Task Force Committee Meeting: अकोला जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक; ग्रामिण भागात लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Akola District Task Force Committee Meeting;  Accelerate Vaccination in Rural Areas - Collector Nima Arora




अकोला दि.८: कोविड संक्रमणाचा वेग वाढत असून त्यासाठी चाचणी, संपर्क चाचण्या तसेच उपचार सुविधा उपलब्धते सोबतच ग्रामिण भागात कोविड लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी उपाययोजना कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार,  मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मनिष शर्मा, डॉ. आदित्य महानकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य यंत्रणेतील, शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.




जिल्ह्यात १५ ते १७ वयोगटातील युवक युवतींचे लसीकरण सुरु असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी १५ जानेवारी पर्यंत सर्व शाळानिहाय लसीकरण सत्र आयोजित करुन लसीकरण करावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, लसीकरण डोसेस व अन्य सामुग्रीचे नियोजन करावे असे निर्देश देण्यात आले. अनेक लोकांचे पहिले डोस घेऊन झाले मात्र दुसरे डोस घेण्याची वेळ येऊनही लसीकरण झालेले नाही अशा लोकांना संपर्क करुन त्यांचा दुसरा डोस पूर्ण करून घ्यावा. तसेच ग्रामिण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दुसरा डोस घेण्याबाबत लोकांना आवाहन करुन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे.




जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक उपचार सुविधांची उपलब्धता आहे. तथापि, रुग्ण संख्या वाढीच्या दरानुसार आवश्यक खाटा, औषधी व गरज भासल्यास ऑक्सिजन आदींची उपलब्धता करण्याबाबतही आढावा घेण्यात आला.  त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ  उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देण्यात आल्या. शालेय स्तरावरील लसीकरणासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे व त्याप्रमाणे आरोग्य विभाग लसीकरण करुन देईल, असेही निर्देश देण्यात आले.

टिप्पण्या