tours-travels-nand-ganpati-museum chikhaldara: अकोल्यातील प्रदीप नंद यांच्या चिखलदरा मधील 'नंद गणपती संग्रहालयाची' इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद

पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रदिप नंद. याप्रसंगी उपस्थित डॉ.माधव देशमुख, दीपाली नंद आणि इंद्राणी देशमुख  




ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: प्रदीप नंद यांनी सर्वाधिक आगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण 2544 गणपती मुर्त्या संग्रहित करून चिखलदरा सारख्या पर्यटन स्थळी प्रशस्त जागी चार भव्य दालनामध्ये गणपती संग्रहालय सुरु केले, ते अल्पावधीत प्रसिद्ध झाले. यासाठी रविवार 13 मार्च 2022 रोजी "Maximum collection of Ganesh Idols, Different Size and Varieties" या शीर्षक अंतर्गत 'इंडिया बुक ऑफ रेकॉईस'ने  नोंद केली असल्याची माहिती दस्तुरखुद गणपति मूर्ति संग्रहक प्रदीप नंद यांनी दिली. 


यासंदर्भात आज स्थानिक हॉटेल मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत प्रदीप नंद यांनी गणपति मूर्ती संग्रह करण्याचा छंद ते मोठे संग्रहालय उभारण्याचा प्रवास आणि इंडिया बुक मध्ये संग्रहालयाची नोंद याबाबत सविस्तर माहिती दिली.



नंद यांनी सांगितले की, इंडिया बुक ऑफ रेकॉईस संस्थे कडून त्याचे प्रतिनिधी म्हणून संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी नागपूरच्या डॉ. सुनीता धोटे आल्या होत्या. संग्रहालयाची अतिशय बारकाईने, कसून तपासणी करून नंद यांच्या कडून सर्व गणपतीची माहिती समजावून घेतली. त्यानंतर लगेच एक छोटासा अवार्ड वितरणाचा बक्षीस समारंभाचा सोहळा डॉ. सुनीता धोटे यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रसंगी संग्रहालय पहायला आलेले असंख्य पर्यटक उपास्थीत होते, त्यात प्रामुख्याने इंडोनेशियाची राधा नावाची पर्यटक हा सोहळा मोठ्या कौतुकाने चित्रित करीत होती. सोबतच चिखलदरा, आलाडोह, मोथा येथील प्रतिष्ठित नागरिक साधुराम पाटील उपसरपंच मोथा, साबूलाल दहीकर माजी सरपंच मोथा, चिखलदऱ्याचे उपनगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, हमीद अहमद खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामिण सचिव शेख इस्माईल शेख हैदर, फत्तु येवले, रवी काळे, ज्ञानेश्वरी पाल, शिल्पा पाल, नंदकुमार खडके आदी उपस्थित होते.


 


संग्रहालयात विविध आकार आणि अवतारातील 2544 गणपति मूर्ती




प्रदीप नंद (गोटू सेठ) व  दीपाली नंद हे अकोल्याचे रहिवासी यांनी 30 वर्षात 2544 गणपती संग्रहित केले. या संग्रहित गणपती मध्ये पितळ, तांब, काच, फायबरचे गणपती आहेत अतिशय सूक्ष्म म्हणजे दुर्बीण मधून पाहण्यासारखे गणपती मोहरीवर, तीळावर, तांदळावर, गव्हावर, साबुदाण्यावर, दुर्वेवर, पेन्सिलच्या टोकावर माचिसच्या काडीच्या गुलावर पेंटिंग तथा कोरलेले गणपती. खडूंवरील गणेश शिल्प, औषधाच्या गोळ्यांचा गणपती, पेन्सिल चा गणपती, बटनांचा गणपती, पानांचा गणपती, मेणबत्तीचा गणपती, मोबाईलच्या IC चा गणपती, भुश्याचा गणपती, शिंपल्याच्या आतील गणपती, पर्यावरण संदेश देणारा गणपती, व्यास मुनी भागवत सांगताना व लिहिणारा गणपती, रुद्राक्षाचा गणपती, आदिवासिच्या कल्पनेतील गणपती, फुलांच्या पाकळ्यांचा गणपती, वाहन चालवतानाचा गणपती, मोटारसायकल व कार चालवतांनाचा गणपती, बैलबंडी चालवतांनाचा गणपती, विविध खेळ खेळतांनाचे गणपती उदा. बुद्धिबळ, कुरघोडी, कबड्डी, खोखो, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबलटेनिस, फुटबॉल इत्यादी सोबत विविध पारंपरिक सर्व वाद्य वाजवतांनाचे गणपती, सर्वात महत्वाचे टिळक गणपती, संविधान हातातला घेतलेला गणपती, रुग्ण तपासतांना गणपती विविध देवतांच्या आवतारातील गणपति मूर्ती संग्रहालयात पाहायला मिळत असल्याची माहिती यावेळी संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ.माधव देशमुख यांनी दिली.



भारतातील सर्व राज्याचे आणि परदेशातील गणपती मूर्ती



संग्रहालयात भारतातीलच नव्हेतर परदेशातीलही गणपति मूर्ती संग्रहालयात आहेत. यामध्ये अतिशय बारीक कोरीव काम केलेले गणपती. दगडावरील गणपती पाहायला मिळतात. त्यात भुवनेश्वर, चेन्नई, महाबलीपूरम, जयपूर, बालासोर, उदयपूर, किशनगढ, पातूर, म्हैसांग, बेळगांव, खजुराहो येथून संकलित केले. विदेशातील म्हणावं तर इंडोनेशिया, बँकॉक, सिंगापूर, चायना, नेपाळ, भूतान, तिबेट लाकडी कोरीव काम केलेले गणपती काश्मीर, राजस्थान व उत्तर प्रदेशातून संग्रहित केले. भारतातील प्रमुख समुद्राच्या वाळूचे गणपती संग्रहालयात आहेत,अशी माहिती यावेळी प्रदिप नंद यांच्या पत्नी दीपाली नंद यांनी दिली.




तीन एकर क्षेत्रात भव्य संग्रहालय




नंद गणपति संग्रहालय हे चिखलदरा येथे तीन एकरात असून, त्याचे भव्य महाद्वार हे पर्यटकांना एखाद्या राज वाड्या समान दिसतं. येथील सर्व श्रीगणपती बाप्पाच्या कला, रूपे, अवतार, एकाच छताखाली पर्यटकांना उपलब्ध असल्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉईसच्या संस्थेने हा अवार्ड प्रदीप नंद उर्फ गोटुसेठ यांना दिला आहे, असे पत्रकार परिषदेत इंद्राणी देशमुख यांनी सांगितले.




टिप्पण्या