state-level-chess-competition-akl: अकोला महानगरात चार दिवसीय राज्यस्तरीय बुद्धिबळ चाचणी स्पर्धेचे आयोजन- शिरीष धोत्रे यांची माहिती

         स्पर्धेची माहिती देताना शिरीष धोत्रे




ॲड. नीलिमा शिंगणे - जगड

अकोला: ऑल इंडिया चेस फेडरेशन व महाराष्ट्र चैस असोसिएशन अंतर्गत अकोला महानगर डिस्ट्रिक चेस असोसिएशन अकोला व कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना क्रीडाक्षेत्रातील बुद्धिबळ या खेळाची माहिती व्हावी, या खेळाचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार होऊन जागृती व्हावी या हेतूने सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे व कृषी उत्पन्न बाजार समितीला विकासाच्या शिखरावर नेणारे लोकनेते स्व. वसंतराव धोत्रे यांच्या जयंती निमित्त 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गायवाडा सभागृहात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 



कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित या पत्रकार परिषद मध्ये अकोला महानगर डिस्ट्रिक असो चे अध्यक्ष संदीप फुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, असो. चे सचिव जितेंद्र अग्रवाल, माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र चांडक उपस्थित होते.  



राज्यस्तरीय स्पर्धा ही सोळा वर्षा आतील मुलामुलींची आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा असून ही स्पर्धा साखळी पद्धतीने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला रोज दोन सामने खेळायचे असून एकूण आठ सामने खेळावे लागणार आहेत.  स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला नव्वद मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून तीस सेकंदाचा वाढीव वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील चार मुले व चार मुली घेण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था राधाकिसन प्लॉट येथील माहेश्वरी भवन येथे करण्यात आली असून डोनर एंट्री म्हणून संपूर्ण राज्यातून खेळाडू येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 





या स्पर्धेमधून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा दिल्ली येथील स्पर्धेसाठी चार मुले खुला गट व चार मुलींची महाराष्ट्र संघासाठी निवड होणार आहे.  स्पर्धेमध्ये दोन्ही गटातील प्रथम दहा खेळाडूंना रोख बक्षिसे व प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकच्या खेळाडूंना रोख बक्षिसे सोबत ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच आठ व दहा वर्षाच्या आतील प्रथम तीन खेळाडूंना पण ट्रॉफी देण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  



स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुख्य पंच प्रवीण ठाकरे जळगाव, विवेक सोनी व इतर पंच उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेनिमित्त राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग प्राप्त करण्याची सुवर्णसंधी या स्पर्धेच्या माध्यमातून आली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला महानगर व डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पुंडकर, बाजार समितीचे सभापती शिरीध धोत्रे यांनी केले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी अकोला महानगर व डिस्ट्रिक्ट असोचे सचिव जितेंद्र अग्रवाल यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत असो. चे पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

टिप्पण्या