Sahitya sammelan-tukdoji maharaj: राष्ट्रसंतांना मरणोपरांत भारतरत्न द्या! आठवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनात ठराव पारित




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : देशालाच नव्हे तर जगाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगिता आदर्श समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. अशा महामानवाला शासनदरबारी मात्र उपेक्षाच मिळाली आहे, अशा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना भारतरत्न प्रदान करावा, असा ठराव संमेलनात मांडून एकमताने पारीत करण्यात आला. 


वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती यांच्या वतीने दोन दिवसीय विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी विचारपीठावर  संमेलनाध्यक्ष प्रबोधनकार भाऊसाहेब  थुटे हे होते.  आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, आ. अमोल मिटकरी, महेश गणगणे, अशोक अमानकर, राजेश भारती, डॉ. विक्रांत इंगळे, स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे, डॉ. विघे  गुरुजी, गव्हाळे महाराज, मनोहर रेचे, रवींद्र मुंडगावकर, डॉ. अशोक रत्नपारखी, ऍड. वंदन कोहाडे, डॉ. नरेंद्र तराळे, रवी  मानव, प्रबोधनकार संदीपपाल महाराज, अक्षयपाल महाराज, प्रा. रघुनाथ कर्डीकर, सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, महादेवराव भुईभार, जयंतराव मसने, विनायकराव पवार आदी मान्यवर विचारपीठावर  प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी प्रास्ताविकतेतून सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट यांनी संमेलनाची भूमिका विषद केली. 



संमेलनाध्यक्ष भाऊसाहेब थुटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राष्टसांताच्या साहित्याचे विविध पैलू मांडले. राष्ट्रसंतानी खऱ्या अर्थाने मानवाला जगण्याचा मार्ग दाखविला. महिलांना पुरुषाप्रमाणे सामान दर्जा महाराजांनी आपल्या साहित्यातून दिला आहे. ग्रामगीता आदर्श जिवन जगण्याचा पथदर्श आहे, त्यावर वाटचाल करीत जुन्या रूढी परंपरा यांना झुगारून सुधारणेचा मंत्र गुरुदेव सेवकांनी या संमेलनातून घेऊन जावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आपल्या भाषणातून आश्वासन दिले.


त्यांनतर आ. अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून अलीकडे पीक आलेल्या बुआ बाबाचा समाचार घेतला. राष्ट्रसंतांचे साहित्य हे प्रबोधनकारी साहित्य आहे. आजच्या ढोंगी बाबांना धडा शिकवण्याचे काम गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.  सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करेन असे आश्वासन आ. अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून दिले. 

संचालन सचिन महोकार यांनी केले तर आभार  गोपाल गाडगे यांनी मानले.


भजन गायन

पातूर येथील श्री सिदाजी महाराज भजन मंडळ यांनी भजन गायन केले. यावेळी प्रा. विलास राऊत, गोपाल राऊत,संदीप गिऱ्हे, मंगेश राऊत, संतोष पाटील,शुभम उगले आदींनी भजन गायन करून वातावरण भक्तिमय केले.


दोन दिवसीय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर साकरकर, ऍड. संतोष भोरे, सचिन महोकार, मयुर वानखडे, श्रीपाद खेळकर, गोपाल गाडगे,, डॉ. धर्मपाल चिंचोळकर, राजेंद्र झामरे, डॉ. रजिव बोरकर, मयुर वानखडे,  प्रमोद शेंडे, डॉ. रामेश्वर लोथे, डॉ. पुंडकर, राजेश चव्हाण, जिवन धंदर, प्रसाद बरगट, आकाश हरणे, विकास जाधव, ऋषिकेश अनासाने, अतुल डोंगरे, सागर म्हसाळ,डॉ. ममताताई इंगोले, कोमल हरणे, आदींनी परिश्रम घेतले. 




संमेलनात पारित झालेले ठराव


1) राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान करावा.


2) राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करावा.


3) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन निर्माण करणे


4) पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा समावेश करावा 


5) राष्ट्रसंत तुकडोजी विचार धारा या विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करावा.


6) राष्ट्रसंतांच्या विवीध साहित्य प्रकारावर  आचार्य पदवीसाठी संशोधन व्हावे

आदी ठराव संमेलनात मांडण्यात आले. आणि हे सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.



संदीपपाल महाराज यांच्या राष्ट्रीय कीर्तन प्रबोधनाने संमेलनाचा समरोप झाला.



सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा


संमेलनस्थळी सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी राज्यभरातून आलेल्या गुरुदेव सेवकांनी स्वाक्षरी केल्या.




अड्याळ टेकडीवर मला पंढरपूर दिसते....!



