्यानंतर रेल्वे गेट कुठल्याही परिस्थितीत उघडता येत नाही. रात्री तर अशा लोकांची आम्हाला मारहाण करण्याची सदैव भीती असते. 


युवकावर कारवाई करण्याची मागणी 





युवकावर रेल्वे रूळ क्रॉस करणे, बंद रेल्वे गेट उघडणे, रेल्वे गेटमनला शिवीगाळ, धमकावणे यासाठी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 



युवकाची दुचाकी आणि सोबती ताब्यात 


दरम्यान, या प्रकरणाची डाबकी रोड पोलिसांकडून दखल घेण्यात आली असून, राडा घालणाऱ्या युवकाची दुचाकी व त्याचे सोबत मागे बसलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. 





टिप्पण्या