mahadev-yatra-keliveli-festival-akola: दोन वर्षानंतर केळीवेळीची महादेव यात्रा उत्साहात; कमटया व रंगीत कागदापासून तयार मोठाल्या हत्तिघोडाची निघाली मिरवणूक





ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील ग्रामदानी गाव, विदर्भाची कबड्डी पंढरी असे केळीवेळी हे गाव वेगवेगळ्या बाबीसाठी प्रसिद्ध आहे. येथील महादेवाची यात्राची ख्याती देखील दूरवर पसरली आहे. गावात पूर्णा नदीच्या तीरावर गायरान भूमीमध्ये असलेल्या जागृत देवस्थान म्हणजेच महादेवाचे अर्थात पद्मेश्वराचे मंदिर आहे. येथे दूरवरून भाविक भक्तिभावाने दर्शनाला येत असतात. कोरोना कालखंडानंतर आज केळीवेळी गावात महादेवाची यात्रा उत्साहात झाली. दोन वर्षानंतर भरलेल्या या यात्रेत भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली.



यात्रेचे वैशिष्ट्य




या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बांबूच्या कमट्या व रंगीत कागद वापरून तयार केलेल्या मोठ्या आकाराच्या विविध खेळण्यामध्ये बारुद भरून, तिची मिरवणूक काढण्यात येते. यानंतर हा ' बारुदखाना ' फोडण्यात येतो. आकाशदिवे आकाशात सोडण्यात येतात आणि यात्रेची सांगता होते. ही यात्रा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक गावात येतात.



आख्यायिका 


या मंदिराबाबत एक अशी आख्यायिका आहे.  जेव्हा श्रीरामप्रभू हे 14 वर्ष वनवास भोगत असताना, सीतामाई सोबतीला होत्या. भूमीवर असलेल्या सर्व वने,जंगले व नद्या या ठिकाणी ते फिरायचे. सीतामाई  महादेवाच्या निस्सीम भक्त होत्या. त्या नदीच्या परिसरात फिरताना  महादेवाची पूजा करायच्या मग त्यांना महादेवाचे मंदिर सर्व ठिकाणी मिळणे शक्य नव्हते. म्हणून त्या नदीतील वाळू आणून त्या वाळूची पिंड तयार करून मनोभावे महादेवाला पूजत होत्या. हे पाहून श्रीरामप्रभू यांना योग्य वाटले नाही. त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी सीतामाई वाळूची पिंड तयार करायच्या त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर उभारले. त्यामुळे अनेक नदीपात्रालगत आपणास महादेवाची मंदिरे बघायला मिळतात. श्रीरामप्रभू, सीतामाई यांनी पूर्णा नदीला परिक्रमा घालत असताना, केळीवेळी येथे पूर्णा तीरावर पद्मेश्वराचे मंदिर उभारले होते असे पिढ्यांपिढ्या पासून केळीवेळी गावात बोलले जात आहे.



सावकाराने दिली जमीन दान 



फार वर्षांपूर्वी गावातील एका सावकारांनी यात्रेसाठी 'बारुदखाना' फोडण्याची परंपरा सुरू केली आहे 'बारुदखाना' बनवला जावा त्यासाठी सावकाराने आपल्या मालकीची 2 एकर शेती या कार्यासाठी दान दिली आहे. त्याकरीता सदर व्यक्तीने पीक काढायचं आणि त्याने वर्षातून एकदा बारूदखाना बनवावा, हा "बारुदखाना" म्हणजे बांबूच्या कमटीपासून हत्ती, उंट, जिराफ, माकड, जोकर इत्यादी आकार देऊन त्याला रंगीत कागद चिकटवतात. शेवटी त्यात बारुद भरण्यात येते. आणि यात्रेच्या दिवशी नेऊन पहाटे 4 वाजता तो फोडण्यात येते. यामुळे लोकांना आता यात्रा संपण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळतात. 



सरदार परिवाराने जपली परंपरा


आकाशदिवे देखील यानिमित सोडण्यात येतात.  हवाबंद असलेल्या आकाशादिव्यात दिवा पेटवलेला असतो. मशाल पेटवून त्याचा धूर सोडण्यात येते. त्यामुळे त्या आकाशदिवाच्या वर उडण्याचा वेग वाढतो आणि आकाशदिवा खूप उंचावर उडतो. या आकाशदिव्याचे दूर असलेल्या गावातील लोकांना याचे दर्शन होते. हा अगदी आकाशाजवळ गेल्यागत वाटतो, ही पद्धत काळाच्या ओघात फारशी राहली नाही. कारण जुन्या काळी गावकरी खूप आकाशदिवे सोडायचे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आगीच्या घटना घडत असत. त्यामुळे आता यात्रेची परंपरा जपण्यासाठी मर्यादितच आकाश दिवे सोडतात. आकाशदिवे बनवण्याचे काम गावातील सरदार परिवारातील सदस्यानी अनेक वर्षे काम केले. आजही ते फार चांगल्या पध्द्तीने करतात. आकाशदिवे दूरवर पोहचल्या नंतर यात्रा ओसरायला सुरुवात होते. ही यात्रा गावातील कार्यकर्त्यामुळे दरवर्षी शांततेत पार पडते, अशी माहिती भारतीय अलंकारशी बोलताना गणेश सरदार यांनी दिली.


टिप्पण्या