आचार्य वेरूळकर गुरुजींची प्रकट मुलाखत


   

वयाच्या बारा वर्षांपासून महाराजांचा सहवास लाभलेले राष्ट्रसंतांच्या विचाराचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या जिवन कार्याचा आढावा घेणारी प्रकट मुलाखत घेण्यात आली. महाराष्ट्र टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी नीरज आवंडेकर यांनी ही मुलाखत घेतली.



महिलांनो पोथ्या नाही तर ग्रामगिता आमलात आणा:महिला परिसंवादातील सूर


जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उध्दारी असे म्हटले जाते, मात्र आता महिलांनी रूढी परंपरा यांना झुगारून ग्रामगिता आचरणात आणली पाहिजे, कारण राष्ट्र बालशाली बनविण्यासाठी महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि राष्ट्रसंतांच्या साहित्य महिलामध्ये रुजविणे काळाची गरज आहे. असा सूर रविवारी महिला परिसवांदतून रविवारी उमटला.


संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वर्तमान परिस्थितीत महिलामध्ये विचार रुजविणे काळाची गरज या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे, डॉ. ममता इंगोले, जया मांजरे आदी विचारपीठावर उपस्थित होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ गुरुदेव प्रचारक  सुधा जावंजाळ उपस्थित होत्या.

परिसंवादात सर्वप्रथम जया मांजरे यांनी राष्ट्रसंतांनी ग्रामगितेतून मांडलेली महिलोन्नती चा आशय देत महिलांना संघटित होऊन सामाजिक क्रांतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करीत भूमिका विषद केली. त्यानंतर वक्त्या डॉ ममता इंगोले यांनी आपल्या भाषणातून महिलांनी रोज साहित्य वाचलं पाहिजे, आणि तेही राष्ट्रसंतांचे साहित्य आवर्जून वाचले पाहिजे, महिला जर संस्कारीत झाल्या तरच पिढी सुसंस्कारीत घडेल यासाठी ग्रामगितेचा जागर झाला पाहिजे, त्यांनी माय या कवितेतून महिलांच्या संवेदना व्यक्त केल्या.

तर प्रमुख वक्ते गुंजन गोळे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत आपल्याला ही काम करण्याची ऊर्जा ही राष्ट्रसंतांच्या साहित्यातून मिळत असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रसंतांनी सांगितल्या नुसार मानवधर्म जोपासला पाहिजे हा मर्म घेऊन कामाची वाटचाल सुरु केली. आणि शेकडो मुलांना जीवनदान देण्याचे पुण्य मिळाले ही ताकद राष्ट्रसंतांच्या साहित्यातून मिळत असते. देव देवळात नाही तर प्रत्येक माणसात शोधता आला पाहिजे त्यासाठी दृष्टी लागते आणि ही दृष्टी ग्रामगितेतून मिलते त्यासाठी प्रत्येक महिलांनी ग्रामगिता वाचून आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन गुजन गोळे यांनी यावेळी केले.


आदर्श जीवनाचा पाया म्हणजे राष्ट्रसंतांची ग्रामगीता


देशाला सुंदर बनवायचे असेल तर मनुष्याचे कर्म महत्वाचे आहेत. आणि हे कर्म करण्यासाठी जी दिशा लागते ती वाट दाखविण्याचे काम राष्ट्रसंतांची ग्रामगिता करणार आहे, या ग्रामगितेतील कर्मवाद आमलात आणला पाहिजे असा सूर दुसऱ्या परिसंवादातून रविवारी उमटला.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाचे आयोजन अकोल्याच्या जाणोरकर मंगल कार्यालयात आयोजित केला आहे. यावेळी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंतांच्या साहित्यातील कर्मवाद व आदर्श समाज घडविण्यासाठी योगदान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या परीसंवादला प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ गुरुदेव प्रचारक डॉ. विघे गुरुजी, प्रा. अरविंद राठोड, गोपाल कडू, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक ओलंबे, जिल्हा सेवाधिकारी रविदादा मुंडगावकर आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.



यावेळी डॉ. विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांनी ग्रामगितेत मांडलेला कर्मवाद आपल्या भाषणातून  मांडला. देशाला सुंदर बनवायचे असेल तर मनुष्याचे कर्म महत्वाचे आहेत हा विचार महाराजांनी दिला. त्यांनी केवळ साहित्यातून कर्मवाद मांडला नाही तर राष्ट्रसंत हे कर्मयोगी होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.



