relief- arrears-agricultural-electricity bills: कृषी वीजबिलांच्या थकबाकी मुक्तीसाठी 50 टक्के माफीची संधी; राज्यातील 4 लाख शेतकऱ्यांचे वीजबिल होणार संपूर्ण कोरे

                                           File photo




नीलिमा शिंगणे- जगड

अकोला : राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ 36 दिवस राहिले असून, थकबाकीच्या 50 टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या 31 मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत असल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.



कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्यातील 44 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट तसेच महावितरण कडून निर्लेखनाचे एकूण 15 हजार 97कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत वीजबिलांच्या दुरूस्तीमधून 300 कोटी 24 लाख रूपयांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी 30 हजार 705 कोटी रूपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी 50 टक्के थकबाकीचा दि. 31 मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के म्हणजे तब्बल 15 हजार 352 कोटी 50 लाख रूपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.



दरम्यान, ज्या शेतकर्‍यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना करून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.



कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवार  पर्यंत 21 लाख 79 हजार 816 शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम भरून सहभाग घेतला आहे. त्यांना आतापर्यंत व्याज, दंड, निर्लेखनासह भरलेल्या रकमेएवढीच एकूण 6 हजार 769 कोटी 50 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम येत्या 31 मार्चपर्यंत भरल्यास त्यांचीही उर्वरित 50टक्के थकबाकी संपूर्ण माफ होणार आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरून राज्यातील 3लाख 97 हजार 199 शेतकऱ्यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे. त्यांना उर्वरित 50 टक्के थकबाकीची 571 कोटी 88 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.



कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीच्या योजनेत पुणे प्रादेशिक विभागामध्ये 7 लाख 27 हजार 637 शेतकरी सहभागी झाले असून त्यातील 2 लाख 9 हजार 638 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. कोकण प्रादेशिक विभागात सहभागी 6 लाख 19 हजार 285 पैकी 1 लाख 9 हजार 594 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे. नागपूर प्रादेशिक विभागात 3 लाख 43 हजार 207 शेतकरी सहभागी झाले असून 60 हजार 938 थकबाकीमुक्त तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात सहभागी 4 लाख 89 हजार 687 पैकी 17हजार 29 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.



कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील 66 टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (33 टक्के) आणि जिल्हास्तरावर (33 टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत 1741 कोटी 22लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामध्ये प्रत्येकी 870 कोटी 61लाख रुपयांची निधी हा ग्रामपंचायत व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. आतापर्यंत राज्यात 1 लाख 20 हजार 572 कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागात 57 हजार 70, कोकण- 31 हजार 891, नागपूर- 20 हजार 554 आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात 11१हजार 57 कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत राज्यात 585 कोटी 79लाख रुपये खर्चाच्या 23 हजार 778 वीज यंत्रणेच्या विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. त्यातील 18 हजार 501 कामांचे कार्यादेश देण्यात आले असून 15 हजार 725 कामे प्रगतीपथावर आहेत तर 2776 कामे पूर्ण झाली आहेत.

                                         file image



सुधारित थकबाकीमध्ये आणखी 50 टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या 31 मार्च 2022 पर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व थकबाकीमुक्त योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या