RRR-Movie-review-in-marathi-akola: उत्तम मनोरंजनाचा खजाना 'आरआरआर' चित्रपट: ॲक्शन दृश्य, स्पेशल इफेक्ट्स, नृत्य कौशल्यने प्रेक्षक थक्क!



( Photo courtesy:RRRMovie/twitter)



ॲड. नीलिमा शिंगणे जगड

बाहुबली व बाहुबली 2 सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, चित्रपट प्रेमी एस.एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' (राईज, रोर, रिवोल्ट) ची आतुरतेने वाट पाहत होते, आणि 25 मार्च रोजी आरआरआर जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यावर प्रतिक्षा संपली. या चित्रपटाद्वारे ज्युनियर एनटीआरने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. तर  राम चरणचा हा दुसरा हिंदी चित्रपट आहे. तेलगू चित्रपट उद्योगातील दोन लोकप्रिय अभिनेत्यांची दमदार भूमिका असलेला RRR, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. राजामौली यांच्या कडून प्रेक्षकांना खूप काही अपेक्षा होत्या.आणि त्या बऱ्याच अंशी पूर्ण झाल्या आहेत,असे चित्रपट पाहिल्यानंतर कळते.  



2015 मधे बाहुबली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी राजामौली यांच्या कडून लोकांच्या अपेक्षा फार नव्हत्या. नंतर या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याची घोषणा झाली, आणि  प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या. 2017 मधे प्रदर्शित झालेल्या बाहुबली 2 ने ऐतिहासिक यश मिळविल्यानंतर तर RRR कडून अधिकच अपेक्षा वाढल्या, आणि अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरला.


RRR हा संपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट


RRR चित्रपटाचे कथानक स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. 1920 चा काळ चित्रपटात दाखविण्यात आला आहे. संपूर्ण चित्रपट कथानक दोन क्रांतिकारक यांच्या भोवती फिरते. RRR हा संपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट आहे. पटकथा उत्तम आहे. उत्कंठावर्धक दृश्य आहेत. ॲक्शन दृश्य चित्रपटाच्या शेवटच्या क्षणपर्यंत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे, राजामौली यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कथानक अजिबात उघड केले नव्हते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने देखील याबाबत विशेष खबरदारी घेतली होती. चित्रपट प्रमोशन वेळी देखील कलाकारांनी सुद्धा कथानक बाबत कुठेच कोणताच उल्लेख केला नव्हता. त्यामुळे सिनेमागृहात चित्रपट पाहताना पडद्यावर जे काही उलगडत जाते,ते प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत जाते. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना शेवट पर्यंत आसनावर खिळवून ठेवते.



बाहुबली, बाहुबली 2  चित्रपट पाहता राजामौली यांच्या चित्रपटात भारतीय संस्कृति, परंपरा, इतिहास दाखविण्याचा प्रयत्न केला असतो. सत्य कथेला कल्पनेची जोड असल्याने भरपूर मनोरंजनाने त्यांचे चित्रपट परिपूर्ण असतात.  RRR मधे देखील यापेक्षा अधिक वेगळे काही नाही. मात्र, राजामौली यांना प्रेक्षक त्यांच्या कडून काय अपेक्षा करतात, हे त्यांना ठाऊक असल्याने प्रत्येक चित्रपट मनोरंजनाने पुरेपूर भरलेली असतात. राजामौली यांच्या चित्रपटांमधे प्रत्येक पात्रांच्या भूमिकेला न्याय दिलेला असतो. विशेष म्हणजे प्रत्येक पात्रांच्या मनातील भावना पडद्यावर ठळक झळकतात, म्हणून प्रत्येक प्रेक्षकांना तो आपला चित्रपट आहे,असे वाटत असते. त्यामुळेच राजामौली यांचे चित्रपट वेगळे ठरतात.



 