यानंतर अरविंद राठोड यांनी राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना ही समाज घडविण्याची प्रणाली असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रसंतानी समाज घडविण्याचे चालते बोलते विद्यापीठ उभे केले. महाराजांची देवाची संकल्पना सर्वव्यापक आहे. असे देशाला राष्ट्रीय एकात्मितेच्या धाग्यात बांधण्याचे काम राष्ट्रसंतांच्या साहित्यातून केले.  यानंतर गोपाल कडू यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रसंतांचे सेवामंडळ देशाला कर्मवादाची शिकवण देते. राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून अंधश्रद्धा, रूढी परंपरा दूर करण्यासाठी जनजागृती केली. ग्रामसुधारणा, रक्तदान चळवळ, स्वच्छता अभियान हे समाजनिर्मितीचे महत्वाचे पैलू आहेत. हे पैलू सर्वांनी अंगीकारले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी करीत राष्ट्रसंतांचा कर्मवाद मांडला.



राष्ट्रसंतांचे साहित्य जगण्याचा प्राणवायू


कोरोना महामारीमुळे तरुणांना केवळ ऑनलाईन शिकवलं मात्र त्यांच्यातील संस्कार बाजूला राहिला. अशा परिस्थितीत युवकांचे मनोबल वाढविण्याचे काम राष्ट्रसंतांचे साहित्य करीत असते. या महामारीत लोकांना जगण्याचा प्राणवायुचे महत्व कळले, मात्र या देशातील तरुणांना सक्षम बनवण्यासाठी व अशा परिस्थितीत येणाऱ्या आव्हाननला तोंड देण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार  प्राणवायु बनून तारेल, असा सूर संमेलनाच्या पहिल्या परिसंवादात रविवारी उमटला.


जागतिक महामारीमुळे तरुणांपुढील आव्हाने आणि उपाययोजना या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसवांदाला प्रमुख वक्ते म्हणून ऍड. मोतीसिंह मोहता, प्राचार्य अरविंद देशमुख, डॉ. राजीव बोरकर, शेतकरी नेते भाई प्रदीप देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.


डॉ. राजीव बोरकर यांनी राष्ट्रसंतांचा विचार ही संस्कारक्षम पिढी घडवीणारी गाथा आहे, यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या विविध योजना तसेच केंद्र सरकारच्या तरुणासाठी शैक्षणिक, संशोधन स्पर्धकरिता योजनाची माहिती आपल्या भाषणातून दिली.  


ऍड मोतीसिंह मोहता यांनी राष्ट्रसंतांचा परिसस्पर्श लाभल्याचे भाग्य मला लाभले असे सांगत जीवनप्रसांगातील  अनेक उदाहरणे दिली.  यांनतर भाई प्रदीप देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून राष्ट्रसांतच्या विचाराने हा शेतकरी तरेल असा आशावाद व्यक्त केला. रवी मानव यांनी राष्ट्रसंतांच्या स्वातंत्र्य संग्रामतील योगदान विषद केलं. कोरोनानंन्तर तरुणांना सक्षम, स्वावलंबी, उद्योगपूर्ण बनवायचे असेल तर राष्ट्रसंताची ग्रामगिता डोक्यात भिनली पाहिजे, असे प्रतिपादन करीत स्वदेशी स्विराकरण्याचे आवाहन केले.

प्राचार्य अरविंद देशमुख यांनी आपल्या भाषणातून युवकांना मानवी मूल्य शिकवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आजच्या महामारीत तरुणांनापुढे मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत, ती पेलण्यासाठी प्रणवयुची गरज आहे, हा प्राणवायू राष्ट्रसंतांच्या विचारातून आपल्याला मिळेल, सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी ग्रामगिता ही संजीवनी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.



राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय विचार साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेला राज्यभरातून स्पर्धकांनी उपस्थिती लावली.


संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रामेश्वर म्हसाळ यांच्या संचाने सुमधुर अभंग गायन केले.


त्यांनतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या परिवर्तनवादी विचारावर आधारित राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेला सुरवात झाली. यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्रसंत, युवक साहित्य, समाज व राजकारण, राष्ट्रसंतांच्या साहित्यातील राष्ट्रधर्म या विषयावर राज्यभरातून आलेल्या वक्त्यांनी विचार मांडले. राज्यभरातून 22 स्पर्धाकांनी आपले विचार मांडले. 


यामध्ये प्रथम क्रमांक मूर्तिजापूरच्या अनिकेत महल्ले, द्वितीय अभय तायडे तर तृतीय क्रमांक बार्शीटाकळी येथील मयूर छबीले याने मिळवला. उत्तेजनार्थ प्रथम अनिकेत पजई व उत्तेजनार्थ द्वितीय पुरस्काराने रश्मी गडलिंग यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत पाच वर्षीय चिमुकल्याचे भाषणाने सभागृहाला स्तब्ध केले. स्मित सचिन भोयर या चिमुकल्या स्पर्धेकाला विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण  प्रा. स्वप्निल इंगोले, प्रा. विनोद वेरूळकर, प्रा. अंकुश  मानकर यांनी केले. 







टिप्पण्या