obc-rights-summit-sunday-shegaon: शेगाव येथे ओबीसी अधिकार संमेलन रविवारी; वीस हजार ओबीसी बांधव उपस्थित राहणार !





ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला : ओबीसींच्या विविध प्रश्नांसंदर्भात भुमिका घेण्यासाठी, ओबीसींच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्यासाठी शेगांव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात  व  छत्तिसगडचे मुख्यमंत्री भुपेश सिंह बघेल, युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थीतीत ओबीसी अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. या अधिकार संमेलनासाठी अकोला जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थीत राहावे, असे आवाहन ओबीसी नेते व प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाश तायडे यांनी केले.



स्थानिक शासकिय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेसाठी ओबीसी नेते व प्रदेश कॅांग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे, जिल्हा कॅांग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश भारती, किसान कॅांग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवी पाटील अरबट,ओबीसी अधिकार संमेलनाचे मुख्य संयोजक मंगेश भारसाकळे, प्रा. अनिल अंमलकार उपस्थीत होते. महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी व आयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आमंत्रित केली होती.



ओबीसींच्या हक्कांबाबत व संवैधानिक अधिकारांबाबत ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच ओबीसींचे संघटन अधिक भक्कम व्हावे ह्या उद्देशाने २८ मार्च रोजी शेगांव येथे स्व. गजानन दादा पाटील मार्केट यार्ड शेगांव येथे सकाळी ११ वाजता ओबीसी अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे.


या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश सिंह बघेल, गुजरात प्रदेश काँगेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष व युवा नेते हार्दिक भाई पटेल, महाराष्ट्र राज्य महीला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे हे ओबीसी बांधवांना संबोधीत करणार आहेत.



मेळाव्याला सुमारे २० हजार समाज बांधव उपस्थीत राहतील अशी व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अकोला बुलढाणा व वाशीम या तिन जिल्ह्यातील ओबीसी संघटना व कार्यकर्त्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.



अधिकार संमेलनातील ठराव


ओबीसींचे राजकिय आरक्षण पुनर्स्थापित होण्यासाठी केंद्राने इंपेरिकल डेटा उपलब्ध करु द्यावा.


केंद्र सरकारने देशभरात जातिनीहाय जनगणना करावी.


महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले ह्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.


पुणे अंरराष्ट्रीय विमानतळाला जगतगुरु संत तुकाराम महाराज ह्यांचे नांव देण्यात यावे.


देशपातळीवर स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे.


जगतगुरु तुकाराम महाराज ह्यांच्या जयंतीची तारीख शासन स्तरावर निश्चित करण्यात यावी. 

हे ठराव मांडण्यात येतील. 



शेगांव येथील ओबीसी अधिकार संमेलन हे बांधवांच्या हक्क आणी अधिकाराच्या लढाईतील एक महत्वाचा टप्पा असणार आहे. ह्या अधिकार संमेलनासाठी जिल्ह्यातील हजारो समाज बांधवांनी उपस्थीत राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने यावेळी करण्यात आले.

टिप्पण्या