keliveli-kabaddi-vinayak-mali-cup: कबड्डीच्या पंढरी खेळाडूंची मांदियाळी: कोरोना काळानंतर केळीवेळीत पुन्हा रंगले सामने; साई अमरावती संघाची विजयी सलामी






ॲड.नीलिमा शिंगणे- जगड

केळीवेळी (अकोला): विदर्भात कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीवेळी या गावात कोरोना काळानंतर पुन्हा एकदा कबड्डी...कबड्डी... चा नाद घुमला. याला कारण बऱ्याच काळ रखडलेली आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायक माळी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला अखेर मुहूर्त सापडला. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी सायंकाळी निर्विघ्न पार पडला. यात यजमान श्री हनुमान मंडळ केळीवेळी आणि साई प्रशिक्षण केंद्र अमरावती संघात झालेल्या उद्घाटनीय सामन्यात मुलींच्या गटात अमरावती संघाने बाजी मारून,स्पर्धेला विजयी सलामी दिली.



 असा रंगला सामना




मुलींच्या गटात यजमान श्री हनुमान मंडळ केळीवेळी संघाने 10 गुण मिळविले. तर  साई प्रशिक्षण केंद्र अमरावतीने अतिशय सुंदर खेळी करत 48 गुण मिळविले. तब्बल 38 गुणांनी हा   सामना अमरावती संघाने जिकुन स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. तर मुलांच्या ओम अमर नागपूर व श्री हनुमान मंडळ केळीवेळी संघात प्रदर्शनी सामना खेळविण्यात आला.




उद्घाटन सोहळा




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण गव्हाणकर होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आकाश सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून महापौर अर्चना मसने उपस्थित होत्या. कार्यक्रमाला ॲड. मोतीसिंह मोहता, जयंत मसने, कविता मिटकरी, हरिदास भदे, हभप सोपान शेलार,पंजाब वडाळ,संग्राम गावंडे, शिरीष धोत्रे, डॉ. अभय  पाटील, चंद्र शेखर पांडे,प्रदीप वानखेडे, कुलदीप वसू सतीश डफळे,अशोक देशमुख, वासुदेव नेरकर, ध्यांनदेव परनाटे,संतोष शिवरकर, किशोर बुले, मुकुंद बकाल, गजानन नळे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची शुभेच्छापर भाषण झालीत. मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अनिल गासे,अमोल चिलात्रे यांनी केले.प्रास्ताविक गजानन दाळू यांनी केले. आभार माधव बकाल यांनी मानले.



संस्कृती देहणकरने जिंकली मने



स्पर्धा उद्घाटन प्रसंगी संत गजानन महाराज कॉन्व्हेन्टच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीतांवर दिलखेच नृत्य केले. यामध्ये संस्कृती देहानकर या मुलीने श्रीभारत मातेची वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. 



महिलांची लक्षणीय उपस्थिती



केळीवेळी गावप्रथेनुसार कबड्डी स्पर्धा निम्मित माहेरवासिनी गावी येतात.तसेच स्पर्धेतील महिलांचे सामने बघण्यासाठी व महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आजच्या उद्घाटन प्रसंगी आणि सामना प्रसंगी गावकरी महिला, मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.



कबड्डी प्रेमींनी केली गर्दी




स्पर्धेतील रोमांचकारी खेळ पाहण्यासाठी मैदानावर अकोला शहर व केळीवेळी परिसरातून कबड्डी प्रेमींनी हजेरी लावली होती. मैदानातील सर्व प्रेक्षक गॅलरी गच्च भरल्या होत्या.



स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी किशोर बुले, कैलास ठाकूर, कमलेश गावंडे, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, डॉ राजकुमार बुले यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि गावकरी प्रयत्न करीत आहेत.



(सर्व छायाचित्र: ॲड. नीलिमा शिंगणे - जगड)

टिप्पण्या