RTO-inspection-helmets-bike-riders: शासकीय कार्यालयापुढे आरटीओची तपासणी मोहिम: कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती; 120 जणांवर कारवाई, ऐन उन्हाळ्यातच हेल्मेट सक्तीची कारवाई का?





ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: राज्यात दुचाकी वाहन धारकांसाठी  हेल्मेट सक्ती असून देखील नियमाची पायमल्ली होत असताना सर्वत्र दिसत आहे. या कायद्याचा विसर पडलेल्या नागरिकांसाठी आजपासून अकोला आरटीओने जनजागृती मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ शासकीय कर्मचाऱ्यांपासून करण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजता पासून सुरू झालेल्या मोहिमेत आतापर्यंत जवळपास 120 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. उप प्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या पुढाकाराने ही मोहीम अकोला शहरात जिल्हाधिकारी कार्यालय पासून सुरू झाली आहे.



जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाजवळ हेल्मेट तपासणी मोहीम आरटीओ विभाग मार्फत राबविण्यास सुरुवात झाली आहे. हेल्मेट घालण्याची शिस्त लागावी, यासाठी शासकीय कार्यालयापासून या मोहिमेचा आरंभ  करण्यात आला आहे. 



यामध्ये कार्यालयात येणारे शासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच नागरीकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घालुनच यावे, असे आवाहन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले होते. जयश्री दुतोंडे यांनी यापूर्वी अश्याच प्रकारची मोहीम बुलडाणा जिल्हयात 2019 मध्ये राबविली होती. परिणामी अपघाताच्या प्रमाणात ऑरेंज झोनमध्ये आलेल्या जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी होऊन जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला होता,असे दुतोंडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. 




एका अहवालानुसार जिल्ह्यात 2021 मध्ये घडलेल्या अपघातांचे प्रमाण बघता जवळपास 50 ते 55 टक्के अपघात दुचाकींचे आहेत. यामध्ये डोक्याला इजा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वांनी हेल्मेट घालणे व वाहतुक नियमांचे पालन करणे आवश्यक झाले असल्याचे दुतोंडे यांनी सांगितले.


आज अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे 120 दुचाकीवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम आता जिल्हाभरातील विविध शासकीय कार्यालयाजवळ राबविण्यात येणार असल्याची माहिती जयश्री दुतोंडे यांनी दिली.



सध्या अकोला जिल्ह्यात एकूण वाहनांची संख्या पाच लाख 15 हजार 849 आहे. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या चार लाख 10 हजार 558 आहे. एकूण वाहनांच्या तुलनेत जवळपास 80 टक्के वाहने ही दुचाकी वाहने आहेत. जिल्ह्यातील सन 2021 मध्ये झालेल्या एकूण अपघातांपैकी दुचाकीच्या अपघातांची संख्या 50 ते 55 टक्के होती. त्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहन चालकांच्या सुरक्षेकरिता हेल्मेट घालणे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. याच कारणामुळे जिल्ह्यात दुचाकी स्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. 



उपप्रादेशिक परीवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी आरटीओ व जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 30 मार्च पासून हेल्मेट तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. आज या मोहिमेला जिल्हाधिकारी कार्यालय पासून सुरवात झाली आहे. यानंतर जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय, महानगरपालिका यासह सर्व शासकीय कार्यालयांपुढे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घालूनच यावे, असे आवाहन जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.   



अपघाताला आळा


जिल्ह्यातील एकूण अपघातांमध्ये दुचाकीच्या अपघाताचे प्रमाण 50 टक्केपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करणाऱ्यांनी हेल्मेट घातल्यास अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होऊन जिल्हा अपघात मुक्त होऊ शकतो. त्यामुळे कारवाई टाळून हेल्मेट घाला व तपासणी मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.



ऐन उन्हाळ्यातच सक्ती का?


अकोला जिल्हाचे तापमान सध्या 40 डिग्री सेल्सिअस आहे. दिवसेंदिवस तापमान वाढतच आहे. अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात दुचाकी चालविणाऱ्याना हेल्मेट घालून बाईक चालवणं अतिशय कठीण असते. तापमान जास्त असताना, हेल्मेट लावल्याने डोक्याजवळ गर्मी अधिक वाढते. परिणामी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अश्यात आरटीओ कडून हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यास सुरवात केली आहे. ऐन उन्हाळ्यातच ही मोहीम आरटीओला का सूचावी? हे कोडेच आहे. शहरात अंतर्गत मार्गावर सुसाट वेगात विना हेल्मेट बाईक पळविणाऱ्या वाहन धारकांवर आरटीओने कारवाई करावी. अशा वाहन धारकांची संख्या 10 ते 15 टक्के असावी.त्यासाठी सर्व वाहन धारकांना वेठीस धरणे योग्य नाही. सरसकट सर्व वाहन धारकांवर कारवाई करू नये. महामार्गावरील विना हेल्मेट वाहन धारकांवर कारवाई करावी. शहरात अंतर्गत मार्गावर व शहरातील मुख्य मार्गावर गर्दी मुळे पहिलेच कमी वेगाने वाहन चालतात. प्रत्येक चौकात आरटीओ पोलीस वाहतूक सांभाळत असतात, आणि बेशिस्त वाहनधारक यांच्यावर कारवाई होतच असते. मग आताच हेल्मेट सक्तीची कारवाई अचानक ऐन उन्हाळ्यातच का,अशी संतप्त प्रतिक्रिया आज कारवाई झालेल्या एकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर प्रसार माध्यमां जवळ व्यक्त केली.





टिप्पण्या