nitin raut-power substations - akola: वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करा- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत ; कळंबा, मुंडगाव, वडाळी वीज उपकेंद्रांचे लोकार्पण




अकोला, दि.२८:  प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पारस सह राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्याने निर्माण करण्यात यावेत, त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून प्रस्ताव पाठवावे,असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे आज डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीस महावितरणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.टी. राऊत, महानिर्मितीचे पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खराटे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


याबैठकीत अकोला,बुलडाणा,वाशीम या जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. आढावा निर्मिती, पारेषण व वितरण या अनुषंगाने घेण्यात आला.




डॉ.राऊत यांनी उपस्थितांना निर्देश दिले की, वीज निर्मिती प्रकल्पांच्या परिसरात प्रदूषण व अन्य पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना म्हणून जैवविविधता उद्यानांची निर्मिती करावी. त्यासाठी पर्यावरण शास्त्र तज्ज्ञाकडून प्रकल्प अहवाल तयार करून घ्यावा. वीज निर्मिती दरम्यान उत्सर्जन होणाऱ्या रासायनिक घटकांचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन त्यास अनुकूल अशा वनस्पतींची लागवड करण्यात यावी. वृक्ष लागवड तसेच सौर ऊर्जेचा वापर याबाबींचा समावेश त्यात करून जैव विविधता व सौर ऊर्जा असे मॉडेल विकसित करावे,सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रस्ताव पाठवावा,असे त्यांनी सांगितले.


त्याच प्रमाणे कर्मचारी वसाहतींच्या परिसरात कर्मचाऱ्यांची मुले-मुली यांच्यासाठी  अद्ययावत ग्रंथालय उभारावे. त्यात विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळशाची उपलब्धता ठेवण्याबाबत दक्ष रहावे, असे त्यांनी सांगितले.


महावितरणने थकबाकी वसुलीसाठी गावोगावी जाऊन शेतकरी तसेच अन्य ग्राहकांना विविध योजनांचे स्वरूप समजावून सांगावे, यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही डॉ.राऊत यांनी स्पष्ट केले.


महापारेषणने उन्हाळ्याच्या काळात ज्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, अशा तांत्रिक कारणांची माहिती अद्ययावत करून ठेवावी,जेणेकरून आपत्तीच्या काळात उपाययोजना करता येणे शक्य होईल. त्यानंतर त्यांनी रोहित्र क्षमता वाढ,उपकेंद्र उभारणी,रीऍक्टर उभारणी आदी बाबींचाही आढावा घेतला.


अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सुविधा


राज्यातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपले ज्ञान अद्ययावत करता यावे यासाठीही त्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.


योजनांची व्याप्ती वाढविण्याचे सूतोवाच


अनुसूचित जाती जमातीच्या ग्राहकांसाठी असणारी डॉ.आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यात येऊन या योजनेचा लाभ ओबीसी घटकांना मिळावा म्हणून त्यांचाही समावेश या योजनेत करण्यात येईल, तसेच वसंतराव नाईक कृषी वीज जोडणी योजनेलाही मुदतवाढ देणार असल्याचे सूतोवाच डॉ. राऊत यांनी केले.



कळंबा(कसुरा), मुंडगाव, वडाळी(देशमुख) येथील वीज उपकेंद्रांचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण




राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या बाळापूर तालुक्यातील कळंबा(कसुरा), अकोट तालुक्यातील मुंडगाव व वडाळी(देशमुख) येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, कार्यकारी अभियंता पायाभुत सुविधा यामिनी पिंपळे, अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट तसेच अशोक अमानकर, डॉ. प्रशांत वानखडे, राजेंद्र तरवाडे, प्रमोद डोंगरे, महेंद्र गवई आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कोनशीला अनावरण करुन उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. आपल्या संबोधनात डॉ. राऊत म्हणाले की, रब्बी हंगामाच्या काळात अनेकदा शेतकरी बांधवांना कमी दाबाने विजेचा पुरवठा होतो. शेतकरी बांधवांची समस्या लक्षात घेउन महावितरणने उच्च दाब वितरण योजनेत अकोला जिल्ह्यासाठी आठ नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी दिली होती.


आपल्या भाषणात डॉ. राऊत यांनी सांगितले की, नवीन वीज उप केंद्रामुळे ३६ गावातील सुमारे ४ हजार वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. बाळापूर तालुक्यातील कळंबा कसुरा येथील वीज उपकेंद्रांमुळे कळंबा  खुर्द आणि बुद्रुक, सोनगिरी, कसुरा या गावातील १४७५वीज ग्राहकांना लाभ होणारा आहे. तसेच कारंजा रंजनपूर वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील वीज उपकेंद्रांमुळे मुंडगाव अमीनपूर, लोहारी बुद्रुक, लोहारी, चिंचखेड,नवरी खुर्द आणि बुद्रुक, आलेगाव,पिंपरी, डिक्कर, देवरी, देवरी फाटा, आलेवाडी, सोनबर्डी आदींसह २८ गावातील वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या वीज उपकेंद्रांमुळे अकोट एमआयडीसी आणि अकोट १३२ कि. व्हो वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे. वडाळी देशमुख येथील वीज उपकेंद्रांमुळे शिरसोली, मालपुरा आणि मालठाणा या गावातील वीज ग्राहकांना लाभ होणार असून सावरा आणि पणज वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे. 


ते पुढे म्हणाले की, गत दोन वर्षामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये ३८ कोटी रु चे उल्लेखनीय कामे करण्यात आली आहेत. कृषी जोडण्यांबाबत अकोला जिल्ह्यात विविध योजनांमध्ये २८४३ जोडण्या दिल्या आहेत. अनुसुचीत जाती व जमातीतील ग्राहकांना घरगुती वीज जोडण्या त्वरीत मिळाव्या या हेतुनेशासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने अंतर्गत २७६ वीज जोडण्या दिलेल्याआहेत,असे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. राऊत म्हणाले की,  ग्राहकांना वीज वितरण कंपनीने नेहमीच उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये सगळं जग थांबलं असतांना वीज कंपनीची सेवा अविरत सुरु होती. चक्री वादळासारख्या आपत्तीतही लवकरात लवकर सेवा पुर्ववत केली. मदत पुनर्वसन कार्याला वीज पुरवठा कमी पडू दिला नाही. कोळशाचे संकट निर्माण झाले, त्या काळातही  भारनियमनाची झळ लागू दिली नाही. अशा वेळी ग्राहकांनी वीज वापरत असतांना त्याचे बिल भरावे, इतकीच माफक अपेक्षा आहे, केवळ वसुली हा उद्देश नाही, मात्र सेवेतील सातत्य राखण्यासाठी ग्राहकांनी बिल भरावे,असे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमात  उपकेंद्रासाठी जमीन दिलेल्या शेतकरी  गोपाळ केशवराव उगले यांचा डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर डॉ. राऊत यांचा कळंबा (कसुरा) सरपंच रामा ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.




टिप्पण्या