attack-silver oak-pre -planned - prakash ambedkar- political news: सिल्वर ओक वरील हल्ला पूर्वनियोजीत व राज्य शासनाला कल्पना ;विश्वास नागरे पाटील यांना त्वरीत निलंबीत करावे - प्रकाश आंबेडकर

अकोला: पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर माहिती देताना 




ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला, दि.13: सिल्वर ओक वरील हल्ला पूर्वनियोजीत असून याची राज्य शासनाला कल्पना होती असा आरोप करीत या हल्ल्याला जबाबदार असलेले विश्वास नागरे पाटील यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.


शासकीय विश्रामगृह येथे आज ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषद बोलविली होती, यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याबाबत वक्तव्य केले.तसेच संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे,असे आवाहन केले.



घटनेच्या चार दिवस आधी पत्र


राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर अनूचित घटना घडु शकते, असे पत्र  04 एप्रिल रोजी म्हणजेच घटनेच्या चार दिवस आधीच सहपोलीस आयुक्तांना (कायदा व सुव्यवस्था) देण्यात आले होते. या पत्राची प्रत मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात देखील देण्यात आली होती. या पत्रात केवळ सिल्वर ओकच नव्हेत तर मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांचा मातोश्री बंगला तसेच वर्षा हे शासकिय निवास स्थान, आझाद मैदान, मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकिय निवासस्थान व वांद्रे येथील खाजगी निवासस्थान या ठिकाणी एस. टी. कर्मचारी आंदोलन करू शकतात, असे नमूद असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.


विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त निशीथ मिश्रा यांनी ही पूर्वकल्पना दिली होती. तसे पत्रच त्यांनी 4 एप्रिल रोजी सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना पाठविले होते. त्यामुळे सिल्वर ओकसहीत सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ का करण्यात आली नव्हती असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. राज्याचे पोलीस प्रमुख हे दररोज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सकाळ व संध्याकाळ गुप्तचर अहवाल देत असतात. त्यामुळे या घटनेचा अहवाल गुप्तचर खात्याने मुख्यमंत्र्यांना दिला आहे की नाही याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती मिळाल्यानंतर या संदर्भात नेमक्या काय सूचना दिल्या होत्या, हे देखील जनतेसमोर येणे गरजेचे आहे,असे ॲड. आंबेडकर म्हणाले. 


महाविकास आघाडी गाफील व बेफिकर


हल्ली राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे मंत्री व आमदारांमध्ये सातत्याने ठिणग्या पडत आहे. त्यामुळे वैयक्तीक मतभेदांचा दुष्परीणाम सार्वजनीक ठिकाणी होती आहे की का? या संदर्भात ही घटना बरेच काही बोलुन जाते. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अंतर्गत बंड आहे का? आणि या हेतुनेच गुप्तचर विभागाचा अहवाल दाबुन ठेवण्यात आला होता की काय अशीही शंका यायला वाव आहे. महाविकास आघडीचे प्रमुख शरद पवार यांच्या सुरक्षते संदर्भात महाविकास आघाडी गाफील व बेफिकर असणे हे चिंताजनक आहे आणि ही घटना बोलकी असल्याचे ॲड.आंबेडकर म्हणाले.



विश्वास नागरे पाटील यांना समितीचे प्रमुख कसे केले? 


गुप्तचर यंत्रणेचा स्पष्ट अहवाल सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना 4 एप्रिल रोजीच दिलेला असतांना विश्वास नागरे पाटील यांनी या संदर्भात योग्य कार्यवाही करणे गरजेचे होते. परंतू तसे झाले नाही. राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी  विश्वास नागरे पाटील यांना समितीचे प्रमुख कसे केले? हे सर्वांना आश्चर्यकारक आहे. ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांची चौकशी होण्याऐवजी त्यांनाच चौकशी समिती प्रमुख करणे हे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे विश्वास नागरे पाटील यांना तातडीने या चौकशी समिती प्रमुख पदावरून काढून टाकाण्यात यावे आणि त्यांची चौकशी करावी व विशेष शास्त्रेचे अप्पर पोलीस आयुक्त निशीथ मिश्रा यांनी दिलेली माहिती दाबुन ठेवली. या कारणासाठी विश्वास नागरे पाटील यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे,अशी मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.


संपकरी एस. टी. कर्मचारी यांनी त्वरित कामावर रुजू व्हावे


संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी विना अट कामावर त्वरित रुजू व्हावे,असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले. एस टी महामंडळ महाराष्ट्र शासन मधे विलीनीकरण होवू शकत नाही. जी मागणी मंजुरच होवू शकत नाही, त्या  मागणीसाठी एवढं लांबपल्याला जाण्याची गरज नाही.ज्या मागण्या योग्य आहेत.रास्त आहेत,त्या मागण्या मंजूर होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी एस. टी. कर्मचाऱ्यांसोबत आहे,अशी ग्वाही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी दिली.





पत्रकार परिषदेत डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, बालमुकुंद भिरड, राजेंद्र पातोडे,आकाश शिरसाट, प्रमोद देंडवे, सचिन शिराळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या