akola-crime-news-msedcl-electricity: आकडेबाज वीज चोरांवर गुन्हे दाखल; दोघांना अटक

                         प्रतिकात्मक/संग्रहित फोटो



अकोला, दि. २४: महावितरण कंपनीची वीज वापरून देयकाची रक्कम न भरल्याने वीज पुरवठा खंडित केल्यावर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनेत आरोपींच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणाखाली बोरगाव मंजू आणि खदान पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.




महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू येथील शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत हेमलता पाटील यांनी रामजी नगर येथील वीज ग्राहक गजानन तिडके यांनी मागील वर्षभरात वीज देण्याची रक्कम न भरल्याने फेब्रुवारी महिन्यात वीज पुरवठा कायम स्वरुपी खंडित केला होता.दरम्यान हेमलता पाटील या भागात पाहणी करण्यासाठी गेल्या असता वीज ग्राहक गजानन तिडके याने आकडे टाकून वीज चोरी करीत असल्याची आढळून आले.या घटनेचे छायाचित्रण करून आकडा टाकून वीज चोरी करणे चुकीचे आहे, याकडे लक्ष वेधले. कनिष्ठ अभियंता पाटील यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावला.तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात आरोपी गजानन तिडके याच्या विरोधात भादवि कलम ३५३,१८६,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




दुसऱ्या एका घटनेत अकोला खदान भागात अकोला ग्रामीणचे सहाय्यक अभियंता स्वप्नील भोपळे हे थकीत वीज देण्याची वसुली करीत असताना परिसरात राहणाऱ्या सतीश तायडे याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.सहाय्यक अभियंता स्वप्नील भोपळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खदान पोलिसांनी आरोपी सतीश तायडे याच्या विरोधात भादवि कलम ३५३,५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.




महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचार्‍याना मारहाण करणे अथवा अडथळा निर्माण करणे दंडनीय अपराध आहे.या प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी आरोपींना कारावासाची शिक्षा झाली आहे.

टिप्पण्या