Sindhutai sapkal- maharashtra: निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली; पद्मश्री सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

                                      file photo



पुणे: अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 75 व्या वर्षी मंगळवारी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. 


सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते.  सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.


सिंधुताई सपकाळ (माई) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांना शिक्षण घेता आले.


सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात केली होती. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे या मुलांना सर्व शिक्षण, भोजन, वस्त्र अन्य सुविधा उपलब्ध केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्य देखील संस्थेकडूनच केले जाते.


सिंधुताई यांनी बाल निकेतन (हडपसर पुणे), सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह (चिखलदरा) अभिमान बाल भवन (वर्धा) गोपिका गाईरक्षण केंद्र  (वर्धा), ममता बाल सदन (सासवड) ,सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था (पुणे) या संस्था देखील सिंधुताई यांनी सुरू करून समाजाला नवी दिशा दिली.


मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

                                     file photo



मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 

मुंबई: 'सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.


सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.



दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही. पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरवायचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेल्या दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.


त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाज जीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.



सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण


ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


सिंधुताईंनी खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना मायेचा आधार दिला. अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.




अकोला भाजप कडून भावपूर्ण श्रद्धांजली

                                     File photo

अकोला: अनाथांची माता श्रीमती सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून प्रेमळ आणि कष्टातून संकटावर मात करून मार्ग दाखवा दाखवणारी .मार्गदर्शक हरवलेल्या अशा शब्दात माजी  केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी आपली संवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



आदिवासी मागासवर्गीय तसेच समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये मार्गदर्शक मातृ शक्तीला प्रेरक कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली अशा शब्दात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणजित सावरकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली.


समाजाला योग्य दिशा, अनिष्ट रूढींना विरोध करून सर्वांचा सन्मान, भेदभाव तसेच द्वेष बुद्धी न ठेवता संस्काराचे निरंतरपणे करणाऱ्या मातृशक्तीची प्रेरणा  सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्र पोरका झाला अशा शब्दात श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी व अकोला पूर्व चे आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.



सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने तेजराव थोरात, अश्विनीताई हातवळणे, विलास अनासने यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.








टिप्पण्या