nabhik-samaj-samelan-shegaon: समाजाच्या जगण्याचं प्रतिबिंब साहित्यातून दिसावं -डॉ. प्रदीप कदम; शेगाव येथे नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन उत्साहात



डॉ.प्रदीप कदम संमेलनाध्यक्ष. तर उद्घाटक म्हणून कॅप्टन महेश गायकवाडांची उपस्थिती 




शेगाव (प्रतिनिधी) : समाजाचा एकत्रित आवाज म्हणजे साहित्य संमेलन असतात. त्यामूळे समाजाची भूमिका ही साहित्यातून प्रतिबिंबित होते. म्हणूनच साहित्य हा समाजमनाचा आरसा ठरतो. त्यामूळे माणसाला साहित्याच्या आरशात स्वत:च्या जगण्याचं प्रतिबिंब दिसावं', असं प्रतिपादन शेगाव येथे आयोजित नाभिक समाजाच्या द्वितीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम यांनी व्यक्त केली. शेगावातील विघ्नहर्ता लॉन सभागृहातील 'क्रांतीवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल साहित्यनगरीत हे एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडलं. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड उपस्थित होते. 'महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघानं या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी व्यासपीठावर कलादर्पण संघाचे अध्यक्ष शरद ढोबळे, संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम, उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाड, अमरावती येथील पहिल्या संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, कलादर्पण संघाच्या सुनिता वरणकर, प्रा. अविनाश बेलाडकर आणि स्वागताध्यक्ष विलासराव वखरे उपस्थित होते. 




    

संमेलनाचं प्रास्ताविक ''महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघा'चे अध्यक्ष शरद ढोबळे यांनी केलं. यावेळी संमेलनाचे उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाडांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलतांना त्यांनी संत सेना महाराजांची खरी ओळख समाजाला आतापर्यंत करून न दिल्या गेल्याची खंत व्यक्त केली. ते ताकदीचे विचारवंत होते, परंतू त्यांचा वैचारिक वारसा साहित्यातून दिसत नसल्याचं गायकवाड म्हणालेत. महामानव डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात साठवून समाज घडवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. 




    

अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम यांनी यावेळी संमेलनाध्यक्षपदाची सुत्रे स्विकारलीत. यावेळी बोलतांना मांडवकर म्हणालेत की, 'साहित्य जगण्याचं बळ देतं, नवा विचार देतं, जगण्याचं बळ देतं. त्यामूळेच समाजाच्या जगण्याचं सार नाभिक साहित्यातून उमटायला हवं, अशी अपेक्षा मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली. संमेलनात नाभिक समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या 'विशेष स्मरणिका कलादर्पण'चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाभिक समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. उद्घाटन सत्राचे संचलन नांदेडच्या अशोक कुबडे आणि अश्विनी अतकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश बेलाडकर यांनी केले. 


    

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात 'नाभिकांच्या जीवनातील नव्या विकास वाटा साहित्यातून विस्तारल्या जाव्यात', या विषयावर परिसंवाद झाला. प्रा.यशवंत घुमे यांच्या अध्यक्षतेखालील परीसंवादात पुण्याचे चंद्रशेखर जगताप, सोलापूरचे दत्ता पारपल्लीवार, वर्धेच्या अर्चना धानोरकर सहभागी झाले. यानंतर श्रीधर राजनकर आणि नितेश राऊत यांच्या कथाकथनाने संमेलनात रंगत आणली. यानंतर निमंत्रितांच्या कवी संमेलनातील कवींच्या रचनांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. संमेलनाचा समारोप बक्षिस वितरण आणि पुण्याचे मारूती यादव यांच्या 'हास्यजत्रा' कार्यक्रमाने झाला. 


       



संमेलनात 85 वर्षीय 'युट्युबर' आजीचा सन्मान 


आजच्या संमेलनात कोकणातील रत्नागिरीच्या नाभिक समाजातील 85 वर्षीय 'युट्युबर' आजी गुलाबबाई पवार यांचा विशेष सत्कार आला. या आजीने युट्युब समाज माध्यम मधे 'आपली मुलगी गौरी' नावानं स्वत:चं 'यट्युब चॅनेल' सुरू केले. यावर लाखो फालोअर्स आहे.  या 'चॅनल'च्या माध्यमातून आजी मनोरंजन आणि कोकणातील खाद्य संस्कृतीची माहिती देणारे व्हिडीओ प्रसारित करतात. समाजाच्या वतीने आजीचा विशेष सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या