court-news-akola-crime-barshitakali: विनयभंग प्रकरणी सैन्य दलात असलेल्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा





नीलिमा शिंगणे जगड

अकोला: बार्शीटाकळी पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी निलेश भिमराव हिवराळे (रा पारडी, ता. बार्शीटाकळी जि. अकोला वय ३५ वर्षे) यास बालिकेचा रस्त्यामध्ये अडवून विनयभंग करून असभ्य वर्तन केल्याच्या आरोपात आज दोषी ठरवण्यात आले. आरोपी हा सैन्यदलात असल्याने त्याने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित होते, अशी टिपणी न्यायलयाने हा आदेश पारित करताना केली. विद्यमान विशेष जिल्हा न्यायाधीश वी. डी. पिंपळकर यांचे न्यायालयात आरोपीवर सदर आरोपांबद्दल दोषारोप ठेवण्यात आले होते. 




अधिकतम शिक्षा ७ वर्षे


पिडीतेच्या वडीलांनी दि ०९/०८/२०१४ रोजी या बाबत फिर्याद दाखल केली होती, प्रकरणात सरकार तर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यांचे आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठवल्यानंतर भा. द.वी. कलम ३५४ अ मध्ये ३ वर्ष सक्त मजुरी ५०००/- रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ५०६  (२) मध्ये ७ वर्ष सक्त मजुरी ५०००/- रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, पोक्सो कायदा कलम ११-१२ मध्ये ३ वर्ष सक्त मजुरी ५०००/- रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली, सर्व शिक्षा आरोपीस सोबतच भोगवयच्या आहेत (अधिकतम शिक्षा ७ वर्षे). दंडाची एकूण रक्कम रू १५०००/- आरोपी कडून वसूल झाल्यास त्यापैकी अर्धी रक्कम पिडीतेस व अर्धी रक्कम शासनास देण्यात यावी असे आदेशात नमूद आहे. 




आरोपी हा सैन्यदलात असल्याने त्याने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित- न्यायालयाची टिपणी


आरोपी हा सैनिक म्हणून कार्यरत आहे, याचा फायदा घेऊन त्याने सन २०१४ पासून सतत प्रकरण प्रलंबित ठवण्याचा प्रयत्न केला. महत प्रयासानंतर आरोपीस अटक करण्यात येऊन प्रकरण निकाली कढण्यात आले. आरोपी हा सैन्यदलात असल्याने त्याने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित होते, अशी टिपणी विद्यमान न्यायालयाने केली आहे. श्री जगदीश  जायभाये A S I यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी वकील मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल प्रदीप पिंजरकर व सी एम एस चे प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून सहाय्य केले.

टिप्पण्या