world-sparrow-day-2022-akola: जागतिक चिमणी दिवस: ग्रामीण भागात चिऊताईच्या संवर्धनाची जागृती जास्त; ऑनलाईन चिमणी गणनेत झाले स्पष्ट

                 दिन विशेष

       ॲड. नीलिमा शिंगणे जगड


                                          File Photo





अकोला : शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  कार्यालयाच्या वतीने अकोला जिल्ह्यासाठी ऑनलाईन चिमणी गणना आयोजित करण्यात आली होती. या गणनेत 4000 लोकांनी  2 ते 19 मार्च 2022 या कालावधीत सहभाग नोंदविला होता. या गणनेत ७ प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाच्या अनुषंगाने नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्व्हेमध्ये सहभागी यामध्ये 63% ग्रामीण तर 37%शहरी लोकांनी सहभाग घेतला होता. यात 5 ते 10 चिमण्या 25%, 10 ते 20 चिमण्या 42.5%, 50 ते 100 चिमण्या 29.3% भागात दिसण्याचे प्रमाण आहे. फक्त 3.2% भागात चिमण्या दिसत नाही. 12 महिने चिमण्या दिसण्याचे प्रमाण 38.6% , उन्हाळ्यात 24.9%, हिवाळ्यात 21.8% तर सर्वात पावसाळ्यात सर्वात कमी 14.7%  चिमण्या दिसतात. 86.4टक्के लोकांनी चिमण्यांसाठी घरासमोर पाण्याचे भांडे ठेवल्याचे समोर आले असून 81.3 टक्के लोकांनी दाण्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले आहे.



अकोल्याला जिल्ह्यातील चिमण्यांची स्थिती काय आहे व त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाय करावे, यासाठी या सर्व्हेचे आयोजन करण्यात आले होते. मागील वर्षी फक्त 700 लोकांनी या सर्व्हेत सहभाग नोंदविला होता , या वर्षी हे जवळपास 4000 लोकांनी यात सहभाग घेतला. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळला. माणसाच्या जन्मापासून निसर्गाशी नातं जोडण्याचे काम चिऊताई करते, त्यामुळे हिचे संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत करणे गरजे आहे. फक्त  चिमण्यांची संख्याची आकडेवारी न काढता चिमणी संवर्धनासाठी किती लोक जागरूक आहे हे पाहणे हा या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. या वर्षी 94.5% लोकांनी चिऊताईला हक्काचा निवारा देण्याचे ठरविले आहे. जवळपास 1000 पुठ्ठांची कृत्रिम घरटे लावण्याचे नियोजन या सर्व्हेचा माध्यमातून केले आहे.



अकोल्याच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर यांनी या सर्वे बाबत अधिक माहीती देतांना सांगितले की, आपल्या परिसरातील चिमणीचे निरीक्षण करून त्याची नोंद करून ठेवायची. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता व माहीती संकलनाची आवड निर्माण झाली, ज्या भागात चिमणी आहे पण तीला राहण्यासाठी घरटे नाही, अश्या भागात शिक्षक व विद्यार्थ्यीनी स्वयंप्रेरणोतून कृत्रिम घरटे बनवून चिऊताईला हक्काचा निवारा दिला. या चिमणी दिन व सर्वेबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी समाजातील गणमान्य व्यक्तींनी स्वयं प्रेरणेने सोशल मिडीयावरून आवाहन केले होते. या उपक्रमाला महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व निसर्ग कट्टा यांचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या