स्पेशल इफेक्ट्स साठी चित्रपट मोठया पडद्यावरच पाहावा


RRR चित्रपटात 1920 मधील काळ दाखविला आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य आहे.  ब्रिटीश अधिकारी स्कॉट बक्सटन (रे स्टीव्हन्सन ची पत्नी (अलिसन डूडी) मल्ली या आदिवासी मुलीवर प्रभावित होते. नंतर ती मल्लीला जबरदस्ती दिल्लीला घेऊन जाते. यामुळे मल्लीचे आई वडील आणि त्यांच्या टोळीला खूप त्रास होतो. भीम (ज्युनियर एनटीआर), जो आदिवासी जमातीचा आहे. तो मल्लिला परत आणण्याचे वचन आपल्या लोकांना देतो.  यानंतर ज्यावेळी इंग्रजांना भीम आणि त्याच्या मिशनबद्दल कळते, त्यावेळी ते कोणत्याही परिस्थितीत भीम याचा शोध घेण्याचा ठाम निर्णय घेतात. परंतू ,भीम कसा दिसतो हे कोणालाच माहीत नसते. मात्र, भीमला शोधण्याचे आव्हान एक पोलीस अधिकारी, रामा राजू ( राम चरण) स्वीकारतो. आणि कथानक पुढे सरकते. चित्रपटातील भावनिक दृश्ये, विनोद, नाटक, ॲक्शन अस सर्व थक्क करून सोडतात, जे मोठया पडद्यावर पाहणेच योग्य आहे.


 


थोड्या कमतरता


चित्रपटात जेवढ्या जमेच्या बाजू आहेत,तश्या एक दोन कमतरता देखील जाणवतात.  चित्रपट उत्तरार्धानंतर थोडा रटाळ वाटतो. मात्र, अन्य भव्य दिव्य दृश्य, आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेले स्पेशल इफेक्टस या किंचित असलेल्या कमतरता पेलून घेतो. याशिवाय   काही दृश्य असे आहेत, जे तर्क बुध्दीच्या पलीकडे आहेत. मात्र, काल्पनिक कथा असलेला हा चित्रपट भरपूर मनोरंजन करतो, त्यामुळे चित्रपट कोणतेही तर्क लावून प्रेक्षकांनी पाहू नये.  




दमदार अभिनय


Photo courtesy: RRRMovie/twitter



चित्रपटातील कलावंत आणि पात्रांबद्दल बोलायचे झाल्यास, आलिया भट्टचं पात्र चित्रपट लेखकाला अधिक चांगलं लिहिता आलं असतं. यामुळे आलियाला चित्रपटात अधिक वावरता आले असते. मात्र, आलियाने आपल्या पात्राला दमदार अभिनयाने पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे . अजय देवगण उत्तम कॅमिओमध्ये चित्रपटात दिसतो.  रे स्टीव्हनसन (स्कॉट) आणि अ‍ॅलिसन डूडी (लेडी स्कॉट) नकारात्मक भूमिके मध्ये बसतात. ऑलिव्हिया मॉरिसला मर्यादित वाव मिळाला आहे. श्रिया सरन कॅमिओमध्ये सूट झाली. RRR चित्रपटाची धुरा  ज्युनियर NTR आणि राम चरण यांच्या खांद्यावर आहे.  ज्युनियर एनटीआरची भूमिका दमदार आहे. राम चरण चित्रपटात अप्रतिम दिसतो.   



उत्तम गाणी आणि नृत्य कौशल्य


चित्रपटातील गाणी सिनेमागृह मधून बाहेर पडल्यावरही लक्षात राहतात. गुणगुणने आणि मोठ्याने गाण्यास देखील भाग पाडतात.'शोले' 'नाचो नाचो' मधील ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षक थक्क होतात. संपूर्ण सिनेमागृह डोक्यावर घेतात.  या गाण्याची कोरिओग्राफी सर्वोत्तम आहे.  के के सेंथिल कुमारची सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट आहे. साबू सिरिलची प्रॉडक्शन डिझाइन शानदार आहे. रामा राजामौली यांनी वेशभूषेवर सखोल अभ्यास केलेला दिसतो. प्रत्येक पात्रांची वेशभुषा साजेशी असल्याने, चित्रपटात दाखवलेला ब्रिटिश काळ प्रेक्षकांना अनुभवता येतो. चित्रपटाचे बलस्थान म्हणजे ऍक्शन दृश्य. .



मनोरंजनाचा खजाना


एकंदरीत RRR हा एक उत्तम मनोरंजन करणारा चित्रपट आहे. सर्व ठिकाणी या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर धूम केली. मनोरंजनाचा खजाना या चित्रपटात पुरेपूर असल्याने, स्पेशल इफेक्ट्स असल्याने मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहणे चांगले आहे. 




वसंत टॉकीज येथे चार खेळ


वसंत टॉकीज


अकोल्यातील वसंत टॉकीज येथे हा चित्रपट सुरू असून, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तुफान गर्दी चित्रपटाने खेचली. दररोज चार खेळ होतात. ऑनलाईन बुकींग आणि ॲडवांस बुकींग सुविधा येथे उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापक श्याम पडगीलवर यांनी दिली.

टिप्पण्या