Heat Wave Continues in Vidarbha: हवामानअंदाज: विदर्भात उष्णतेची लाट कायम: अकोला,अमरावती, बुलढाणा होणार प्रभावित; अकोल्यात मंगळवारी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद





ॲड नीलिमा शिंगणे- जगड

अकोला दि.5:  गेल्या काही दिवसापासून राज्यात तापमान वाढलेले आहे. विदर्भात आणखी दोन तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हंटले आहे.


या दरम्यान दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ञानी अंदाज व्यक्त केला आहे.



यात पुढील दोन तीन दिवस अकोला, अमरावती, बुलढाणा  जिल्हा येथे उष्णता अधिक जाणवणार असल्याचे देखील सांगितले आहे.



 " पुढील 2, 3 दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. Take care" असे हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात आज ट्विट करून माहिती दिली आहे.



अकोला जिल्हाधिकारी यांचे आवाहन


भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्या संदेशानुसार शुक्रवार दि. 8 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम  राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे, शारीरीक श्रमाची कामे टाळावीत अशक्तपणा स्थुलपणा, डोकदुखी, चक्कर येणे ही उष्माघात होण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यानुसार याबाबत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. उष्णेतेच्या लाटेच्या अनुषंगानी सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याचे सूचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिल्या.





मंगळवारी 44.2 तापमान

अकोला जिल्ह्यात मंगळवारी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजचे अकोल्याचे तापमान सर्वाधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 


तापमानाच्या बाबतीत अकोला विदर्भात  आघाडीवर राहिला. शनिवारी 43.5 अंश सेल्सिअस, रविवारी 44.0 तर सोमवारी 44.01आणि आज मंगळवारी 44.02 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  मंगळवारी अकोला विदर्भात पहिल्या क्रमांकावर तर वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला.



जनजीवन विस्कळीत


सूर्योदयानंतर अकोला येथे तापमानाची तीव्रता अधिक असते. सकाळी 9 वाजता देखील उष्णता असल्याने नागरिक आवश्यक कामे दुपारपर्यंत आटोपून घेतात. दुपारी 12 वाजल्यानंतर तर सूर्याची प्रखरता अधिकच वाढत असल्याने अघोषित संचारबंदी झालेली असते. रस्त्याने तुरळक वाहतूक आणि नागरिकांची ये जा सुरू असते. सायंकाळी 7 नंतर लोक घराबाहेर निघणे पसंत करत आहे. मागील काही दिवसांपासून 43 अंशाच्या जवळपास तापमान आहे. आता 44 अंशाच्या जवळ पोहोचले आहे. तीन दिवसांपासून अकोला विदर्भात तापमान पहिल्या क्रमांकावर आहे . जनजीवनावर वाढत्या तापमानाचा परिणाम झालेला दिसत आहे.


 


टिप्पण्या