budget-session-2022-akola-airport: अकोला विमानतळाचा ‘उड्डाण योजनेत’ समावेश केल्यास विस्तारीकरण शक्य - दत्तात्रय भरणे





मुंबई,दि. 23 : अकोला येथील शिवणी विमानतळाचा ‘उड्डाण योजनेत’ समावेश झाल्यास विमानाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करणे सुलभ होईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभाग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


अकोला येथील विमानतळाची धावपट्टी 1400 मीटर लांबीची आहे. हे विमानतळ भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे आहे. या विमानतळावर अधिक प्रवासी क्षमतेचे विमान उतरविण्यासाठी या विमानतळाची धावपट्टी वाढविणे गरजेचे आहे. याकरिता डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने 7 हेक्टर आर प्राधिकरणाकडे वर्ग केले असून खाजगी क्षेत्रातील 22.24 हेक्टर जमीन भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे.  याकरिता 95 कोटी 48 लाख रूपये खर्च अपेक्षित असून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजी अकोला विमान विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत व्यवहार्यता अहवाल देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने भारत विमानपत्तन प्राधिकरणाकडून व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी) मागविण्यात आला आहे. या अहवालात तांत्रिक बाबींची शक्यता आढळून न आल्याने व्यवहार्यता अहवाल नव्याने देण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार अकोला विमानतळाचा ‘उड्डाण योजनेत’ समावेश केल्यास ज्या ठिकाणी ही धावपट्टी आहे, त्या जागेतच विस्तारीकरण करता येईल, असे कळविले आहे. तसेच नाईट लॅण्डीकरिता अतिरिक्त जमीन लागणार असल्याचेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी यावेळी सांगितले.


यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री विप्लव बाजोरिया, डॉ.रणजीत पाटील यांनी उपस्थित केला होता.


टिप्पण्या